Freedom Fight

 

Dainik Gomantak

ब्लॉग

सत्तरीतील राण्यांचे स्वातंत्र्यसंगर

सत्तरीच्या राण्यांनी 1912 पर्यंत पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात 22 वेळा सशस्त्र लढा दिला. राण्यांबरोबरची युद्धे पोर्तुगीज सत्तेला तहा शिवाय मिटवता आली नाहीत. दीपाजी राणे यांच्यापासून हरबा राणे यांच्यापर्यंतचा इतिहास म्हणजे स्वाभिमानाची गाथाच आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात (Freedom Fight) सत्तरीच्या राण्यानी जे स्वातंत्र्यसंगर केले त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. दुर्दैव हे की अनेकांना हे स्वातंत्र्य संगर आजही माहित नाही. या स्वातंत्र्य संगराला राण्यांचे बंड असे चुकीच्या पद्धतीने संबोधले जाते. जेव्हा स्वकीय सरकारच्या विरोधात नागरिकांचा उठाव होतो, त्याला आपण बंड म्हणतो.

पण उठाव परकीय सत्तेच्या विरोधात केला जातो त्याला बंड म्हणणे चुकीचे आहे. तो आत्मसन्मानातून उद्भवलेला लढा असतो. सत्तरीच्या राणे देसाई घराण्याच्या इतिहासाचे पराक्रमाचे आजही योग्य प्रमाणात मूल्यमापन झाले नाही , याचे कारण म्हणजे तत्कालीन काळात त्यांचा इतिहास कोणीच व्यवस्थित लिहून ठेवला नाही.

स्वातंत्र्यलढ्यात (freedom struggle) सत्तरीच्या राण्यानी 1912 पर्यंत पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात 22 वेळा शसस्त्र लढा दिला. राणे हे सुरुवातीला दक्षिण कोकणात किंवा तळ कोकणात आले. शृंगारपूर या भागात आपले राज्य स्थापून मग ते गोमंतकात आले. इसवी सन 1489 मध्ये गोव्यावर आदिलशाही सत्ता होती आणि त्या दरबारात भोसले आणि राणे ही मंडळी देखील होती.

या काळात क्षेत्रोजी राणे हा शूर सरदार आदिलशाही सेनेत होता. सरदेसाई ही पदवी राण्याना आदिलशाहीच्या कालावधीत मिळाली. सरदेसाई, देसाई, देशमुख अशी जी आडनावे आहेत त्या वास्तविक पदव्या आहेत. कुडाळच्या खेम सावंत यास बादशाहकडून वाडी प्रांताचा भाग जहागिरी म्हणून मिळाला. त्यावेळी दक्षिण कोकणाची जबाबदारी भोसल्यांना देण्यात आली होती.

याचा पुरेपूर फायदा भोसल्यांनी घेतला आणि आदिलशाहीच्या पडत्या काळात त्यांना देण्यात आलेल्या जहागिरीच्या आजूबाजूचा भाग देखील स्वतःच्या ताब्यात घेतला. यावेळी सत्तरी प्रांत त्यांच्या ताब्यात होता. राणे देसाई यांच्याशी बोलणी झाल्यानंतर राणे देसाई यांनी भोसल्यांचे स्वामित्व मान्य केले. म्हणून सरदेसाई ही पदवी भोसले यांनीदेखील दिल्याची शक्यता वर्तवली जाते.

भोसल्यांचे स्वामित्व मान्य केल्याने साहजिकच सत्तरी तालुक्याचे स्वामित्व क्षेत्रोजी राणे यांच्या ताब्यात आले. त्यांनी वतन मिळवून आपले प्रभावक्षेत्र वाढवण्यास प्रारंभ केला. सत्तरीत राणे आले ते 1743 च्या दरम्यान आणि त्यानंतर सन 1912 पर्यंत सत्तरीच्या राण्यानी पोर्तुगीजाच्या विरोधात जवळपास बावीस संग्राम केले. त्या कालखंडात चांगल्या नेतृत्वाचा अभाव होता. तरीही सामान्य जनतेवर या लढ्यांचा परिणाम झालेला चांगलाच जाणवत होता.

1851 मध्ये पोर्तुगीजांनी (Portuguese) सुलतानी हुकूम सोडले आणि सत्तरी तालुक्यातील मोकाशे, इनामे यावर कर बसवून ते खालसा करण्याचा हुकूम सोडण्यात आला. स्त्रियांवर अत्याचार व्हायला लागले. तुळशी वृंदावन दारात लावण्यास हिंदूंना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे रयत चिडली. आणि दीपाजी राणे यांच्या नेतृत्वाखाली नाणूस किल्ल्यावर 26 जानेवारी 1852 या दिवशी स्वातंत्र्यसंग्रामास प्रारंभ झाला.

नाणूस किल्ल्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला आणि तो ताब्यात घेतला गेला. नंतर या स्वातंत्र्य संग्रामाचा बीमोड करण्यासाठी पोर्तुगीजानी लष्कर पाठविले. पण ते लष्कराचे सैन्यदेखील राण्याना जाऊन मिळाले. लढाई सुरूच होती. क्रांतिवीर दीपाजी राणे आणि त्यांच्या सैन्याकडील दारूगोळा संपत आला होता. काय करावे हे समजत नव्हते. तेव्हा पोर्तुगीज सैनिकाची एक गोळी मधमाश्याच्या पोळ्याला लागली.

मधमाशांनी पोर्तुगीज सैनिकांचा (soldiers) चावा घ्यायला प्रारंभ केला. पोर्तुगीजांनी माघार घेतली. फोंडे, हेंबाडबारसे आदी भागापर्यंत जंगलामध्ये दीपाजींचे सैन्य दडी मारून बसले होते. अखेर पोर्तुगीजांनी पावलू पेगाद या माणसाकडून दीपाजींना समेटासाठी निरोप धाडला आणि सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असे सांगितले. त्याप्रमाणे स्वतःला कोणतीही इजा होऊ नये म्हणून दीपाजीनी पेगादच्या तीन मुलांना ओलिस ठेवले आणि आपले निवडक सैन्य घेऊन ते पण पणजीला गव्हर्नरबरोबर चर्चा करण्यास निघाले.

दीपाजींच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या व त्याना मानाने पाठविण्यात आले. परंतु पोर्तुगीज सरकार नंतर आपल्या दिलेल्या शब्दाला जागले नाही. त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे दिपाजींनी खुद्द गव्हर्नरला खरमरीत पत्र लिहिले. त्या काळात जवळपास तीन वर्षे दिपाजीनी सत्तरी वर अमर्याद सत्ता गाजविली.

1775 पासूनच सत्तरीची राणे मंडळी पोर्तुगीजांच्या विरोधात संघर्ष करत होती. सन 1869 मध्ये कुष्टोबा राणे यांनी उठाव केला. पोलीस चौक्यांना त्यानीआगी लावल्या. दोन वर्षे त्यानी पोर्तुगिजांना जेरीस आणले. मात्र त्यानी गरीब लोकांना त्रास दिले नाहीत. पण त्याना अखेर पोर्तुगीज सैनिकांची गोळी लागून त्याना मृत्यू आला. 1895 साली दादा राणे यांनी दिलेला लढा तर फारच उल्लेखनीय आहे.

सरकारी अधिकाऱ्यांची संगनमत करून दत्तू नाडकर्णी आणि इतरांनी सत्तरीतील जनतेच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला. त्यावर कर बसविले. त्रस्त रयत दादा राणे यांना भेटली. त्याच दरम्याना 26 ऑगस्ट 1895 ला पोर्तुगीज सरकारने हुकूम काढला. या हुकुमानुसार सैनिकांची एक तुकडी पूर्व आफ्रिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सैनिक चिडले. परदेशात जाऊन त्यांना गोमांस किंवा डुकराचे मास खावे लागले असते.

चिडलेल्या सैनिकांनी पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात उठाव करण्याचा निर्णय घेतला. ते दादा राणे यांना येऊन मिळाले. दादा राणे यांनी नेतृत्व स्वीकारले. आणि मग सर्वांनी मिळून 6 ऑक्टोबर 1895 या दिवशी हळर्ण किल्ल्याच्या दिशेने कूच केली. तो किल्ला ताब्यात घेऊन साखळी येथे हल्ला केला. या हल्ल्यामुळे पोर्तुगीजांची दाणादाण उडाली. पणजी हादरली. आग्वाद किल्ल्यावर हल्ला करण्याचा बेत आखण्यात आला. पणजी शहर ताब्यात घेण्यासाठी नियोजन करण्यात आले.

पोर्तुगीजांनी हल्ल्याच्या भीतीमुळे आपल्या बायका मुलास अन्य प्रांतात पाठविले. पोर्तुगीजांनी समेटाचे बरेच प्रयत्न केले. करंजाळपर्यंत जंगलात दादा राणेंच्या टोळ्या दबा धरून बसल्या होत्या. राणेंच्या टोळ्या जंगलात दडून बसतात म्हणून दत्तू नाडकर्णींच्या सांगण्यावरून पोर्तुगीजांनी चाळीस गावांना आगी लावल्या.

जरी राणे मंडळींचे नुकसान झाले असले तरी पोर्तुगीजांचे देखील नुकसान पुष्कळ झाले होते. अखेर पोर्तुगीजाना दादा राणे यांच्याशी तह करावा लागला. संकेश्वर मठाच्या जगद्गुरुची तहासाठी मदत घेण्यात आली. तहानुसार मराठा पलटण तयार करून त्यात राणे सरदेसाई, गावस गावकर इत्यादी लोकांना घेण्यात आले. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राण्यांबरोबरची युद्धे पोर्तुगीज सत्तेला तहा शिवाय मिटवता आली नाहीत. दादा राणे हे धोकादायक आहेत हे पोर्तुगीजांना माहीत होते.

म्हणून त्यांना नंतर खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकवण्यात आले. आणि त्यांना आफ्रिकेमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पोर्तुगीजांनी एक प्रकारे दादा राणेंच्या विरोधात सूड घेतला. 1912-13 मध्ये हरबा राणे यांनी पोर्तुगीज सत्तेविरोधात उठाव केला. हे हरबा राणे देखील दादा राणेंच्या सोबत होते. राण्यानी जे उठाव केले ते उठाव त्यांनी पोर्तुगीज सत्तेकडे केलेल्या मागण्यांनुसार सामाजिक न्यायासाठी होते, हेच स्पष्ट होते. 1942 ते 47 दरम्यान राण्यानी क्रांतिकारकास आश्रय दिला होता आणि स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला. या पराक्रमाची स्मृती स्फुर्तिदायक अशीच आहे.

अॅड. शिवाजी देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT