Festival Dainik Gomantak
ब्लॉग

सांजाव : ओसली फेस्तां वर्सा कित्याक दोन फावटी येयना?

सां जुआंव हे दरवर्षी साजरे होणारे कॅथलिक फेस्त आहे. हे फेस्त सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरे होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सुशीला सावंत मेंडीस

Festival अल्वारिस यांचे हे गीत दरवर्षी 24 जून रोजी मी ऐकते. मला आठवते लहानपणी, लहान मुले हातात पिराडे घेऊन वेळ्ळी येथील आमच्या घरी यायची आणि दरवाज्याला ‘जुदेव’ म्हणत ओरडत.

मला आठवते की, नववधू म्हणून असोळणा येथे पहिल्यांदा आले तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की, ‘आम्हाला आमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ काही बदल करण्याची गरज आहे.

कारण त्या दिवशी तरुण मुले गटात येतील आणि आम्हाला काही पैसे ठेवावे लागतील त्यांच्या हातात’. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुलांसोबत मुलींनी कधीच सहभाग घेत नसत. हा सगळा प्रकार पुरुष लोकांचाच होता.

सां जुआंव हे दरवर्षी साजरे होणारे कॅथलिक फेस्त आहे. हे फेस्त सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या (हे सेंट जॉन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी एक होते ते नव्हे) वाढदिवसाच्या निमित्ताने साजरे होते. जॉन द बॅप्टिस्ट त्यांच्या आईच्या, एलिझाबेथच्या पोटात असताना तिची चुलतबहीण व्हर्जिन मेरी तिला भेटायला आली.

व्हर्जिन मेरीने जेव्हा आपण पोटुशी असल्याची वार्ता ऐकवली तेव्हा एलिझाबेथच्या पोटात असलेल्या जॉन द बॅप्टिस्ट यांनी अत्यानंदाने आईच्या पोटात उडी मारली, अशी एक कथा ख्रिस्ती पंथाच्या एका ग्रंथामध्ये येते.

या क्षणाच्या स्मरणार्थ हा सण संपूर्ण ख्रिश्चन जगतामध्ये साजरा केला जात असताना, गोवा हे एकमेव ठिकाण आहे जिथे तो सर्व वयोगटातील लोकांसह साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक जमतात, हा पावसाळा चांगला जावो यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर विहिरी, तलाव आणि नाल्यांमध्ये उडी मारली जाते.

हा सण गोव्यात उत्तरेकडील विशेषत: शिवोली, अंजुणा, कांदोळी, कळंगुट आणि आसगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दक्षिणेत हे फेस्त थोडे वेगळ्या स्वरूपाचे व अधिक गंभीर असते.

गरोदर स्त्रिया व तसेच ज्यांची नुकतीच लग्ने झाली आहेत अशा नववधू स्त्रिया फळे, अननस यांसारख्या हंगामी फळांची टोपली आणि फेणी घेऊन जमतात. तरुण पहिलटकरणी सुरक्षित आणि प्रसूती सामान्यपणे व्हावी साठी आशीर्वाद घेतात. हा सण प्रजननक्षमतेचा उत्सव म्हणूनही मानला जातो.

२४ जून हा दिवस ऍनन्सिएशन फेस्ताच्या तीन महिन्यांनंतर येतो. देवदूत गॅब्रिएलने मेरीला सांगितले की तिला मुलगा होईल आणि तिची चुलत बहीण, एलिझाबेथ आधीच सहा महिन्यांची गर्भवती होती.

ख्रिसमसच्या नऊ महिने आधी ऍनन्सिएशन फेस्त साजरे केले जाते. सेंट जॉन बाप्टिस्टच्या जन्माचा उत्सव साजरा करणारी ही मेजवानी ख्रिश्चन चर्चच्या सर्वात जुन्या सणांपैकी एक आहे, ख्रिश्चन जग हा सण इसवी सन ५०६Aपासून साजरा करत आहे.

सेंट जॉन जेव्हा मोठे झाले तेव्हा ते वाळवंटात राहत होते. फळे, फुले वनस्पतींपासून तयार केलेला पोषाख ते घालत असत. ओलिविन्हो गोम्स यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, जेव्हा येशू तीस वर्षांचा होते तेव्हा त्यांचा बाप्तिस्मा सेंट जॉन यांनी जॉर्डन नदीत केला होता. हे फेस्त म्हणजे येशू ख्रिस्ताच्या या बाप्तिस्म्याची आठवण म्हणूनही साजरे केले जाते.

गोव्यात हा सण साजरा केला जातो तेव्हा सामान्यतः पावसाळा सुरू झालेला असतो आणि पाणवठे भरलेले असतात. परिसर हंगामी फुलांनी व फळांनी डवरलेला असतो. या दिवशी लोकांचे गट घुमट, कासाळें आदी पारंपरिक वाद्यांसह लोकगीते गात गावात फिरतात.

२३ जून रोजी या फेस्ताच्या पूर्वसंध्येला, शिवोली आणि शापोरा या गावांमध्ये, ज्यूदेव-एक ज्यू, त्याचा पुतळा घरोघरी घेऊन जाण्याची परंपरा आहे. जुने कपडे, वर्तमानपत्रे, गवत आणि त्यात काही फटाके टाकून हा पुतळा बनवला जातो. सूर्यास्तानंतर गावकरी शापोरा येथील होली क्रॉस कपेलजवळ एकत्र जमतात.

