केरी-सत्तरी येथील विवेकानंद ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी ‘वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन’ चा संदेश देणारी ‘सिडबाॅल’ बनविण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेचे संचालन भूगोल विषयाचे शिक्षक रामदास शेटकर यांनी केले.
विद्यार्थ्यांना निसर्गाप्रती संवेदनशील बनविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी विविध फळ झाडांच्या बिया गोळा केल्या होत्या.
ज्यात जांभूळ, भिरलेमाड, फणस, कोकम, काजूबियां या बरोबर चुरना, चारा अशा रानमेव्याच्या बियांचा समावेश होता. विद्यालयाचे पालक प्रशांत राणे यांनी सिडबाॅलसाठी आवश्यक माती आणि घन जिवामृत पुरवले.
शिक्षक रामदास शेटकर यांनी मिश्रण कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. मुलांनी प्रथम मातीचे मोठे गोळे तयार केले. त्यानंतर त्यात बिया मिसळून प्रत्यक्ष सिडबाॅल कसे बनवायचे यासंबंधी शिक्षकांनी समजावून सांगितले.
एकदा सिडबॉल बनवण्याची हातोटी लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शेकडो सिडबाॅल उत्साहाने तयार केले. हे सिडबाॅल येत्या पावसाळ्यात, आसपासच्या परिसरात रोवले जाणार आहेत.
मातीच्या गोळ्यामध्ये असलेली बियाणी अंकुरण्यासाठी, सिडबॉलमध्ये विशिष्ट पदार्थ मिसळलेले असतात. हे गोळे त्यानंतर रिकाम्या जागेत फेकले जातात, जेणेकरून पावसाळ्यात त्यामधील बिया अंकुरून त्या जागी रोपटी मूळ धरतील.
रोपे रुजवण्याच्या या प्राचीन तंत्राला जपानी शेतीचे प्रणेते मासानोवा फुकुओका यांनी पुनर्जीवित केले.
सिडबॉल्समध्ये बियाण्यांना मातीचे संरक्षण मिळून बियाणी सुरक्षित राहतात. पावसामुळे वरची माती निघून जाईपर्यंत बियाण्यांना हे संरक्षण लाभते. सिडबॉलमध्ये असलेल्या कंपोस्टमधले पोषक घटक त्यानंतर अंकुरणाऱ्या रोपांचे पोषण करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.