Gomantak Editorial Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: पुतीनशाहीला झटका

गेल्या दोन वर्षांत कधी नव्हे एवढी रशिया-चीन मैत्री घनदाट होताना दिसत आहे. त्याचे जागतिक राजकारणावर पडसाद उमटत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial एकाधिकारशाहीची पकड कितीही पोलादी असली तरी तिला कधीच धडक मारली जाणार नाही, असे नसते. तशा समजुतीत राहणाऱ्यांचा कधी ना कधी भ्रमनिरास होतो. गेली दोन दशके रशियावर लोकशाहीच्या बुरख्याआडून अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हुकूमशाहीच लादली आहे.

‘वॅग्नर’ या भाडोत्री सैन्याच्या बंडाने त्या सर्वंकष सत्तेला थोडा काळ का होईना आव्हान दिले. त्यामागे व्यापक ध्येयवाद असल्याचे दिसत नाही. तरीही त्यांचे गांभीर्य आणि महत्त्व कमी होत नाही.

‘वॅग्नर’ या भाडोत्री सैनिक समूहाचे प्रमुख येव्हगिनी प्रिगोझीन यांनी शुक्रवारी कमालीच्या वेगाने मॉस्कोच्या दिशेने मुसंडी मारत पुतीन यांना हैराण केले, पण तेवढ्याच वेगाने बंड मागेही घेतले.

ते मागे घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी मान्य केल्या गेल्या, याचा सगळा तपशील लगेच कळणार नाही. युद्धग्रस्त युक्रेनला जवळ असलेल्या रोस्तोव्ह, व्हेरोनेझ, तसेच लिपेत्सक प्रांतात पुतीन यांच्या वर्चस्वाला, त्यांच्या राजसत्तेला आव्हान देण्याचे धाडस प्रिगोझीन यांनी त्यांच्या `वॅग्नर’ समूहाद्वारे दाखवले आहे.

तेथील रशियन लष्करी तळ, मुख्यालयावर काही काळासाठी का होईना ताबा प्रस्थापित केला. घाईघाईने काहींनी त्याची तुलना रशियात १९१७ मध्ये झालेल्या क्रांतीशी, तसेच १९९१-९३ मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघराज्याच्या पतनावेळी झालेल्या उठावाशी केली.

परिस्थितीचे पुरेसे आकलन न करता केलेले हे विश्‍लेषण बंडाइतकेच तकलादू ठरले. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मध्यस्थीनंतर प्रिगोझीनने माघार घेतली आणि त्याच देशात आश्रय घेतला.

अर्थात बंड शमले असले तरी त्याने निर्माण केलेले प्रश्‍न मोठे व गंभीर आहेत. पुतीन यांच्या एकाधिकारशाहीच्या अंमलाला आव्हान देता येऊ शकते, हा दिलेला संदेश महत्त्वाचा. आगामी काळात काय घडू शकते, याची चुणूक दाखवणाराही आहे.

आता युक्रेनविरुद्धच्या युद्धावर त्याचे काय परिणाम होतात, हे पाहायला हवे. सारे जग हे युद्ध कधी थांबते, याकडे डोळे लावून बसले आहे. परंतु युद्धज्वर या बंडामुळे कमी होईल का, हे आत्ताच सांगता येत नाही.

रशियन गुप्तचर संस्था ‘केजीबी’मध्ये उच्चपदस्थ राहिलेल्या पुतीन यांनी साम्यवादी राजवट संपुष्टात आल्यानंतर राजकीय अवतार धारण केला. लोकशाहीचा देखावा करत अध्यक्ष, पंतप्रधान अशी पदे भोगत रशियन राज्यघटनेमध्ये विविध बदल करत आपली सत्ता भक्कम केली.

विरोधकांना नेस्तनाबूत केले. त्यांचा आवाज दडपून टाकला. प्रसंगी त्यांच्यावर विषप्रयोगही केले. अमेरिकी वर्चस्वाला शह देत पूर्वीच्या सोव्हिएत संघराज्याचा जागतिक दबदबा त्यांना स्थापित करायचा आहे. त्या झपाटलेल्या भावनेतूनच त्यांनी युक्रेन युद्धाचा घाट घातला.

या युद्धात ‘वॅग्नर’चा सहभाग महत्त्वाचा आहे. ‘पुतीनचा शेफ’ अशी प्रतिमा असलेल्या प्रिगोझीनची प्रतिमा बंडामुळे उजळ वाटली तरी ती मुळातच डागाळलेली आहे. भाडोत्री सैनिकांच्या म्होरक्या असलेल्या प्रिगोझीनच्या ‘वॅगनर’चे सीरिया, लीबिया, आफ्रिकेतील अनेक देशातले कारनामे घातक आहेत.

भ्रष्टाचाराने बरबटलेले हात असताना तो भ्रष्टाचार निपटण्याची भाषा करत होता. संरक्षणमंत्री सर्गेई शिगो, कमांडर गेराशिमोव्हवरील रागातून त्याने बंडाचे पाऊल उचलले होते. तथापि, त्याच्या पाठीशी असलेले भाडोत्री सैनिकांचे बळ मोठे आहे.

त्यातील अनेकजण रशियन लष्करातील निवृत्त आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. रशियाने युक्रेनवर युद्ध लादले. तथापि, त्यानंतर रशियाची अमेरिका, युरोपीय देशांसह साऱ्या जगाने सर्व आघाड्यांवर नाकेबंदी केली. आर्थिक, व्यापारविषयक परिणामांनी रशिया बेजार झाला आहे.

‘नाटो’च्या आव्हानाचे भूत पुतीन यांच्या मानगुटावरून उतरत नाही, त्यामुळे ते माघार घेण्याची शक्यताही नाही. मात्र त्यामुळे रशियनांच्या मनातील असंतोष, नाराजी आणि त्याची खदखद या बंडाने उघड झाली आहे.

त्याहीपेक्षा पुतीन यांची रशियातील सत्तेवरील पकड पोलादी आहे. तिला आव्हानही देता येत नाही, या समजुतीला या फसलेल्या बंडाने सुरुंग लावला.

युक्रेनवरील युद्ध काही दिवसच चालेल, अशी अटकळ होती. तथापि, दीड वर्ष उलटूनही ते संपण्याची चिन्हे नाहीत. त्याचे आपसूक दायित्व पुतीन यांचेच आहे. युक्रेनने रशियन लष्कराला कडवा प्रतिकार केला. ‘वॅग्नर’लादेखील अनेक ठिकाणी झुंजावे लागले.

एकुणात रशियन लष्कर अस्वस्थ, अस्थिर आणि मनोबल खचलेल्या अवस्थेत असावे, असे दिसते. जनता आणि लष्कराचे मनोधैर्य जेव्हा ढासळू लागते तेव्हा राज्यकर्त्यांची कितीही इच्छाशक्ती असली तरी ते युद्ध जिंकण्याची शक्यता दुरावत जाते, हे वास्तव आहे.

त्यामुळेच पुतीन यांचा निकटवर्ती प्रिगोझीनचे फसलेले बंड अनेक प्रकारचे संदेश साऱ्या जगाला देत आहे.

अमेरिकेने सध्या बघ्याची भूमिका घेतली असली तरी जी-७ सदस्यांमधील त्यावरील चर्चा निश्‍चितच भविष्यातील पावले ठरवू शकते. युक्रेनला एफ-१६ विमानांसह अन्य सामग्री हवी आहे, त्याची मागणी पुन्हा उचल खाऊ शकते.

गेल्या दोन वर्षांत कधी नव्हे एवढी रशिया-चीन मैत्री घनदाट होताना दिसत आहे. त्याचे जागतिक राजकारणावर पडसाद उमटत आहेत. स्वतःची सत्ता शाबूत राखणे, त्यावरील पकड आणखी घट्ट करण्यासाठी पुतीन आता चीनच्या आणखी आहारी जाण्याचा संभव आहे.

त्याने सत्तासमतोल आणखी बदलू शकतो. अमेरिका, रशिया आणि चीन या त्रिकोणात भारतीय राजनैतिक धोरण बसवले जात आहे. पुतीन यांच्या रशियन धोरणाशी पूरक व्यवहार आतापर्यंत आपण केलेला आहे.

तथापि, आगामी काळात बंडानंतर पुतीन यांची पडणारी पावले, त्यांचा सत्तेसाठीचा आटापिटा आणि त्याची दिशा लक्षात घेऊनच आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. एक मात्र खरे की, रशियामध्ये सर्व काही आलबेल नाही. तिथे अशांतता, अस्वस्थता अधिक वाढू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT