सांगे: सांगे मतदारसंघात यावेळी लक्षवेधी अशी तिरंगी लढत होणार आहे. भाजप(BJP), काँग्रेस (Congress) आणि अपक्ष उमेदवार यांनी सध्या प्रचार सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना भाजपने डावलले, तर त्यांची भूमिका काय असेल आणि आमदार प्रसाद गावकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाल्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांचा कल काय असेल, यावरही या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. सांगे हा एकेकाळी म.गो. पक्षाचा बालेकिल्ला होता. हा मतदारसंघ भाजपच्या संघटन चातुर्याने कधीच हस्तगत केला आहे. तेव्हापासून भाजपचा मजबूत किल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. गत निवडणुकीत काही चुका टाळल्या असत्या तर भाजपचा आमदार येथून निवडून गेला असता. गेली वीस वर्षे काँग्रेस पक्ष हा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे, पण त्या पक्षाला फंदफितुरीने ग्रासल्याने अपयशच पदरी पडत आहे. कधी नव्हे तो सांगे मतदारसंघ 2017 च्या निवडणुकीत अपक्ष आमदारांकडे गेला. प्रसाद गावकर यांनी तिथे बाजी मारली. आता तो परत मिळविण्यासाठी भाजप, काँग्रेस नेटाने प्रयत्न करू लागले आहेत आणि पुन्हा राजकीय गणिते जुळली नाही तर कोणी तरी इच्छुक अपक्ष म्हणून रिंगणात असेल, अशीच चिन्हे आहेत. या गोंधळ-गडबडीत पुन्हा अपक्ष उमेदवाराला लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संभाव्य उमेदवारांची लगबग
भाजपसाठी दोन प्रबळ उमेदवार आपापल्यापरीने काम करीत आहेत. माजी आमदार सुभाष फळदेसाई कार्यरत आहेत तर सावित्री कवळेकर या राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असूनही सांगेतील संघटनेचे काम करण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांनी सुभाष फळदेसाई आणि वासुदेव गावकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघ पुन्हा काबीज करायचा आहे, असा संदेश कार्यकर्त्यांना दिल्यानंतर सावित्री कवळेकरांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला. एका अर्थाने कवळेकर यांना उमेदवारी मिळणार नाही, असेच त्यांनी सूचित केले आहे.
बंडाळीचा फटका शक्य?
अभिजित देसाई यांनी ग्रामीण भागात आपली व्होटबॅंक तयार केली आहे. आता अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांचे बंधू काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मागाहून आमदार प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे काँग्रेस पक्षातही उमेदवारीसाठीचे दोन दावेदार तयार झाले आहेत. यातील ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते बंड करतील हे ठरलेले आहे. काँग्रेस पक्षाने अन्य पक्षासोबत युती केली तरीही फारसा परिणाम जाणवणार नाही. कारण अन्य पक्षांचे नेतेच आहे पण कार्यकर्ते नाहीत, अशी स्थिती आहे.
काँग्रेसचे तोकडे प्रयत्न
काँग्रेस पक्षाचे कार्य पुढे नेणारे स्थानिक नेतृत्व गेल्या वीस वर्षांत तयार झाले नाही. तसे निष्ठावान नेते आहेत पण लोकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असणाऱ्यांची उणीव होती. यामुळे पक्ष संघटनेचे काम कमी झाले होते. त्यात अभिजित देसाई यांनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला आणि पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
गावकरांचा काँग्रेसकडे कल?
आमदार प्रसाद गावकर हे स्वभावाने शांत म्हणून परिचित आहे. पण, अपेक्षित विकास साधता आला नाही ही सल त्यांना आहे. कोविडमुळे विकासकामे रखडली हे सांगण्यासाठी ते विसरत नाहीत. आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून न लढविता पक्षाच्या निशाणीवर लढविण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. आजवरचा राजकीय इतिहास पाहता मतदारसंघात 1963 ते 2017 पर्यंत म.गो. पक्षाचे पाच वेळा, भाजपचे चार वेळा आणि काँग्रेस पक्षाचे तीन वेळा आमदार निवडून आले. मागील निवडणुकीत प्रथमच अपक्ष उमेदवाराला मतदारांनी संधी दिली. सुरवातीची पाच वर्षे तत्कालीन आमदार टोनी फर्नांडिस हे मंत्रिपदी होते. त्या नंतर तब्बल तीस वर्षांनंतर पांडू वासू नाईक यांनी बंडखोरी करून पुलोआ सरकारात स्थान मिळवले होते. ते अल्पकाळासाठी मंत्री झाले. नंतर कोणीही आमदार मंत्री बनला नाही, हा इतिहास आहे.
'एसटी’ मते कोणाला?
मतदारसंघात सध्याच्या यादीनुसार 26687 मतदार आहेत. त्यात 12687 पुरुष, तर 13800 महिला मतदार आहेत. एसटी समाजाची मते अधिक आहेत. साधारण बारा हजाराच्या आसपास हिंदू व ख्रिश्चन एसटी मतदार आहेत. नेते एका बाजूने आणि मतदार दुसऱ्या बाजूने अशी परिस्थिती झाल्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीत एसटी मतदान केंद्रात काँग्रेस पक्षाची सरशी झाली होती. आमदार एसटी समाजाचा असल्याने व इतर उमेदवारांसोबतही एसटी समाजाचे मतदार विखुरले जाण्याची शक्यता आहे.
सावित्रींचे मदतकार्य!
कोविड काळात सांगे मतदारसंघात ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्या घरात कडधान्य पोहोचविण्याचे कार्य सावित्री कवळेकर यांनी केले. ‘भाजपची कमळे’ असलेल्या छत्र्या घरोघरी पोहोचविण्याचे कार्य सांगे मतदारसंघात सुरू करून कवळेकर यांनी सामाजिक कार्य म्हणून भाजपचा प्रचार करण्याची संधी सोडली नाही. विविध क्षेत्रात आपले कार्य पुढे नेत आगामी निवडणुकीत प्रबळ दावेदार म्हणून छाप मतदारांत निर्माण करण्यासाठी सावित्री कवळेकर यांनी यशस्वी प्रयत्न केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.