प्रार्थना केली जाते आणि नंतर हा पुतळा घरोघरी नेला जातो. या पुतळ्याला जाळले जाते आणि ‘सां जुआंव सांगोड, कुरपेचो धुवोर, जुडेवाचो गोबोर, जुदेवाचो गोबोर’, असे गाणेही म्हटले जाते. पेटलेल्या पुतळ्याची आग, ‘बोडोय बोडोय’ असे ओरडत माडाच्या चुडतांनी पुतळ्याला बडवून विझवली जाते.

त्यानंतर कुटुंबीयांना काही अल्पोपहार आणि फेणी देतात. काही ठिकाणी फेणीची जागा आता वाइनने घेतली आहे. पुतळ्याचे दहन करण्याआधी त्याच्या भोवती राखेने जागेची आखणी केली जाते.

शापोरा आणि माणेवाड्यावरचे लोक आखलेल्या सीमेच्या दोन्ही बाजूला उभे राहतात. एकदा रेषा आखली की तिला ओलांडता येत नाही व मध्यभागी पुतळा जाळला जातो. आग विझेपर्यंत गाणी गायली जातात.

शिवोलीमध्ये जुदेवाचा पुतळा नसतो, पण घरोघरी जाऊन शेकोटी पेटवण्याची परंपरा आहे. डिक्रूझ वाडा, नोरोन्हा वाडा, बामण वाडा, परेरा वाडा आणि फर्नांडिस वाडा यासह शिवोलीचे काही प्रभाग ही प्रथा साजरी करतात.

अंधार पडल्यावर उत्सव सुरू होतात आणि अवर लेडी ऑफ सेव्हन सॉरोज आणि सेंट अँथनी कपेलसारख्या कपेलमध्ये प्रार्थना केल्या जातात. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक भोजनाने होते.

पोर्तुगालच्या पोर्तुमध्ये भर उन्हाळ्यात २३ जूनच्या मध्यान्ही मोठ्या प्रमाणावर हे फेस्त साजरे केले जाते आणि सहसा २४ जूनच्या सकाळपर्यंत चालते. सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक शहराच्या मध्यभागी येतात. याला ‘फेस्ता दे साओ जोओ द पोर्तु’ असे म्हणतात.

उत्सवामध्ये बोनफायर, फटाके आणि मेजवानी, मद्यपान, रस्त्यांवर सजवलेल्या मिरवणुका यांचा समावेश असतो. पोर्तुमध्ये सहा शतकांहून अधिक काळापासून हा उत्सव साजरा केला जात आहे. पोर्तुच्या लोकांमध्ये फुले किंवा प्लास्टिकच्या मऊ हातोडीने एकमेकांना मारण्याची परंपरा आहे.

भाजलेला सार्डिन मासा, मांस आणि वाइन पिणे हा या उत्सवाचा एक भाग आहे. प्रकाशित ज्योत वाहक असलेले फुगेदेखील पोर्तु क्षितिजावर चमकत उत्सवाची रंगत वाढवतात.. पोर्तुच्या नदीकाठच्या गाभ्यापासून -रिबेरापासून फोझमधील समुद्राच्या बाजूपर्यंत आणि मातोसिन्होसच्या जवळच्या उपनगरापर्यंत एका सीमांकित मार्गाने लोक चालतात.

ते समुद्राजवळ सूर्योदयाची वाट पाहतात आणि नंतर कधी कधी समुद्रस्नानाचा आनंदही लुटतात. हे फेस्त पोर्तुगालच्या बाहेर तुलनेने तेवढेसे माहीत नाही. पोर्तुगालशी गोव्याचा संबंध आल्यामुळे हे फेस्त गोव्यातही साजरे केले जाते.

शिवोलीमध्ये दोन बोटींवर रंगीबेरंगी चित्ररथांसह हे फेस्त पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. संतांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी सेंट अँथनी चर्च, शिवोली येथे पोहोचेपर्यंत या बोटी शापोरा, झर, बादें आणि गुडेमधून जातात.

साळगावात ‘वांगोड द साळगाव’ हा सण नृत्य आणि संगीताचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. परंपरा म्हणून गावकरी सर्व पाहुण्यांना जेऊ घालण्यासाठी आतुर असतात.

या वर्षी खास करून पर्यटकांसाठी शिवोलीमध्ये सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एक म्हणजे कधीही वेळेवर सुरू न होणाऱ्या इव्हेंटच्या माध्यमातून फेस्तांचे व्यावसायिकीकरण करणे चुकीचे आहे.

गोव्यातील चर्चनेही याला पाठिंबा दिला नाही. गोव्यातील गावांमध्ये वर्षोनुवर्षे चालत आलेल्या परंपरेला न जुमानता हा कार्यक्रम पहिल्यांदाच साजरा केला जात आहे. मूळ उत्सवाची ही घाणेरडी नक्कल आहे. त्यामुळे त्यावर जोरदार टीका होत आहे.

गोव्यातील फेस्त, जत्रा आणि सण ही आपली संस्कृती आहे, तो आपला अद्वितीय वारसा आहे. केवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे व्यापारीकरण केले जाऊ नये. अशा गोष्टींपासून फेस्तांचे, जत्रांचे संरक्षण होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT