दत्ता दामोदर
नायककुळागरांत इको टुरिझमला वाव आहे. गोव्यात सहकारी फार्मस्, सावय प्लान्टेशन ह्या कुळागरांत यशस्वी रितीने इको टुरिझमचे प्रकल्प राबवले आहेत.
कुळागर ही अस्सल गोमंतकीय संकल्पना आहे. रांगेने लावलेली सुपारीची झाडे, सुपारीच्या झाडांवर चढवलेल्या मिरवेली, हळद, आले यासारखी आंतरपिके आणि हिरव्यागार कुळागरांतून झुळूझुळू करत वाहणारे पाण्याचे पाट हे गोमंतकीय निसर्गाचे लावण्यलेणे आहे.
सुपारीच्या झाडाला कोंकणीत ''माडी'' हे सुंदर नाव आहे. माड आणि माडी! माडांच्या फळबागेजवळ असलेले माड्यांचे कुळागर!
मोले जवळ सांगोडे गांवात माझी २२ एकरांची फळबाग आहे. ह्या बागेशेजारून म्हादई नदीचा उपफाटा वाहतो. जमिनीत विपुल पाण्याने सर्वकाळ ओतप्रोत भरलेली विहीर आहे. १५ वर्षापूर्वी मी ही फळबाग विकत घेतली.
सुरवातीच्या १० - १२ वर्षात मी नारळावर लक्ष केंद्रित केले पण मागील ३ वर्षांत मी सुपारी, मिरी, हळद, आले यांचे कुळागर व डोंगर उतारावर काजूची लागवड यावर भर दिला. सुपारी, मिरी, हळद, आले, काजुबिया यांमध्ये रानटी जनावरांना रस नसतो. शिवाय ह्या पिकांची फारशी निगा राखावी लागत नाही. बाजारभावही चांगला मिळतो.
आज सुपारी ३२५ रुपये किलो, मिरी ६०० रुपये किलो, हळद ३०० रुपये किलो, आले ३५० रुपये किलो व काजूच्या बियांना १३० रुपये किलो असा दर मिळतो. त्यामुळे कुळागरांचे अर्थकारण फायद्याचे ठरते.
यापुढे मी माडाचे कवाथे लावणार नाही. खंगलेले माड कापून त्याजागी सुपारीचे कुळागर करीन. आंबा, अननस, कलिंगड, भाज्या ह्या पिकांचे अर्थकारणही जनावरांनी केलेल्या हानीमुळे तोट्याचे झाले आहे. मध्यंतरी मी फुलशेती करायचा प्रयत्न केला पण हात भाजून घेतले. गोव्यात फुलाचे विपणन ( marketing ) करणे कठीण आहे.
गोव्यात केवळ २००० हेक्टर जमीन कुळागराखाली आहे. गोव्यात कुळागराच्या लागवडीखालील जमीन वाढवायला प्रचंड वाव आहे. गोव्याचे सुपारीचे वार्षिक उत्पादन केवळ ४००० टन आहे. मिर्याचे उत्पादन केवळ ३२५ टन आहे. हळदीचे व आल्याचे उत्पादन नगण्य आहे. या सर्व पिकांचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे.
सुपारीला खाद्यउद्योग, टूथपेस्टस, पेंटस ह्या उद्योगांत मोठी मागणी आहे. मिरी, हळदपूड व आले या पिकांचीही सतत वाढती विक्री आहे.
कुळागरांत इको टुरिझमला वाव आहे. गोव्यात सहकारी फार्मस, सावय प्लान्टेशन ह्या कुळागरांत यशस्वी रिेतीने इको टुरिझमचे प्रकल्प राबवले आहेत.
गोव्यात वर्षभर बारामाही वाहणाऱ्या मांडवी, जुवारी, तेरेखोल, शापोरा, साळ, कुशावती, तळपण अशा नद्या आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य नाही. याचा फायदा घेऊन गोव्याच्या कृषी खात्याने कुळागराच्या लागवडीखालील जमीन वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
मूळ मलेशिया, फिलिपिन्स सारख्या दक्षिण आशियाई देशांतून आलेली सुपारी भारताच्या संस्कृती जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. मिरीसारखे मसाल्याचे पदार्थ ही भारताची मक्तेदारी आहे. हळदीला GI (Geographical Indication) मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
गोव्याच्या पर्यटनाचा ओघ समुद्रकिनाऱ्यापासून सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पूर्वेकडील कुळागरांकडे वळवला पाहिजे. फोंडा, केपे, सांगे, डिचोली हे तालुके कुळागराच्या लागवडीसाठी सुयोग्य आहेत.
कुळागरे हा गोमंतकीय शेतीचा आरसा आहे. कुळागरांसाठीही आपण GI घेणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.