Greek Sculptures Dainik Gomantak
ब्लॉग

Greek Sculptures: श्रमिकांच्या प्रचंड पिळवणुकीचे आरसे

शरीरसौष्ठव्य हा स्त्री-पुरुषांचा सौंदर्याचा मापदंड मानला जाई.

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

प्राचीन काळात अथेन्समध्ये अनेक व्यायामशाळा होत्या. आरोग्य, सौंदर्य, खेळांत नैपुण्य व युद्धात अजिंक्य बनता यावे या चार दृष्टिकोनातून ग्रीक समाज व्यायामाला महत्त्व द्यायचा. शरीरम् खलु धर्मसाधनम् हे शहाणपण ग्रीक समाजाला होते.

शरीरसौष्ठव्य हा स्त्री-पुरुषांचा सौंदर्याचा मापदंड मानला जाई. व्यायामशाळेत व्यायाम करणारे पुरुष नग्न असत. अनेक चित्रकार, शिल्पकार पुुरुषदेहाचा अभ्यास करण्यासाठी व्यायामशाळेत येत. या कलाकारांना नग्न पुरुषदेहाविषयी अदम्य आकर्षण होते.

सापेक्षतेने विचार केल्यास ग्रीक शिल्पे देवताप्रधान नसून मनुष्यकेंद्रित आहेत हे ध्यानी येते. पुरुषांची शिल्पे पूर्ण नग्न असावीत आणि स्त्रियांची शिल्पे त्यांची नग्नता दिसावी अशा पारदर्शक वस्त्रांत केलेली असावीत असा दंडकच ग्रीक शिल्पकलेत होता.

ग्रीक शिल्पकार प्रत्येक शिल्पात आणि मूर्तीत प्राणतत्व ओतत असत. किंबहुना ते स्वतःलाच त्या शिल्पात ओतत असत. साहित्यासहित सर्व दृकश्राव्य कलांत हे असे कलाकारांचे ‘ओतणे’ महत्त्वाचे असते. ग्रीक शिल्पकारांना हे सर्जनशीलतेचे प्रवाही तत्त्व माहीत होते. त्यामुळे त्यांची शिल्पे जिवंत वाटत. सजीव वाटत. सेंद्रिय वाटत.

ग्रीक चित्रकला असो, शिल्पकला असो किंवा कुंभकला (पॉटरी) असो, घोडा हा ग्रीक कलाकारांचा आवडता प्राणी होता. इ. स. पू. ४००० वर्षांपासून घोड्याला माणसाने पाळीव पशू बनवला. घोड्यामुळे मानवी संस्कृतीचे स्थलांतर शक्य झाले. घोडे असलेल्या सैन्याने घोडे नसलेल्या सैन्यावर विजय मिळवला.

ग्रीक शिल्पकारांनी उमद्या घोड्यांची शिल्पे तर केलीच, काही वेळा त्यांनी पंख असलेले उडते घोडे बनवले. त्यांना ‘पेगॅसस’ म्हणत. काही वेळा माणसाचे तोंड व घोड्याचे शरीर असलेले ‘सेन्टोर्स’ बनवले. झेनाफोनने (इ. स. पू. ४३०-३५४) घोड्यांची निवड कशी करावी, घोड्यांची निगा कशी राखावी, घोडेस्वारी कशी करावी याचे मार्गदर्शन करणारा हॉर्समनशिप नावाचा शास्त्रीय ग्रंथ लिहिला.

घोड्यांच्या शर्यती, घोडे बांधलेल्या रथांच्या शर्यती, हा ग्रीक नागरिकांचा आवडता विरंगुळा होता. ग्रीक संस्कृतीने घोड्यांवर जेवढे प्रेम केले तेवढे अन्य कोणत्याच लोकसमूहाने केले नसावे. आपल्या पुराणात घोड्यांचे शास्त्रीय ज्ञान असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे पाच पांडवांपैकी नकुल. भारताच्या प्राचीन इतिहास अश्वगामी कधीच नव्हता. तो गजगामी होता.

घोडेस्वाराला रणांगणांत मृत्यू आला तर त्या घोडेस्वाराच्या शिल्पातला एक पाय हवेत असतो. शिल्पातल्या घोड्याचे चारही पाय जमिनीवर असले तर तो घोडेस्वार रणांगणावरून सुखरूप परत आला, असे समजावे ही गोष्ट मला ग्रीसला भेट देण्यापूर्वी माहीत नव्हती. या नियमाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजाच्या किंवा झांशीच्या राणीच्या शिल्पांतील घोड्याचा पाय वर हवेत असता कामा नये.

पण जो नियम ग्रीक शिल्पकारांनी पाळला तो भारतीय शिल्पकारांना माहीत नसावा किंवा तो त्यांनी पाळला नसावा. कारण शिल्पांतील घोड्याचा एकच काय दोन्ही पाय वर असले तर त्या घोड्याचे व घोडेस्वाराचे शिल्प अधिक सुंदर दिसते हे भारतीय शिल्पकारांना अनुभवांनी कळले असावे.

प्राचीन ग्रीसमध्ये ऍमेझॉन्स नावाच्या लढवय्या स्त्रिया होत्या. त्यांचे स्वतःचे सैन्यदल होते. सैन्यांत सामील होण्यापूर्वी या स्त्रिया आपला उजवा स्तन कापून टाकत. ग्रीसमध्ये या ऍमेझॉन स्त्रियांची शिल्पेदेखील आपल्याला पाहायला मिळतात.एखादा समाज सर्जनशील कसा होतो?

समाजातील सर्व घटकांना दर्जाची व संधीची समानता लाभते तेव्हा तो समाज वर्धिष्णू होतो असे आजचा उदारमतवादी विचार मानतो. ग्रीक समाजाची भूमिका वेगळी होती. समाजातील विशिष्ट घटकावर श्रमाची कामे करण्याचे बंधन नसावे.

त्यामुळे त्यांना सर्जनशील उपक्रमासाठी फुरसतीचा वेळ मिळावा म्हणून समाजातील काही लोकांवर समाजधारणेस आवश्यक श्रम करण्याची सक्ती असावी असे ग्रीक समाज मानत असे. या समजातून गुलाम पद्धत आली. खुद्द सॉक्रेटिस, प्लूटो व ऍरिस्टॉटल या श्रेष्ठ तत्त्वज्ञांनीही गुलाम पद्धतीचे समर्थन केले.

पार्थेनॉन असो, पिरॅमिड असो, ताजमहल असो, चीनची लांब भिंत असो - या वास्तू जेवढ्या प्रेक्षणीय आहेत तेवढ्याच तत्कालीन समाजातील श्रमिकांच्या प्रचंड पिळवणुकीचे हे आरसे आहेत याचा आपल्याला विसर पडता कामा नये. या वास्तू तत्कालीन राज्यकर्त्यांच्या अहंकारवर्धनाचा दृश्यावतार आहेत.

सम्राट अशोक, अकबर, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या लोकाभिमुख राजांना अशा भव्य वास्तू बांधाव्यात असे वाटले नाही. जेव्हा राजे, महाराजे, देवळे, राजवाडे यांच्या प्रचंड वास्तू बांधण्यात मग्न असतात तेव्हाच त्या राजेशाहीच्या अंतकालाची सुरुवात होत असते, याची साक्ष इतिहासाने अनेक वेळा दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT