Mamta Banarji Dainik Gomantak
ब्लॉग

ममतांची चाल कुणाला तारील?

निवडणुकीचे तिकीट आणि निवडणुकीचा खर्चही देण्याची क्षमता बाळगणारा एक नवा पक्ष शेकडो मैलांचा प्रवास करून पुन्हा एकदा गोव्यात आलाय आणि आल्याआल्या त्याच्या गळ्याला लुईझिन फालेरो हा कथित बडा मासा लागला आहे.

दैनिक गोमन्तक

फालेरो समवेत काही चिल्लर मासे आहेत आणि येत्या काही दिवसांत अन्य छोट्यामोठ्या माशांची आवक या नव्या पक्षात होण्याची शक्यता आहे. जसजसे अन्य पक्षांचे उमेदवार स्पष्ट होत जातील तसतसे तेथे डाळ न शिजलेले तिकिटेच्छुकदेखील एक पर्याय म्हणून तृणमूलचाही विचार करतील. एकंदर पाहाता तत्त्वविक्रीच्या बाजाराला ममतादीदींच्या तृणमूलने जोरकस सुरुवात करून दिलेली आहे.

लुईझिन फालेरो यांचे राजकीय मूल्य काय, असा प्रश्न आता कॉंग्रेसवालेही विचारू लागतील. फालेरोंचे आसन खुद्द नावेली मतदारसंघात डळमळीत झाले असल्याने त्यांनी फार तर आपल्या मतदारसंघापुरतेच पाहावे, पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्याची धडपड करू नये असे कॉंग्रेसच्या अन्य चारही आमदारांसह पक्षातील बऱ्याच मोठ्या गटाचे म्हणणे होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फालेरोंनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारलाय. म्हणजे, ते आता कॉंग्रेसला आपले उपद्रवमूल्य दाखवून देणार आहेत. मिकी पाशेकोसारख्या आयात शुंभाकडून फालेरोंची संभावना अस्सल सासष्टींतल्या कोकणीतून ‘म्हात्रो’ म्हणून करवून घेणाऱ्याना आता हे उपद्रवमूल्य मुकाट्याने चुकते करावे लागेल. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता असलेले नेतृत्त्व कॉंग्रेस पक्षाने पुढे आणावे, असा आग्रह ‘गोमन्तक’ सातत्याने धरत आला, तो का, याचे आकलन पक्षश्रेष्ठींना आतातरी होईल का? फालेरोंचे पक्षांतर ही त्सुनामी नसून पेल्यांतले वादळ ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही, पण कॉंग्रेसची प्रकृतीच इतकी तोळामासा झालीय की त्या पेल्यातल्या वादळानेही दुकान कुठल्याकुठे उडून जाईल. ज्यांना कोणताच जनाधार नाही, अशांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवणाऱ्या आणि निवडून येण्याची क्षमता नसतानाही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेवर फुंकर घालणाऱ्या कॉंग्रेसला घरचा अहेर मिळावा, हेही योग्यच नव्हे काय?

निवृत्तीची भाषा करणाऱ्या, आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही असे सांगणाऱ्या फालेरोंना अचानक पक्षांतराचा मोह कसा झाला, हा प्रश्न फिजूल आहे. गोवऱ्या खरोखरच स्मशानात पोहोचल्याशिवाय निवृत्त होणारा राजकारणी विरळाच. फालेरो आता भाजपाविरोधाचा जो आव आता आणताहेत, तो त्याना मागची पाच वर्षे कसा सुचला नाही? मनोहर पर्रीकर हयात असताना फालेरो तोंड बंद ठेवतील याची हमी आपण देतो, असे बेधडक सांगायचे. पर्रीकरांकडून माहितीचे हस्तांतरण झाले नसेलच, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच निवृत्तीची भाषा करणाऱ्याना ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या उपरतीमागे भलत्याच दांडगोबांचे दिग्दर्शन असण्याचीही शक्यता आहे. तृणमूलचे सुकाणू फालेरोंकडे जाण्याने खरा लाभ भाजपाचाच होणार आहे. कालपरवापर्यंत स्थिती अशी होती की भाजपा बॅकफूटवर गेला होता. कॉंग्रेसच्या शिडांत वारे भरत होते, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी यांच्यापैकी किमान एकाकडे युती करून कॉंग्रेस भाजपाविरोधी मतांचे विघटन टाळील अशी शक्यता दिसत होती. दुसरीकडे मगो पक्षाने युतीविषयी ताठर भूमिका घेत भाजपाची कोंडी केली होती. ती कोंडी तृणमूलने फोडली आहे. तृणमूल आणि फालेरो यांचे लक्ष्य सासष्टीच असेल, हे सांगायला तज्ज्ञाची आवश्यकता नाही. सासष्टीतील बहुतेक मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर करण्यातही तृणमूल आघाडी घेईल. परिणामी भाजपाच्या मतदारसंघात जाऊन लढाई लढण्याचे म्हणजेच कॉंग्रेसचे मनसुबे उधळले आहेत. आता कॉंग्रेसला आपल्या गडकोटांच्या डागडुजींतच कालापव्यय करावा लागेल. दक्षिणेतली कॉंग्रेसची मोर्चेबांधणी ढासळल्यानंतर मगोपही त्याच आत्मविश्वाने भाजपाच्या डोळ्याला डोळा भिडवील का, शंकाच आहे! एकंदरीत भाजपाला संपवण्याचा विडा उचलून गोव्यात आलेला तृणमूल भाजपालाच संजीवनी देण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तृणमूलचे नाव न घेता राजकीय पर्यटनाला गोव्यात वाव असल्याची मल्लिनाथी केली आहे. राजकारणातील प्रवासी पक्ष्यांचे असंख्य नमुने गोव्याने देशाला दिलेले असल्याने पर्यटक राजकारण्यांनाही हे राज्य पावन करून घेईल, याविषयी शंका नको. पर्यटनपट्ट्यातील आपल्या आमदारांच्या महत्त्वाकांक्षांना नवे पंख फुटू नयेत याची काळजी अर्थातच भाजपाला आणि डॉ. सावंत याना घ्यावी लागेल. आपण गोव्यात सत्ता संपादन करण्यासाठीच आल्याचे तृणमूलचे बंगाली नेते सांगताहेत. गोव्याच्या प्रश्नांशी, समस्यांशी त्याना काही देणेघेणे असल्याचे आजवर तरी दिसलेले नाही. स्थानिक प्रश्न घेऊन गेली पाच वर्षे झुंजणाऱ्या आम आदमी पक्षाला काही मोजकेच मतदारसंघ वगळता गोव्यात सूर सापडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय तृणमूलचा गोव्यातला प्रवेश ही काही नवी घटना नसून काही वर्षांपूर्वीं डॉ. विल्फ्रेड डिसोझा, चर्चिल आलेमाव यांना आयात करून त्या पक्षाने गोव्यातील पाणी किती खोल आहे, याचा अंदाज याआधी घेतला होता.

त्यानंतरच्या काळात गोवा नावाचे राज्य देशात आहे हे तृणमूलच्या खिजगणतीतही नव्हते. नावापुरते पक्षाचे अस्तित्व गोव्यात ठेवण्याचा विचारदेखील ममता बॅनर्जींच्या मनाला शिवला नव्हता. सध्या तो पक्ष जो जोर गोव्यात लावू पाहातो आहे, त्यामागे कोणतीही तात्त्विक भूमिका अर्थातच नाही. गोव्याच्या गढूळलेल्या आणि उथळ राजकीय पाण्यात आणखीन खळखळाट करावा आणि ममतादीदींच्या दिल्लीस्वारीच्या मनसुब्याना थोडे बळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीतून मिळते का पाहावे, यासाठीचा हा जुगार आहे. त्याला कॉंग्रेसकडून अव्हेरल्या आणि नाकारलेल्यांचे समर्थन निश्चितपणे मिळेल. पण तेवढ्याने अजीब गोवा जिंकता येईल काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT