पाण्याला पंथ नसतो,
पाण्याला जात नसते,
पाण्याला वंश नसतो,
पाण्याला राष्ट्रीयत्व नाही,
पाण्याला सामाजिक दर्जा नाही,
पाण्याला अभिमान नाही,
पाण्याला अहंकार नसतो,
पाण्याला भाषा नसते,
पाण्याला स्वत:चाच नाश करणारी घमेंडही नसते.
आपण खोलवर विचार केला तर आपण खरोखर हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाही. आपण काळे, गोरे, निमगोरे, गव्हाळवर्णीही नाही. आपण चिनी, आशियाई, अमेरिकन किंवा रशियनही नाही. जैविक दृष्टिकोनातून आपण फक्त पाणी आहोत. (किमान 70% पाणी आणि उर्वरित इतर महाभूते).(Mahadayi Water Dispute)
म्हादईचा लढा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक दशकांत आपण लढलेल्या सर्व लढ्यांत हा लढा मोठा आणि निर्णायक आहे. ही केवळ पाण्यासाठीची लढाई नाही, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. हा कुरुक्षेत्रावरच्या रणसंग्रामाचा आधुनिक अध्याय आहे. त्याच वृत्ती आणि प्रवृत्ती आहेत.
म्हादईचे पाणी वळवण्याच्या पर्यावरणीय परिणामांकडे पाहण्याची क्षमताच नसणे (धृतराष्ट्र), माहीत असूनही डोळ्यांवर पट्टी बांधणे (गांधारी), इतर राज्यांचा न्याय्य हक्क ओरबाडून घेणे (दुर्योधन), जे घडत आहे, ते चुकीचे आहे
हे माहीत असूनही त्याचे समर्थन करणे (भीष्म, द्रोण) आणि आपल्याच पक्षाची सत्ता दोन्ही राज्यांत व केंद्रात असल्यामुळे त्याविरुद्ध शस्त्र कसे उचलायचे हा अवसानघातकी विचार करणारे गोवा सरकार (अर्जुन).
फक्त सत्याच्या बाजूने उभा राहणारा, जनार्दनाचा अवतार कृष्ण नाही. त्यामुळे, युद्ध जिंकण्यासाठी कृष्णाची ती भूमिका आता गोमंतकीय जनतेलाच पार पाडावी लागेल. जनतेला जनार्दन व्हावे लागेल!
जनता म्हणजे प्रत्येकजण; आणि जेव्हा मी ‘प्रत्येकजण’ असे म्हणतो तेव्हा अक्षरश: प्रत्येकाने या लढाईत उतरले पाहिजे. आपल्याला जे जे करणे शक्य आहे ते ते सर्व केले पाहिजे. विचार, मत, पैसा, शक्ती, संपर्क, सेवा, पद जे जे बलस्थान आहे ते ते शस्त्र म्हणून वापरले पाहिजे.
आपल्या दाराशी येऊन पोहोचलेला सर्वनाश पाहता, हे खूपच अत्यावश्यक आहे. सामान्य माणूस, शिक्षक, पोलीस, चोर, मजूर, काम करणारा, न करणारा, भक्त, पुजारी इथपासून जे कोणी आपण जिथे आहोत,
त्या पदाचा आणि स्थानाचा उपयोग आपण म्हादईचा लाढा जिंकण्यासाठी कसा करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तशी कृतीही केली पाहिजे.
एक व्यक्ती म्हणून आपल्या क्षमतांचा वापर शस्त्र म्हणून केला पाहिजे, तसाच तो समूह, गट, समाज, पक्ष म्हणूनही केला पाहिजे.
आपली विचारधारा, राजकीय-सामाजिक समूह शक्तीचा वापर या युद्धात केला पाहिजे. प्रशासकीय अधिकारी, राजकारणी, वकील यांनी एकत्र येऊन सर्व पर्यायांचा व त्यांच्या परिणामांचा विचार केला पाहिजे.
ज्यांना लिहिता येते त्यांनी या विषयावर लिहावे, ज्यांना प्रभावीपणे बोलता येते त्यांनी बोलावे. युद्ध जिंकावे यासाठी नवा विचार, नवी रणनीती, नवी जागृती आणि या सर्वाचा सर्वंकष समन्वय साधावा. एखादा नवा विचार, तोडगा आपल्याला या युद्धात विजय मिळवून देऊ शकतो.
किमान जे हा लढा प्रत्यक्ष लढत आहेत, त्यांना पाठबळ व पाठिंबा प्रत्येक सामान्य माणसाने दिला पाहिजे. निस्पृहपणे व पराकोटीच्या तळमळीने लढणारे आमचे दोन खंदे योद्धे राजेंद्र केरकर आणि निर्मला सावंत यांना जी जमेल ती मदत, सहकार्य करा.
त्यांनी मांडलेले विचार, केलेले कार्य याची माहिती सर्वांना व्हॉट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवा. आपण त्यांच्याशी सहमत आहोत की, नाही याचा विचार न करता त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची तळमळ सर्वांपर्यंत पोहोचवा. त्यांचा आवाज व्हा!
प्रत्येकाने प्रत्येक घरात होता होईल तेवढे पाणी वाचवा. पाणी साठवा, पाणी वाढवा. अनावश्यक वापर टाळा. गर्भश्रीमंतांनी शोभेसाठी घरासमोर उभारलेले जलतरण तलाव काही काळ बंद ठेवावेत. सध्याची परिस्थिती पाहता या अपेक्षा अजिबात अवास्तव नाहीत.
काही काळ परशुरामाला आणि सेंट झेविअरलाही विराम द्या. गोवा म्हणजे दक्षिणेची काशी आहे की, पूर्वेकडचे रोम आहे, हेही सोडून द्या. आपण कोकणी, मराठी, कन्नड, पोर्तुगीज नाही. आपण युनायटेड गोवन्स (कधीच युनायटेड नव्हते) किंवा रिव्हॉल्यूशनरी गोवन्स नाही.
आपण राजकारणी, पांथिक वगैरे नाही. आपल्या उपाधी, उपमा आणि अभिमान बाजूला ठेवा. या लढ्यात आपले वेगळे अस्तित्व, वेगळी व स्वतंत्र ओळख नाही. या लढ्यात आपण सगळेच आहोत;
म्हादई आता तीच आपली खरी ओळख आहे. ही ओळख दैवी आणि वादातीत आहे. म्हादईची दुर्दशा रोखण्यासाठी कितीही क्षुल्लक असले (अगदी माझ्या या स्तंभलेखनासारखे), तरीही ते सातत्याने द्या व देत राहा.
सर्व साथी खांद्याला खांदा लावून एकत्र या, लढा. एक गोष्ट स्पष्टपणे आपल्या ध्यानात असू द्या; म्हादई वळवली, तर गोव्याचे वैराण, उजाड वाळवंट होईल.
ताजाकलम
ज्याला आपण महाभारत म्हणतो, त्या जय नावाच्या इतिहासाने आपल्याला हेच शिकवले आहे की, पांडव युद्ध जिंकले, कारण ते एकाच ध्येयासाठी एकजुटीने लढले!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.