Lake in Goa: दक्षिण गोव्यातल्या केपे तालुक्यात येणाऱ्या काकोडा गावातल्या नंदा तलावाचा समावेश आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पाणथळांच्या यादीत झाल्याकारणाने, विस्मृतीत गेलेला हा गोमंतकीय लोकमानसाच्या जलसंस्कृतीच्या संचिताचा वारसा प्रकाशझोतात आला आहे.
एकेकाळी कृषिप्रधान असलेल्या काकोडा गावातल्या कष्टकरी जातीजमातींनी आपल्या मेहनतीने या तलावाचे खोदकाम् शेकडो वर्षांपूर्वी करून जलसंवर्धनाचा आदर्श प्रस्थापित केला होता.
जुन्या काळी चंद्रवाडी-बाळ्ळी महालात येणाऱ्या काकोड्यात कृषी संस्कृतीशी निगडीत बारा बलुतेदारीशी साधर्म्य असणारी व्यवस्था होती. शेती व्यवसायामुळे पारंपरिक कलाकार, कारागिरांचे वास्तव्य पूर्वापार इथे होते.
लोह खनिज उत्खनन, वाहतूक आणि निर्यातीच्या व्यवसायाला राजाश्रय लाभण्यापूर्वी काकोड्यात सुजलामता, सुफलामता होती आणि त्यामुळेच खाऊन, पिऊन सुखी असणाऱ्या या गावात नाना जाती, जमाती आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते.
पावसातल्या कोसळणाऱ्या पाण्याला वृक्षवेलींनी नटलेले डोंगर भूगर्भात साठवून ठेवायचे आणि त्यातले हे पाणी बारा महिने अखंड वाहत काकोड्यात यायचे. इथल्या सुपीक जमिनीत पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भातशेती करण्यासाठी, त्यांनी निसर्गदत्त उपलब्ध पाण्याला साठवण्यासाठी महाकाय अशा नंदा तलावाची निर्मिती केली.
काकोडा हा महादेव, बेताळ, सातेर, सिद्ध, भूमिपुरुष, वाघो, पाईक, विठ्ठल, मारुती... आदी दैवतांची कृपा लाभलेला गाव, वृक्षवेलींच्या वैभवाने नटलेला होता.
त्या आदिम वसाहतकारांच्या जगण्याला प्रेरणा देणारा म्हारूदेव असो अथवा हिंदू-मुस्लीम एकात्मतेची वीण घट्ट ठेवणारा वीर असो काकोड्यातल्या प्रचलित सण-उत्सव, लोकगीतांतून समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.
परिसरातल्या जंगला तून येणाऱ्या पाण्याचा शेती, बागायतीची पिके घेण्यासाठी उपयोग करण्यासाठी लोकांनी सामूहिकरीत्या तलावाचे खोदकाम करून पावसाळ्यातल्या पाण्याचा जीवनदायी साठा आपल्या गावात निर्माण केला आणि नंदातल्या गोकुळासारखे इथल्या कष्टकरी, पशुपालकांचे जगणे आनंदी ठेवण्यात महत्त्वाचे योगदान केल्याने त्याचे नामकरण नंदा तलाव असे केले.
काकोड्यातल्या काकुमड्डी, घाडीवाडा, करमलीवाडा आणि बेलमड्डी अशा चार वाड्यांच्या सीमांना भिडणारा हा जलाशय पूर्वापार इथल्या लोकधर्माशी आणि संस्कृतीशी निगडीत होता. उपलब्ध बारमाही जलाशयाच्या नियोजनावर सिंचनासाठी उपयोग करण्याचा वारसा इथल्या लोकमानसाने जतन केला होता.
ग्रीष्म ऋतू माथ्यावर आला की नंदा तलावात बाबरी, नेरमार खचरोसारख्या भाताची शेर्पा तरारून आल्यावरती त्याची लागवड करायचे आणि गणेशचतुर्थीच्या उत्सवानंतर भात कापणी करून, या तलावात जलसंचय करण्यासाठी सारा गाव बांध घालण्यासाठी एकत्र यायचा.
हिवाळ्यातल्या बाणसातल्या वायंगणी शेतीला आणि मोसमी भाजीपाला, कांदा, मिरचीसारख्या पिकांना जलसिंचनाची सुविधा सिमेंट- काँक्रीटचे धरण आणि आधुनिक पाट बंधाऱ्यांची योजना नसताना ग्रामसंस्था उपलब्ध करून द्यायची.
विजयादशमीला तलावात पाणी साठवण्यासाठी बांधाची उभारणी करण्याची मुहूर्तमेढ रोवली जायची. उन्हाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध होईल यासाठी लोकमानसाने काकोड्यात नियोजन केले होते.
गोवा घटक राज्याच्या निर्मितीनंतर लोह खनिज व्यवसायाला गती लाभली आणि इथल्या शेती, बागायतीच्या समृद्ध जमिनीत खाणमाती आणि गाळ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आल्याने त्याचा दुष्परिणाम नंदा तलावाच्या अस्तित्वाबरोबर गावातल्या लोकजीवनावर झाला.
भाताच्या दाण्यागोट्याने आणि दूधदुभत्या गाई म्हशींनी समृद्धी अनुभवणारा काकोडा आपले गतवैभव खाण व्यवसायाच्या कोंडीत हरवत गेला आणि हां हां म्हणता लोकमानसाच्या स्मृतीतून नंदा तलाव गायब झाला.
पोर्तुगीज अमदानीतल्या मराठी भूगोलाच्या पुस्तकात ज्या नंदा तलावाचा उल्लेख व्हायचा, तो जैविक संपदेचे भरणपोषण करणारा जलाशय आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करू लागला.
गोवा राज्य जैवविविधता मंडळाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी कुडचडे काकोडा नगरपालिका क्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या नंदा तलावाला गतवैभव देण्याच्या हेतूने त्याचा समावेश गोव्यातल्या पाणथळांच्या यादीत केला.
केपे तालुक्यातील शेल्डे आणि कोठंबी, सासष्टी तालुक्यातील चिंचणीतील सार्जोरा, बार्देशातील रेवोड्याचा धाशी, तिसवाडीतील चिंबल येथील तोयर अशा तलावांना पाणथळीच्या जाग्याच्या यादीत समावेश केला.
42 सेक्टर क्षेत्रफळात पसरलेला हा तलाव काकोडा गावातल्या नैसर्गिक वारसा स्थळाच्या परंपरेचे संचित असून, एकेकाळी शेती, बागायतीबरोबर दैनंदिन वापरासाठी गरजेच्या पाण्याचा पुरवठा करणारा महत्त्वाचा जलस्रोत ठरला होता.
पाणकावळा, बगळा, ढोक, कंकर, बदक, पाणकोंबडी टिटवी, पियू, कवडी, कोकीळ, घुबड, खंड्या, नीळकंठ, धनेश, तांबट, सुतार, पंकोळी, कोतवाल, कन्हई, बुलबूल, सातभाई सुगरण अशा नानाविध पक्ष्यांच्या प्रजातींसाठी हा तलाव नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे.
खवले मांजर, ऊद, साळिंदर, वटवाघूळ, कोल्हा, मुंगूस यासारख्या प्राण्यांबरोबर सरपटणाऱ्या साप, सरडे, घोरपड आदी प्राण्यांचा वावर या जलाशयात प्रामुख्याने पाहायला मिळत होता.
आगामी आणि भविष्य काळासाठी जलस्रोतांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी पाणथळीच्या जागा महत्त्वपूर्ण असल्याकारणाने इराणमधील रामसर शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळांचे संवर्धन करण्याचा ठराव आंतरराष्ट्रीय स्तरावरती मंजूर झाला.
1975 पासून या ठरावाची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने 1982 पासून रामसर पाणथळ ठराव स्वीकारला आणि जैवविविधतेने समृद्ध जलस्रोतांना पाणथळाचा दर्जा प्रदान केला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करताना भारत सरकारने 75 तलावांना रामसर 8 ठरावांच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
त्यात काकोड्यातल्या नंदा तलावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता लाभणे हे गोवा राज्याच्या गौरवाचे संचित आहे.
नंदा तलाव हे गोव्यातल्या नैसर्गिक वारसा स्थळाच्या यादीतला शिरपेच असल्याकारणाने राष्ट्रीय जैवविविधता मंडळाने पाणथळ दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 8 फेब्रुवारीला पाणथळ संवर्धन राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ देशभरातल्या 75 पाणथळीच्या व्यवस्थापकांना निमंत्रित करून गोव्यात साजरा करण्याचे ठरवलेले आहे.
नंदा तलावाच्या गतवैभवाला उजाळा देताना गोव्यातल्या गावोगावी असणारे तलाव, तळ्या, विहिरी, झरे आदी जलस्रोतांच्या संवर्धनाची आणि संरक्षणाची चळवळ समृद्ध करण्याची नितांत गरज आहे.
एकेकाळी शेती, बागायतीला संजीवनी देणारा हा तलाव काकोडातल्या लोकमानसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित होता आणि लोक सहभागातून त्याची अभिवृद्धी महत्त्वाची बाब ठरलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.