Car Self Accident At Sanguem Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial : रस्ते अपघात आवरा

दैनिक गोमन्तक

बाणस्तारी येथील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर रस्ते अपघातांची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. आणखीन काही दिवस ती सुरू राहील. त्या चर्चेतून फारसे काही निष्पन्न होईल असे नाही. तसे पाहिले तर दिवसाला एकाला तरी रस्ते अपघातात जीव गमवावा लागतो. त्यातून कोणी काही धडा घेतला असे दिसत नाही.

आजकाल वाहनांचा वापर हा अनिवार्य झाला आहे. त्याला कारण म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. वाहतूक व्यवस्था सक्षम असती तर सध्या नियमित वाहन वापरणाऱ्यांपैकी किमान निम्मे जण आपण आज का आपले वाहन वापरू, असा विचार करतील.

गर्दीच्या वेळी पुरेशी बससेवा नसल्याने अनेकांना आपली दुचाकी किंवा चारचाकी घेऊन कामाचे ठिकाण गाठावे लागते ही वस्तुस्थिती नजरेआड करता येण्याजोगी नाही. त्यामुळे वाढत्या रस्ते अपघाताला बेदरकार वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीसोबत, वाहनांची या कारणामुळे वाढलेली संख्याही कारणीभूत आहे.

रस्ता रुंदीकरणानंतर वाहनांचे वेग वाढणार हे गृहित आहे. मात्र पणजी कदंब पठारावरील रस्ता वगळता इतर रस्त्यांवर दुचाक्यांसाठी वेगळी मार्गिका नाही. त्यामुळे याच वाहनांच्या गर्दीतून दुचाकीवाल्यांंना वाट काढावी लागते. त्यात रेन्ट अ बाईक घेऊन भ्रमंती करणारे वाहतुकीस अडथळा करतात.

दुचाकीवर एक चालक असतो त्यामागे असलेली व्यक्ती हाती मोबाईल घेऊन त्यातील नकाशाच्याद्वारे मार्गदर्शन करत असते. अशी ही दुचाकी कधी कोणत्या दिशेला वळेल ते कोणीही सांगू शकत नाही. अशामुळे होणाऱ्या छोट्या अपघातांची तर गणतीच नाही. अपघात झाला की चार दोन दिवस त्याची चर्चा होती आणि परत सगळे जणू काही घडलेच नाही याप्रमाणे वेगाने वाहन दामटत आपले जीवन पुढे सरकवत असतात.

आपल्या राज्यात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला कामानिमित्त दररोज ये-जा करणारे अनेकजण आहेत. शेजारील जिल्ह्यातून गोव्यात रोजगारासाठी दररोज ये जा करणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. या साऱ्यांची गर्दी रस्त्याला पेलावी लागते. कामावर वेळेवर पोचण्यासाठी आणि नंतर घरी पोचण्याच्या ओढीने गाडी कधी वेग पकडते ते समजत नाही. त्यातूनही अपघात होत असतात.

मद्यपी वाहनचालकांमुळे होणारे अपघात हे टाळता येणारे अपघात आहेत. मध्यंतरी पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात मोहीम उघडली होती. कोविड काळात श्वास तपासणी करणारी यंत्रे वापरण्यावर संसर्गाच्या भीतीने मर्यादा आली नव्हे ती तपासणी बंदच झाली ती आता सुरू झाल्याची चिन्हे दिसत नाहीत.

मद्यपान करून वाहन हाकू नये हा साधा नियम. त्याला कोणीच अपवाद असू शकत नाहीत. मद्यपान करण्याच्या ठिकाणांच्या बाहेर, पार्ट्या होत असलेल्या ठिकाणांच्या बाहेर मद्यपी चालकांची झाडाझडती घेण्यासाठी पोलिस तैनात करून मद्यपी चालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालता येणे शक्य आहे.

याशिवाय पार्टी आयोजकांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून मद्यपान करून कोणी वाहन घेऊन घरी परतणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. चालक सेवा त्यांनी उपलब्ध करून हा प्रश्न सोडवता येणे शक्य आहे. मध्यंतरी बार मालकांना आपल्या ग्राहकांना घरी पोचवण्याची जबाबदारी घ्यायला लागेल असे सांगण्यात येत होते. त्याचे पुढे काय झाले ते समजले पाहिजे.

अपघात का होतात याचे विश्लेषण केले गेले पाहिजे. खराब रस्ते, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमभंग करणे, मद्याच्या अमलाखाली वाहन हाकणे यापैकी कोणत्या कारणामुळे जास्त अपघात होतात ते पाहून ते कारण दूर कऱण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती हाही एक मार्ग आहेच. हे मार्गदर्शन किशोरवयीन मुलांपासून सुरू केले पाहिजे. रस्ता वापर जबाबदारीने का व कसा केला पाहिजे याविषयी जनजागृती झाली तर अपघात टाळणे बऱ्यापैकी शक्य होणार आहे. वाहन चालवण्याचा परवाना देतेवेळी वाहन चालवण्यास येते की नाही आणि वाहतूक नियमांची जुजबी माहिती आहे का एवढेच तपासले जाते.

रस्ता वापर कसा केला पाहिजे याविषयी समुपदेशनाची अनेक सत्रे वाहनचालक परवाना मिळवण्यास इच्छुक व्यक्ती उपस्थित राहील अशी व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली पाहिजे. त्यातून रस्ते नियमांविषयी गांभीर्य वाढण्यास मदत होणार आहे. त्याही पुढे जात रस्ते अपघातातील दोषींना कठोर शिक्षा ही अल्पावधीत झाली पाहिजे. त्यातून योग्य तो संदेश समाजात जाण्यास मदत होणार आहे.

जनजागृती, प्रशिक्षण, दंडात्मक कारवाई या आयुधांचा चपखल वापर करून रस्ते अपघाताला पायबंद घालणे सहज शक्य आहे. सरकारने केवळ पर्यटन राज्य आहे म्हणून थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले असल्यास ते वाढत्या रस्ते अपघाताच्या रूपाने महागात पडत आहे. गोव्यात काहीही केले तरी चालते ही येथे येणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता असते.

सरकारने कृतीतून ती घालवली पाहिजे. बाणस्तारीचा अपघात हे एक निमित्त मानून सरकारने पावले टाकली तरच यानिमित्ताने सुरू झालेल्या चर्चेला अर्थ असेल. अन्यथा चार दोन दिवसांनी पुन्हा अपघात होईपर्यंत सारेजण सारेकाही विसरलेले असतील. असे वागणे आपल्याला निश्चितपणे परवडणारे नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

SCROLL FOR NEXT