प्रसन्न शिवराम बर्वे
आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ शक्ती आहे, असे मान्य केल्याशिवाय भक्ती संभवत नाही. भक्तीच्या अनेक व्याख्या आपल्याकडे केलेल्या आहेत. शांडिल्य ऋषी आणि नारद महर्षी यांनी त्यावर सूत्रे लिहिली आहेत. दुर्दैवाने आपल्या अभ्यासक्रमात ती नाहीत. पण, तरीही त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
भक्ती म्हणजे काय? भक्ताने कसे असावे व कसे नसावे, हे सूत्र रूपात त्यांनी मांडले आहे. शांडिल्य ऋषींनी भक्तीची व्याख्या करताना ‘सा परानुरक्तिरीश्वरे’ (चैतन्यशक्तीवर पराकोटीचे अनुरक्त होणे), अशी केली आहे.
नारदमहर्षींनी ‘सा त्वस्मिन् परप्रेमरूपा ॥१॥’ व ‘अमृतस्वरूपा च ॥२॥’, (प्रत्यक्ष, नित्य, आपल्यातच असलेल्या परमात्म स्वरूपावर परमप्रेम असणे हे तिचे स्वरूप आहे), असे भक्तीचे लक्षण कथन केले आहे. भक्ती करणे हा जीवाचा स्वभाव आहे. कारण जीव स्वतः अपूर्ण आहे, हे त्याला माहीत असते.
जिथे व जसे आपण अपूर्ण आहोत तिथे ज्याच्याकडून पूर्णत्व प्राप्त होईल त्याची भक्ती जीव करतो. या भक्तीत इच्छा, कामना, गुण, विकार, अज्ञान, मोह, भेदबुद्धी या सर्वांचे मिश्रण असते. ही सकाम भक्ती आहे.
सकाम भक्तीत इश्वराचे अस्तित्व अमान्य नाही. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून का असेना, पण इश्वराची भक्ती घडते. पण, ढोबळमानाने ही सुरुवात आहे, भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे. इथून पुढे प्रवास होणे गरजेचे आहे.
शास्त्रामध्ये भक्तीचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. अर्थार्थी, आर्त हीसुद्धा भक्ती आहे. भागवतामध्ये सात्विकी, राजसी, तामसी असेही भक्तीचे प्रकार सांगितले आहेत. उत्तम, मध्यम, अधम असे भेद सांगितले आहेत. रूपगोस्वामी यांनी साधनभक्ती, भावभक्ती, प्रेमभक्ती असे तीन प्रकार सांगितले आहेत.
परमप्रेमरूपा हा भक्तीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. संस्कृत साहित्य, दर्शने यामध्ये प्रेम, भाव आणि भक्ती यातला सूक्ष्म फरक व वेगळेपण अधोरेखित केले आहे. ‘भाव’ हे प्रेमाची प्राथमिक अवस्था आहे. भगवंताविषयी ममत्व असलेल्या, लोण्याहून मऊ अंत:करणातील पूर्णभावाला ‘प्रेम’ असे म्हटले आहे. म्हणूनच प्रेमभक्ती व भावभक्ती असे दोन प्रकार केले आहेत. संतसाहित्यात भक्ती आणि प्रेम साधारणपणे एकाच अर्थाने येते.
आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असते. जेवढी ‘मी आहे’ याची जाणीव आपल्याला कायम असते, तेवढीच ‘परमेश्वर आहे’ याची जाणीव कायम असणे म्हणजे भक्ती. आठवून पाहिल्यास लक्षात येईल की, परमेश्वर आपल्याला अडीअडचणीत, दु:खात आठवतो. एरव्ही कायम आठवत नाही.
आपण लहानपणी जत्रेच्या निमित्ताने देवळात जातो. वाटेत फुगे, खेळणी, खाजे यांची दुकाने व साखरेच्या गुलाबी रंगीत बाहुल्यांकडे आपले लक्ष असते. कधी एकदाचे आईबाबांचे देवाला पाया पडून होते आणि कधी एकदा आपण त्या दुकानात जातो, असे आपल्याला होते. थोडे वयात आल्यावरही आपण जात्रेत जातो.
आकर्षणाच्या जागा बदललेल्या असतात. साखरेच्या गुलाबी रंगीत बाहुल्यांऐवजी आपले लक्ष चालत्याबोलत्या प्रेक्षणीय बाहुल्यांकडे असते. काही वर्षे गेली की, नोकरी मिळावी, संसार सुखाचा व्हावा या इच्छेने आपण देवळात जातो. संसारात पडल्यावर बायको-मुलांसह सांसारिक कटकटी कमी व्हाव्यात म्हणून देवळात जातो. म्हातारपणी वेळ जात नाही, घरातली भांडणे असह्य होतात म्हणून देवळात जातो. देवासाठी कधी जातो? देवासाठी म्हणून देवळात कधीच जात नाही; आपण आपल्यासाठीच देवळात जातो!
हे चुकीचे आहे का? नाही. पण, आयुष्यभर केवळ स्वत:साठीच देवाची भक्ती करणे चुकीचे आहे. काहीच मागायचे नाही, कशाचीच तक्रार करायची नाही आणि तरीही देव आपल्याइतकाच आपल्याला जाणवत, आठवत असेल तर आपण भक्तीमध्ये काहीतरी साध्य केले असे म्हणता येईल.
देव आठवत नाही, असा जगात कुणीच नाही. फक्त देव आठवण्याच्या जागा वेगवेगळ्या आहेत. कुणाला दु:खात आठवतो, तर कुणाला सुखात आठवतो. आस्तिकाला भक्ती करताना आठवतो, तर नास्तिकाला देवाचे अस्तित्व नसल्याचे सिद्ध करताना, वाद करतेवेळी देव आठवतो.
नास्तिकांचे म्हणणे असते की, ‘देव आहे तर तो दाखवा. दाखवता येत नसेल तर ‘देव आहे’ ही तुमची श्रद्धा आहे’. तसाच तर्क मांडायचा झाला तर ‘देव नाही’ हेसुद्धा दाखवता येत नाही व त्यामुळे ‘देव नाही’ हीसुद्धा नास्तिकांची श्रद्धाच ठरते.
‘देव सर्वत्र आहे, तर मग मूर्ती कशाला पुजायची?’ असा एक तर्क मांडला जातो. पण, हा तर्क मांडणाऱ्याला ‘देव सर्वत्र आहे’ हेच मुळात मान्य असत नाही. तो फक्त वाद घालण्यासाठी तसे म्हणतो. कारण देव सर्वत्र आहे, हे मान्य केल्यास तो मूर्तीतही आहे हे मान्य करावे लागते व मूर्तीची पूजा करायला आक्षेप घेण्यात काही अर्थ उरत नाही.
जी नास्तिकांची अवस्था तीच आस्तिकांचीही असते. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीच्या कुठल्याही पायरीवर आपण देवाजवळ कितीवेळ असतो किंवा ‘देव आहे’ ही जाणीव आपल्यात किती वेळ असते याचा विचार केल्यास लाजेने मान खाली जाते.
एका जागी बसून साधी पूजा करतानाही आपण कुठे कुठे भटकत असतो! जे नामजप करतात त्यांनी एक साधा प्रयोग करून पाहावा. नामस्मरणाचा आणि श्वासांचा संबंध काढून टाकावा. केवळ मनाने जप करून पाहावा.
भजन किंवा कीर्तन करताना देव किती वेळ आपल्याजवळ होता व आपण किती वेळ देवाजवळ होतो, याचा हिशेब मांडावा. ‘देव आहे’ याची जाणीव आपल्यात किती वेळ होती, आपण करत आहोत तिला भक्ती म्हणावे का व आपण भक्त आहोत का, हे लक्षात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.