Shravan  Dainik Gomantak
ब्लॉग

Shravan Month: श्रावणात शाकाहारच का?

लेकीसुनांचे हसरे चेहरे, नाचणारे पाय घरातल्या अंगणात दिसायचे. ’हसरा -नाचरा श्रावण आला’ याचा प्रत्यय यायचा.

गोमन्तक डिजिटल टीम

Shravan is an important month of the Marathi year वर्षातल्या बारा महिन्यांमध्ये श्रावणाचे अंमळ जरा जास्तच कौतुक होते. इथे गोव्यात तर श्रावण सुरू होण्यापूर्वीच त्याचा जोरात गाजावाजा असतो. एरवी पक्की मासेखाऊ मंडळीदेखील कडक श्रावण पाळतात हे बघून त्यांचे कौतुक वाटते.

आधी वीस दिवसांची मासेमारी बंदी मग महिनाभर श्रावण आणि श्रावण संपताच चतुर्थीचे दिवस येतात. जवळ जवळ दोन महिने मासळीपासून वंचित राहणे सोप्पे नाहीये. मागच्या आठवड्यात श्रावण थाळीवर लेख लिहिला आणि आमच्या ग्रुपमध्ये ’श्रावणात शाकाहारच का? मांसाहार का नको?’ यावर मोठी चर्चा झाली.

यात तरुण मंडळी म्हणाली ‘घरात श्रावण पाळतात म्हणून सगळं शाकाहारी असतं. घरी वेगळा पर्याय नसतो. पण आम्ही बाहेर मात्र मासळी -चिकन खातो.’ यातील अनेकांना श्रावणात शाकाहार करण्याची पद्धत का सुरू झाली असावी, याबाबत उत्सुकता होती. ठराविक पद्धतीच्या आहाराची सवय झालेली असताना महिनाभर शाकाहारी पदार्थ खाणे शिक्षाच वाटू लागलीय, असे या चर्चेतून मला जाणवले.

श्रावणात बनवल्या जाणाऱ्या गोडधोड पदार्थांचे इतके गोड पदार्थ अन्य कोणत्याच महिन्यात बनवले जात नसतील. पातोळ्या, गोड पोळे, मुठल्या, पायस याच काळात येणाऱ्या गावठी तवश्यांचे धोणस, या काळात उगवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या या साऱ्यांच्या चवींची केवढी मोठी विविधता अनुभवायला मिळते.

हे सगळे पदार्थ श्रावण सोडून नंतर कधी मुद्दाम करून खाऊन बघा. त्याला श्रावणातली चव येत नाही. नेत्रावळीला दारादारांत हळदीची पाने लावलेली असायची. ती दिसताच पातोळ्याची आठवण आपोआप यायची. श्रावणात याच हळदीच्या पानांना विशेष महत्त्व असते.

नागपंचमीला घराघरांत केल्या जाणाऱ्या पातोळ्यांना हळदीची पाने हवीच. पातोळ्या उकडायला ठेवताच घरभर दरवळणारा पातोळ्यांचा आणि हळदीच्या पानांचा सुगंध घरातले वातावरण बदलून टाकतो. श्रावण म्हणजे सात्त्विक आहार हे मनात रुजले ते या साऱ्या पदार्थांमुळे.

मी श्रावणाची विविध रूपे मनात साठवून ठेवली आहेत. पण यात कुठेतरी आहाराशी संबंधित, चविष्ट पदार्थांशी संबंधित आठवणी अधिक आहेत. वर्षभर न केल्या जाणाऱ्या आणि मुद्दाम श्रावणात केल्या जाणाऱ्या गोड पदार्थांना म्हणून तर महत्त्व आहे.

पूर्वी श्रावण सुरू होताच घरातील वडीलधारी मंडळी घरातल्या मुलींसाठी अंगणात झोका बांधून द्यायची. नागपंचमीचे खेळ याच अंगणात खेळले जायचे. या सणवारांच्या निमित्ताने लेकीसुनांचे हसरे चेहरे, नाचणारे पाय घरातल्या अंगणात दिसायचे. ‘हसरा -नाचरा श्रावण आला’ याचा प्रत्यय यायचा.

श्रावण महिलांसाठी खास

श्रावण म्हणजे उपासतापास, व्रतवैकल्ये, सणवार एवढेच नाही. माझ्या दृष्टीने श्रावण म्हणजे निसर्गसोहळा. निसर्गपूजेचा महिना. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाचे सदाहरित रूप डोळ्यात साठवून ठेवण्याचा महिना. या काळात निसर्गाचे रूप काही निराळेच असते. हिरवा शालू नेसून छान सजलेली नवीनवरी जशी!

श्रावण हा महिलांचा महिना, माहेरवाशिणींचा महिना असल्यासारखा वाटतो. प्रत्येक माहेरवाशिणीला माहेरी जायला निमित्त हवे असते. अख्खा श्रावण हाच माहेरची वाट धरायला निमित्त म्हणून येतो. नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा हे सगळे सण या एकाच महिन्यात येतात. हे सारे सण माहेरपण अनुभवत मायेच्या सावलीत साजरे करावेत असेच असतात.

यानिमित्ताने आईच्या हातचे गोडधोड खायला मिळण्यासारखे दुसरे सुख नाही. श्रावणातील सर्व सणवार, उत्सव, खेळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असते ती महिला. नागपंचमी, नारळी पौर्णिमा-राखीपौर्णिमा, मंगळागौर, रविवार पूजन, श्रावणी सोमवार - श्रावणी शुक्रवार यांची वेगवेगळ्या प्रकारची व्रत-वैकल्ये यांनी हा महिना भरून जातो.

घरातील महिला जर व्रतवैकल्ये -उपास करणाऱ्या असतील तर मग त्या आपल्या स्वयंपाकघरात मांसाहार कसा शिजवणार? यातूनदेखील शाकाहार संकल्पना रुजली असेल. श्रावण महिन्याला जरी धार्मिकतेची झालर असली तरी खऱ्या अर्थाने ही निसर्गाचीच पूजा आहे.

या काळात ज्या ज्या प्रतीकांची पूजाअर्चा केली जाते ती सर्व निसर्गातून उत्पन्न झालेली आहेत आणि याच निसर्गनियमाने आपल्या आहारातदेखील श्रावण महिन्याच्या रूपाने काही नियम घालून दिले तर नसतील ना, असे वाटत राहते.

श्रावणात शाकाहार कशासाठी?

ज्येष्ठ -आषाढातला भरपूर पाऊस पडून गेल्यामुळे श्रावण महिना येईपर्यंत सर्वत्र ओलसर हवा असते. कमी सूर्य प्रकाश अशा हवेत अनेक साथीचे रोग पसरतात. मुख्य करून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे मानलं जाते.

आयुर्वेदानुसार, श्रावण हा असा महिना आहे ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती सर्वांत कमी होते. या महिन्यात मांसाहारी, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ले तर रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनसंस्थेवर परिणाम होतो कारण मांसाहारी पदार्थ पचायला जड असतात आणि म्हणूनच या काळात सहज पचणारे हलके पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

हे सगळे झाले शास्त्रीय कारण, पण याच काळातील सणवार -व्रतवैकल्ये, उपास यामुळे घरी मांसाहारी पदार्थ शिजवले जात नाहीत. ’अमुक तमुक खाणं तुमच्या तब्येतीला ठीक नाही’ असे नुसते सांगून ऐकणारी मंडळी आहेत का? मग ती ऐकत नाहीत म्हणून धाक दाखवण्यासाठी देवाचे निमित्त आले असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT