मलिकांच्या आरोपांचा भाजपवर परिणाम?

‘म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावत आहे’ या उक्तीचा प्रत्यय सध्या गोव्याच्या राजकारण्याला येत आहे
Goa Politics: Governor of Meghalaya Satyapal Malik
Goa Politics: Governor of Meghalaya Satyapal MalikDainik Gomantak
Published on
Updated on

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलीक (Governor of Meghalaya Satyapal Malik) ने डॉ. प्रमोद सावंतावर सुरुवातीला केलेल्या आरोपामुळे भाजपसरकार (Goa politics) आरोपाच्या पिंजऱ्यात सापडल्यासारखे झाले होते नंतर राज्यपालांनी थोडेफार घुमजाव केले असले तरी ‘जो बुंद से गई वो हौदसे नही आती’. या उक्तीप्रमाणे त्यामुळे जो परिणाम झालेला होता तो कमी झालेला नाही. या आरोपामुळे विरोधीपक्षाने डॉ. सावंतानी राजीनामा द्यावा किंवाराज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे असा जो रेटा लावला तोही अनावश्यक वाटतो. मुळात आता निवडणूकीची आचारसंहिता लागण्याला केवळ दोन महिने राहिल्यामुळे हे सरकार बरखास्त होणे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे या बाबीच गौण ठरतात.

Goa Politics: Governor of Meghalaya Satyapal Malik
गोव्याची जनता ममतादीदी, अरविंददादाची दादागिरी खपवून घेईल?

‘म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावत आहे’ या उक्तीचा प्रत्यय सध्या गोव्याच्या राजकारण्याला येत आहे एवढे मात्र खरे. खरेतर आता वेध लागले आहेत ते आगामी विधानसभा निवडणूकीचे. या निवडणूकीनंतर कोणाचे सरकार येणार याचे. त्यामुळेच प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार हा जनेतच्या अदालतीत उभा आहे. तेच त्यांचा निवाडा करणार आहेत. परवा एक राजकीय विश्लेषक याबाबत बोलताना 2012 साली जशी कॉग्रेसविरोधी लाट होती तशीच या निवडणूकीत भाजपविरोधी लाट येणार असे छातीठोकपणे सांगत होता. 2012 साली कॉग्रेसमधील तथाकथित भ्रष्ट्राचारामुळे व काही मंत्र्यांच्या अंधाधुंदी कारभारामुळे दिंगबर कामतांच्या सरकाराविरूध्द जनतेत नाराजी होती यात संशयच नाही. पण त्याला खरे खतपाणी घातले होते ते तेव्हाचे विरोधी पक्ष नेते कै. मनोहर पर्रीकर यांनी. विरोधकांचे एकत्रीकरण करण्यात त्यांनी जबरदस्त यश प्राप्त केले होते.

त्यावेळी पर्रीकर विरोधकांचे सर्वमान्य नेते बनले होते. तशी परिस्थिती आज आहे की काय याचा शोध प्रथम घ्यायला हवा. या तथाकथित आरोपांचा फायदा विरोधी पक्षांना होतो की काय आणि तो फायदा घेऊ शकणारे नेते विरोधी पक्षांकडे आहे की काय यावरही नजर ठेवायला हवी. सध्या मुख्यमंत्र्याविरूध्द विरोधकांचे एकजूटीने आंदोलन सुरू असले तरी त्यात एकवाक्यता नाही. प्रत्येक पक्ष आपल्या स्वतःच्याच इमेजभोवती गुरफटेलला दिसतो आहे.

Goa Politics: Governor of Meghalaya Satyapal Malik
CBIचे आवाहन, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करा

कॉग्रेसचेच उदाहरण घ्या. कॉग्रेस हा सध्यातरी राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष. याच कॉग्रेसला हरवून 2012 साली भाजपने राज्याची सत्ता पटकावली होती. पण आता कॉग्रेसच दुंभगेलला वाटतो. परवा राजीनामा बाबतच्या आंदोलनात कॉग्रेसची शक्ती दिसलीच नाही . कॉग्रेसच्या उरलेल्या चार आमदारांपैकी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांचा अपवाद वगळता इतर तीन आमदार कोठेच बघायला मिळालेले नाहीत. भाजप विरोधी लाट आहे.

असे म्हटले जात असले तरी त्याचा फायदा घेण्याच्या स्थितीत विरोधी पक्ष आहे काय याचा प्रथम आढावा घ्यायला हवा. प्रत्येक पक्ष स्वतःची शक्ती वाढविण्यात मग्न असल्यावर एकजूट होणार तरी कशी? मगोप हा तर सुदिन ढवळीकर द्वारा सरकारावर शाब्दिक हल्ले करण्यात दंग दिसतो आहे. त्यामानाने गोव्यात नव्यानेच प्रवेश केलेला तृणमुल पक्ष थोडाफार आक्रमक वाटायला लागला आहे. पण यातून शक्तीच्या विभाजनाचाही प्रत्यय यायला लागला आहे. खरेतर सत्यपाल मलिक ने जे आरोप केले आहेत त्याची जाणीव यापूर्वीच जनेतला होती. कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना अकाली प्राण गमवावे लागले. त्यावेळी मृतांच्या नातेवाईंकांच्या सोशल माध्यमांवरून व्हायरल झालेल्याप्रतिक्रिया खरोखरच ह्रदयद्रावक अशाच होत्या. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरूध्द अनेकांनी सोशल माध्यमांवरून कंठशोष केल्याचे बघायला मिळाले होते. इस्पितळात खाटी उपलब्ध नसल्यामुळे कोणाचे स्ट्रेचरवर तर कोणाचे गाडीतगेलेले प्राण आठवले की अजूनही डोळ्यात अश्रू उभे राहतात. यामुळे सत्यवान मलीकांच्या आरोपामुळे भाजप विरुध्द लाट येणार म्हणणे हे आतातायी पणाचे वाटते.

ही लाट यापूर्वीच आली होती. ‘ये पब्लिक है , ये सब जानती है’ या गाण्याप्रमाणे लोकांना तसे सगळेच माहित असते. त्यामुळे फक्त मलिकांच्या आरोपांमुळे हे होईल असे म्हणणे म्हणजे ‘शितापुढे मीठ’ खाण्यासारखे वाटते. खरेतर आता प्रश्न आहे तो पर्यायाचा. कॉग्रेस बद्दल विश्वास वाटावा असे कॉग्रेसने गेल्या पाच वर्षात काहीच केलेले नाही. 2012 साली कॉग्रेस सरकावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यावेळी जनतेत कॉग्रेस विरोधी लाट निर्माण झाली होती. त्यावेळी कोणत्याही राज्यपालांनी कॉग्रेसवर आरोप न करता सुध्दा लोकांनी त्यांना धुळ चारण्याचे मनोमन ठरविले होते. कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय होता. आज लोकांपुढे तो पर्याय नाही. कॉग्रेस आपल्या नेत्यांच्या काही कारनाम्यामुळे बदनाम होत चालली आहे. मागच्यावेळी सुध्दा भाजप विरोधीच लाट होती. त्यामुळे जनतेने कॉग्रेसचे सतरा आमदार निवडून दिले होते. आणि आता त्यांचे सतरापैकी फक्त चारच आमदार शिल्लक राहिलेले दिसताहेत. याचकरिता कॉग्रेसचे आमदार निवडून आणणे म्हणजे भाजपलाच मागच्या दरवाजाने कुमक पुरवणे असा समज जनतेत निर्माण झाला आहे. मगोप बाबतीतही तो विश्वास राहिलेला नाही.याचे कारण म्हणजे सुरुवातीचीअडीचवर्षे मगोपही भाजपबरोबर सत्तेत होता. त्याचबरोबर आता सरकारच्या नावाने ओरड करणारा मगोप ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ म्हणत भाजपशी कधी युती करेल याचा तर्क कुणीही मांडू शकणार नाही.

Goa Politics: Governor of Meghalaya Satyapal Malik
बंगालचे चक्रीवादळ गोव्यात धडकणार, राजकीय हवामान खात्याचा अंदाज

गोवा फारवर्डबद्दल बोलायचे तर तेही युती करिता कॉग्रेसकडे तोंड उघडून बघत असल्याचे दिसत आहे. आता राहता राहिले आम आदमी पक्ष व तृणमुल कॉग्रेस या दोन्ही पक्षांनी सध्या राज्यात मुसंडी मारली असली तरी त्यांची शक्ती मर्यादित आहे हे विसरता कामा नये. अजूनतरी त्यांची पाळेमुळे गोव्यात म्हणावी तशी रुजलेली नाही. तरीही सद्यपरिस्थिती कॉग्रेस- आप- तृणमुल कॉग्रेस व गोवा फारवर्ड हे चार पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतात. प्रश्न आहे ते एकत्र येतील की नाही याचा. लोक केवळ कोविडामुळे झालेल्या मृत्युमुळेच नव्हे तर दरदिवशी मारुतीच्या शेपटासाऱख्या वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या तसेच घरगुती गॅसच्या भावामुळे पण रोष व्यक्त करताना दिसताहेत. मात्र हा रोष फक्त पडद्यामागेच दिसतो. प्रत्यक्षात पेट्रोलच्या वाढीव दरामुळे पेट्रोलचा वापर कमी झालेला दिसत नाही. परवा एक विश्लेषक हेच सांगत होता.एवढे पेट्रोल डिझेलचे दर वाढून सुध्दा रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येत तसेच पेट्रोल डिझेलच्या विक्रीत विशेष फरक पडलेला दिसत नाही. खरे तर याचा निषेध म्हणून लोकांनी एक तर चालत, सायकलवर किंवा बसमधून फिरायला हवे.

पण तसे न होता लोक अजूनही दुचाकी चारचाकी वाहने त्याचप्रमाणात वापरताना दिसताहेत असे त्यांचे म्हणणे पडले. त्यांच्या म्हणण्यात तथ्यांश वाटला. लोकांनाच जर वाढीव दराचे पडलेले नाही तर सरकारने या दराबाबत बिनधास्त राहिल्यास त्यांची ही चूक म्हणता येणार नाही. आता याचा राग मतदार निवडणूकीत मतदान द्वारा काढतात की नाही हे बघावे लागेल. पण राग काढण्याकरिता त्यांना दुसरा विश्वासू असा आधार हवा. तो विश्वास तयार करण्यात विरोधी पक्ष अजूनतरी बराच कमी पडलेला दिसतो आहे. 2012 साली कॉग्रेसला विटलेल्या लोकांना भाजपच्या मनोहरपर्रीकरांचा आधार होता. त्यामुळे अल्पसंख्याकांनी सुध्दा कधी नव्हे ते भाजपला मतदान केले होते. आज तसा नेता राहिेलेला नाही. कॉग्रेसचे नेते आज कॉग्रेसला आव्हान देताना दिसताहेत. इतर पक्षांचाही विशेष असा प्रभाव पडलेला दिसत नाही. त्यामुळेच राज्यपालांचे तथाकथित आरोप असो किंवा जनतेच्या मनात खदखदणारा संताप असो त्याची परिणती भाजप विरोधी मतदानात होईल की काय याची सध्या तरी शंकाच वाटते. आणि हे माहित असूनही सर्व विरोधीपक्ष अजून एकत्र आले नाहीत तर मात्र या शंकेचे पर्यावसन वस्तुस्थितीत व्हायला वेळ लागणार नाही हेच खरे.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com