Konkani Restaurant Dainik Gomantak
ब्लॉग

गोयंकारपणाचा पक्का ठसा कोकम करी

खात्रीशीर कोकणी रेस्टोरंट अशी ‘‘कोकम करी’’ रेस्टोरंटची टॅग लाईन असली तरी ''गौड सारस्वत'' पाककृतींसाठी हे रेस्टोरंट प्रसिद्ध आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्वीनी प्रभुणे नायक

काही रेस्टोरंट अशी आहेत कि तिथे गेल्यावर ''आपण इथं आधी का नाही आलो. एवढा उशीर का केला'' असं वाटतं. काही दिवसांपूर्वी पणजीत ''कोकम करी'' रेस्टोरंटमध्ये गेल्यावर याचीच प्रचिती आली. अनेकवेळा ठरवून आमचं ''कोकम करी''मध्ये जाण्याचं राहून जायचं.

इतक्या जणांकडून ''कोकम करी''बद्दल, इथल्या मेनू बद्दल ऐकलं होतं कि आता कधी इथं जाणं होणार असं वाटायचं. त्यादिवशी मात्र अजिबात न ठरवता व्यवस्थित जुळून आलं. ''खात्रीशीर कोकणी रेस्टोरंट'' अशी कोकम करी रेस्टोरंटची टॅग लाईन असली तरी ''गौड सारस्वत'' पाककृतींसाठी हे रेस्टोरंट प्रसिद्ध आहे.

सपना सरदेसाई यांनी अतिशय बारकाईनं इथलं मेनूकार्ड तयार केलं आहे. ग्राहकांना कोणकोणते पदार्थ खायला आवडतील, कोणता पदार्थ कशा सोबत खायला जास्त चांगला लागेल हे देखील त्यांनी समजून घेऊन केलं आहे.

काही वर्षांपूर्वी त्यांनी कांदोळी भागात कोकम करी नावानेच रेस्टोरंट सुरु केलं होतं. ''अरे बापरे हे जरा लांब आहे'' असं मनात येऊन उगी बसायचे. फक्त जेवणासाठी एवढ्या लांब जायचं? असं उगाच मागे खेचणारा विचार असतोच. तरी मी फक्त जेवणासाठी कधीतरी तिथं जाणार असं ठरवून टाकलं होतं. पण ती वेळ आलीच नाही. तत्पूर्वी ''कोकम करी''च पणजीत सुरु झालं.

तुम्हाला जर थाळी नको असेल तर इथं असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. जसे कि मुगाच्या गाठी -पुरी आणि काकडीची कोशिंबीर, वांग्याचे / दुधी भोपळ्याचे भरीत- रोटी आणि कोशिंबीर, शीत - रोस (व्हेज), कारल्याचे किसमूर, तळलेल्या बटाटा फोडी, अळसांद्याचे/बियो तोणाक -चपाती आणि कोशिंबीर, भरली वांगी - तांदळाची भाकरी आणि कांद्याच्या फोडी, सुंगटाचे लोणचे आणि पोळी, कुल्ल्यांची शागुती आणि शीत, सुंगटाचे/तिसऱ्यांचे सुके आणि पाव, व्हेज पुलाव - झणझणीत मिरसांगाचे रायते-पापड आणि काकडी, मटण सुके आणि वडे, चिकन शागुती आणि पाव यादी संपणार नाही असे एकापेक्षा एक पदार्थ आहेत.

यासोबत तोंडी लावायला बांगड्याची, आमलीची, आंबाडेची उड्डमेथी, कारात्याचा कुवळ, अननसाचे/ आंबाडेचे करम (त्या त्या हंगामात), पापडाची-वडियोंची-गालमांची-सुंगटाची किसमूर आहेच. शिवाय आपण घरी करतो त्या सर्व प्रकारची सोलकढी देखील आहे. मनात आलं तर ओवा घातलेली कढी घ्या नाहीतर लसणाची आहे, हिरवी मिरची घातलेली कढी देखील आहे. सपना सरदेसाई यांचे विशेष कौतुक करायला हवं.

त्यांनी खवय्या मंडळींसाठी इतके वेगवेगळे पदार्थ ठेवले आहेत. कोकम करीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे असे पदार्थ अन्यत्र कोणत्याही रेस्टोरंटमध्ये मिळणार नाहीत. मी तर फक्त नुस्त्याची थाळी खाऊन आलेय. वर वर्णन केलेल्या पदार्थांची जंत्री बघितली तर लक्षात येईल कि अजून कितीतरी वेळा कोकम करीमध्ये जावं लागणार आहे.

कोकम करीमध्ये काय खावं?

इथं गेल्यावर काय खाऊ आणि काय नको? अशी निश्चित तुमची अवस्था होईल इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ आहेत. आणखी एक गोष्ट सुरुवातीलाच सांगते. शाकाहारी लोकांसाठी देखील पदार्थांमध्ये तेवढीच विविधता इथं जपली आहे. मासळी प्रेमी, शाकाहारी आणि मांसाहारी असे सगळे तृप्त होतील असं हे रेस्टोरंट आहे.

सकाळच्या नाष्ट्यापासून सुरुवात करू या. नाश्त्याचा अहाहा काय मेनू आहे. हा मेनू ऐकून तुम्ही इथं नक्कीच वारंवार नाश्त्याला जाणार. ''कारामलाज्ड'' गूळ/साखर-खोबरं घालून केलेली चपाती हा प्रत्येकाला आपल्या आजीची आठवण करून देणारा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात मिळतो. नाश्त्याचे सगळेच पदार्थ असे आगळे वेगळे आहेत जे तुम्हाला इतर कोणत्याही रेस्टोरंट मध्ये मिळणार नाहीत.

तूप साखर - ताजी सोय आणि उणो (पाव), कालवलेले पोहे, फोडणीचे पोहे, चपाती आणि गोड लोणचं, तांदूळ - नाचणीची, कांदा, तवशी घालून केलेली भाकरी तर कधी गूळ घालून तर कधी फणसाचा रस घालून केलेली भाकरी, पावाचा सांजा हे पदार्थ कधी कुठल्या रेस्टोरंटमध्ये मिळतात म्हणून तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना. तर हे सगळे पदार्थ सकाळच्या नाश्त्याला कोकम करीमध्ये मिळतात. इथं सकाळ - दुपार - संध्याकाळ आणि रात्र अशा सर्व प्रहरला खाऊन उरेल इतक्या पद्धतीचे पदार्थ आहेत. थाळीबद्दल मुद्दाम लिहिलं पाहिजे.

इथली शाकाहारी आणि नुस्त्याची थाळी म्हणजे अस्सल सारस्वत चवीचे पदार्थ. आम्ही इथं दुपारच्या वेळी गेलो होतो त्यामुळे नुस्त्याची थाळी घेतली होती. उन्हाने तापलेल्या वातावरणात खूप भूक लागलेल्या अस्वस्थेत इथं गेले असता.

शीत - सुंगटाचे हुमण, सुक्या सुंगटाची किसमूर, सुकी भाजी, कुल्ल्यांचे तोणाक, चिकन शागुती, तळलेल्या विसवणाची पोस्त, चपाती, कोशिंबीर आणि मनगणे अशी भरगच्चं मेनू असलेली थाळी समोर आली. सगळेच पदार्थ चविष्ट होते. खूप दिवसांनी अशी चविष्ट थाळी खाल्ली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT