History Of Goa: तिमय्या राष्ट्रद्रोही कसा?

जिप्तच्या सुलतानच्या ताफ्याचा नाश करण्यासाठी ‘रेड सी’मध्ये जाण्याऐवजी तिमय्या नावाच्या व्यक्तीने गोव्यावर हल्ला करण्यास ऍफोन्सो डी अल्बुकर्कला प्रवृत्त केले होते
History Of Goa
History Of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सुशीला सावंत मेंडीस

जिप्तच्या सुलतानच्या ताफ्याचा नाश करण्यासाठी ‘रेड सी’मध्ये जाण्याऐवजी तिमय्या नावाच्या व्यक्तीने गोव्यावर हल्ला करण्यास ऍफोन्सो डी अल्बुकर्कला प्रवृत्त केले होते, हे अनेक गोमंतकीयांना माहीत आहे.

History Of Goa
Goa Investment News: नवीन गुंतवणुकदारांची गोव्याकडे पाठ; गतवर्षीच्या तुलनेत गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्य मागे

पोर्तुगीज इतिहासकारांनी त्याला ‘तिम्मोजा’ म्हणून संबोधले. विजापूरच्या सुलतान युसूफ आदिल शहाच्या ताब्यात असलेला गोवा तेव्हा तुर्क आणि इजिप्शियन जहाज बांधणीचा एक तळ होता. १५१०मध्ये तिमय्याने पोर्तुगीजांना गोवा ताब्यात घेण्यास सक्रिय मदत केली. जरी इतिहासात त्याला देशद्रोही, हितशत्रू किंवा घरचा भेदी म्हणून नोंदवले गेले असले, तरी तो संशयाचा फायदा घेण्यास पात्र आहे.

पद्मभूषण आणि भारत-चीन संघर्षाच्या महत्त्वपूर्ण वर्षांमध्ये भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख (१९५७-६१) असलेले जनरल के. एस. तिमय्या यांच्याशी त्याचे नामसाधर्म्य. तिमय्याने यापूर्वी शांतता वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून काम केले होते जेव्हा १५०५मध्ये पहिले पोर्तुगीज व्हाईसरॉय डी. फ्रान्सिस्को दे आल्मेदा, गेर्सोपाच्या राजाशी युद्ध करत होते.

पांडुरंग पिसुर्लेकर (१९४१, कोलाबोरेड्स हिंदू दे अफॉन्सो डी अल्बुकर्क), माझे गुरू, डॉ. जोसेफ बॅरोस (लोकल कोलाबोरेड्स ऑफ अल्बुकर्क), बी. एस. शास्त्री (तिमय्या अँड हीज रिलेशन विथ पोर्तुगीज) आणि कार्मो अझावेदो (तिमय्या: अ क्विस्लिंग?) हे काही मोजके शोधनिबंध व लेख वगळता तिमय्यावर फारसे संशोधन झालेले नाही.

तिमय्याच्या राष्ट्रीयत्वाबाबत एकमत नाही. व्ही. टी. गुणे असे सुचवतात की तो मराठा होता, तर त्याचे नाव कन्नडिग असल्याचे दिसते. जुआंव द बॅरोस यांनी ‘सीरिज दे एशिया’ या त्यांच्या मालिकेत लिहिले आहे की तिमय्याला गोव्यात चिदंबर नावाचा एक भाऊ होता, ज्याने त्याला गोवा सोडण्यास भाग पाडले. कौटुंबिक मालमत्तेमधील त्याचा वाटा हिरावून घेतला आणि त्याची पत्नीही. इतकेच नव्हे तर त्याच्या मुलाचीही हत्या केली!

पोर्तुगीज इतिहासकार त्याला ‘जेंतिओ’ म्हणून संबोधतात. त्याच्या भावाच्या नावावरून त्याचा धर्म हिंदू किंवा पंथ जैन असावा. पोर्तुगीज इतिहासकार असलेल्या गेरसोपाच्या राजकुमारी जी. कोरिया यांनी आपल्या ‘लेंडस दे इंडिया’ या पुस्तकात तिमय्याचा उल्लेख मुस्लीम असा केला आहे. कार्मो अझावेदोदेखील तिमय्या मुस्लीम असण्याची दाट शक्यता असल्याचे मत व्यक्त करतात. त्याने विजयनगर साम्राज्यात ऍडमिरल व होनावरचे गव्हर्नर हे पद भूषवल्याचेही ते नमूद करतात.

आफोन्सो द आल्बुकर्कच्या पत्रांमध्ये(कार्तास ऑफ आफोन्सो द आल्बुकर्क), तिमय्या एक चांगला माणूस होता, असे नमूद केले आहे. जे. बॅरोस त्याचा ‘उच्च पदस्थ आणि महत्त्वाकांक्षी माणूस, पोर्तुगीजांचा मित्र बनण्यास उत्सुक’, असा उल्लेख करतात. इतर लोक त्याला ‘पोर्तुगीज राजाचा एक निष्ठावान सेवक, स्वयंघोषित वासल आणि एक इच्छुक सहयोगी’ म्हणून संबोधतात. टी. बी. कुन्हा आणि इवाग्रिओ जॉर्ज हे स्वातंत्र्यसैनिक तिमय्याला एक घरभेदी मानतात.

पोर्तुगीजांचे भारतात आगमन झाले तेव्हा भारताचे फक्त भौगोलिक अस्तित्व होते, परंतु आधुनिक अर्थाने ते ‘राष्ट्र’ नव्हते. भारतामध्ये अनेक राज्ये किंवा रियासती होत्या ज्या आपापसात अस्तित्वासाठी किंवा वर्चस्वासाठी लढत होत्या. काही सरदार हिंदू, काही जैन किंवा बौद्ध तर काही मुस्लिम होते. हिंदू आणि मुस्लिम शासक कधीच मित्र नव्हते.

विजयनगर साम्राज्याची स्थापना दक्षिणेतील मुस्लिम सत्तेच्या वाढीच्या विरोधात शेजारील मुस्लिम शासकांसह त्यांचे शत्रू म्हणून झाली. त्यामुळे जातीयवादाचे जंतू भारतीय इतिहासात नवीन नव्हते. पोर्तुगिजांनी सात शतकांहून अधिक काळ (७१२-१४९२) इबेरियन द्वीपकल्पावर कब्जा केल्याच्या दिवसापासून मुस्लिमांशी पोर्तुगिजांचे ऐतिहासिक शत्रुत्व होते. यावरून पोर्तुगीजांचा हिंदूंशी मैत्रीपूर्ण संबंध का होते व विजयनगर राज्याशी हातमिळवणी का केली, हे स्पष्ट होते.

१३६६ ते १४६९ या काळात १०० वर्षांहून अधिक काळ गोव्यावर विजयनगरचे राज्य होते. बहामनी शासक मोहम्मद शाह तिसरा याचा मंत्री मोहम्मद गवान याच्या हाती गोवा पडेपर्यंत बुक्काचा सेनापती माधव मंत्री याने गोव्याचा कारभार पाहिला होता. बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतर आणि दख्खनमधील पाच सल्तनतींच्या उदयानंतर गोवा विजापूरच्या सल्तनतीचा भाग बनला. आदिलशाहीच्या काळात, विजयनगरच्या दोन महत्त्वाच्या बंदरांपैकी होनावर आणि भटकळपेक्षाही गोव्याचे महत्त्व जास्त वाढले.

ही महत्त्वाची बंदरे व्यापारासाठी गमावली व विजयनगरचे राजे गोवा काबीज करू शकले नाहीत. त्यामुळे, त्यातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या जहाजांना रोखणे स्वाभाविक होते. किंबहुना कृष्णदेवरायाच्या सूचनेवरून तिमय्या तसे करत होता, असे म्हणण्यास वाव आहे. एवढेच नव्हे तर जहाजांनी नकार दिल्यास त्यांच्यावर हल्ला करून ती लुटली जात. त्यामुळे तिमय्या विजयनगरचा नौसेनाधिकारी म्हणून त्याच्या सम्राटाच्या आदेशानुसार वागत होता आणि त्यामुळे त्याला समुद्री डाकू मानले जाऊ शकत नाही.

History Of Goa
वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती! आता छातीच्या ‘एक्स रे’ वरून देखाल कळणार वय!

अल्बुकर्कला गोवा काबीज करण्यास मदत करण्यामागे तिमय्याकडे वैयक्तिक कारणेही होती. त्याच्या भावाने त्याचा वारसाहक्क काढून घेतल्याने, गोवा ताब्यात घेतल्यावर अल्बुकर्ककडून तो आपल्याला परत मिळेल, अशी त्याला आशा होती. फ्रान्सिस दी आल्मेदा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांना फक्त काही किल्ले आणि समुद्र किनाऱ्यालगत कारखाने असलेल्या भागाचे स्वामी बनण्यात रस होता. त्यांना कोणतीही प्रादेशिक महत्त्वाकांक्षा नव्हती.

पोर्तुगिजांनी एकदा गोव्याला मुस्लीम राजवटीतून मुक्त केल्यावर त्याच्या मदतीबद्दल त्याला बक्षीस मिळेल, गव्हर्नर किंवा किमान मासिक किंवा वार्षिक देय ठरावीक रकमेसह जहागीर मिळेल, अशी तिमय्याला आशा असावी. खरे तर पोर्तुगीजांना दिलेल्या सेवांसाठी, तिमय्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अल्बुकर्कने पेन्शन दिली.

अल्बुकर्कने समुद्रावर नियंत्रण ठेवण्याचे त्याचे आधीचे धोरण बदलून त्याच्या पूर्णपणे उलट वर्तन केले आणि त्याचे मुख्यालय गोव्यासह साम्राज्य उभारणीचे उद्दिष्ट ठेवले. तिमय्याचा असा विश्वास होता की गोव्याला विजयनगर साम्राज्याशी जोडल्यानंतर पोर्तुगालशी युती केली जाऊ शकते, ज्यामुळे दोघांनाही फायदा झाला असता.

यामुळे तिमय्या देशद्रोही कसा ठरतो? विजयनगर राज्याचा एक निष्ठावंत नौसेनाधिकारी म्हणून त्याने एका सामान्य शत्रूविरुद्ध पोर्तुगीजांची मदत घेऊन आपल्या राजाच्या हितासाठी काम केले. राष्ट्रीयत्वाची कल्पनेसाठी किंवा अस्मितेसाठी तो आणि त्याचे मित्र राजे एकत्र आले पाहिजेत, ही कल्पना त्यावेळच्या भारतातील राजकीय वातावरणाप्रमाणे त्यांच्या मनातही आली नसती.

अशा प्रकारे मी अझावेदो यांच्या युक्तिवादाशी सहमत आहे, की तिमय्या हा गोवाद्रोही किंवा देशद्रोही, हितशत्रू किंवा घरभेदी नव्हता. राष्ट्र किंवा राष्ट्रीयत्वाची कल्पना अस्तित्वात नसलेल्या भारताच्या तत्कालीन परिस्थितीचा, तिमय्या हा परिपाक होता!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com