Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan अमळनेर येथील नियोजित ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार व कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी रविवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महामंडळाच्या सर्व घटक संस्था आणि संलग्न संस्थांची बैठक पुण्यात पार पडली.
या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या निवडीसह संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रम पत्रिकेवर देखील चर्चा झाली. बैठकीनंतर प्रा. तांबे यांनी संमेलनाध्यक्ष, संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली.
याप्रसंगी कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर तसेच सर्व घटक आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षपदासाठी यंदा डॉ. शोभणे यांच्यासह कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचीही नावे चर्चेत होती. त्यातही प्रवीण दवणे यांचे नाव आघाडीवर होते.
परंतु, महामंडळाच्या बैठकीत डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. शोभणे यांच्याव्यतिरिक्त चर्चेत असलेली नावे अधिकृतपणे सांगण्यास मात्र प्रा. उषा तांबे यांनी नकार दिला.
संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषाही या बैठकीत निश्चित करण्यात आली. त्यानुसार संमेलनाचा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी बालमेळावा होणार आहे. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन आणि ध्वजवंदन झाल्यानंतर संमेलनाचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
त्यानंतरच्या कार्यक्रमांमध्ये मुलांचा विशेष कार्यक्रम, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि ‘खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाखत, दोन परिसंवाद, दुपारी कथाकथन, एका जुन्या पुस्तकावर परिचर्चा, परिसंवाद, ‘खान्देश साहित्य वैभव’ हा विशेष कार्यक्रम आणि आजच्या कवींद्वारे जुन्या व नव्या कवितांचे सादरीकरण, हे कार्यक्रम होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.