Gomantak Newspaper Dainik Gomantak
ब्लॉग

पेपर, एक चळवळ!

कोंकणी- मराठीचा वाद आमच्या वाचनात आला तो गोमंतक मधूनच. गोमंतक हे तेव्हा मराठी वादी लोकांचे मुखपत्रच होते.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रा. विनय बापट

मी आता वर्तमानपत्र असा शब्द वापरला तर मला उगाचच माझ्या शर्टमध्ये झुरळ गेल्यासारखं वाटेल. कारण आम्ही जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून वर्तमानपत्राला पेपरच म्हणत आलो आहोत.

तुम्ही रेशनची लाईन बघितली असेल, लाईटचे बील भरण्यासाठीची लाईन बघितली असेल पण कधी पेपर दुकानासमोर लाईन बघितली आहे? मी बघितली आहे. दहावी- बारावीचा रिझल्ट असला की वाळपईच्या शिरोडकरच्या दुकानासमोर लाईन लागलेली असायची. तेव्हा मुलांना आपला रिझल्ट कळायचा तो पेपरच्या माध्यमातूनच मला अगदी माझा बी.ए. चा रिझल्ट देखील पेपरच्या माध्यमातूनच समजला होता.

एखादी मोठी घटना घडली की दुसऱ्या दिवशी शिरोडकरच्या दुकानासमोर लोकांची रांग लागायची. इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांनी छायाताईला पेपर आणायला सांगितला.

ती तेव्हा वाळपईच्या शाळेत शिकत होती. तिला बराच वेळ लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर पेपर मिळाला होता. हे टाळायचे असेल तर पेपर लावावा लागायचा; म्हणजे एका महिन्याचे पैसे एडव्हान्स भरायचे आणि पेपरसाठी नोंदणी करायची मग तुमचा पेपर अगोदरच काढून ठेवला जाई.

तुम्ही आठ दिवसांनी गेलात तरी तुम्हाला सगळ्या दिवसाचे पेपर मिळत असत. या बाबतीत पेपरवाला शिरोडकर खूप काटेकोर असे. पेपर आले की तो अगोदर ज्यांचे नोंदणी केलेले पेपर आहेत त्यांच्या पेपरवर नोंदणी क्रमांक घालून ते वेगळे काढून ठेवत असे आणि मग उरलेले पेपर विकण्यासाठी ठेवत असे. तुम्ही दुप्पट पैसे देतो म्हणालात तरी तो नंबर घातलेला पेपर कोणाला देत नसे.

आम्ही वाळपईच्या शाळेत जायला लागलो तेव्हापासून पेपर आमच्या घरात नियमित येऊ लागला. मला वाटतं मी अगदी तीसरी -चौथीत असल्यापासून नियमित पेपर वाचीत असे. अर्थात मी शेवटचे पान पहिली उघडत असे कारण माझे क्रिकेट प्रेम! क्रिकेटचे सामने सुरू असले की त्या संबंधीच्या बातम्या वाचण्यात आणि क्रिकेटपटूंचे छापून आलेले फोटो पाहण्यात मला विशेष रस असे. सर्वांचा पेपर वाचून झाला की पेपरात आलेले हे फोटो कापून ते मी एका वहीत चिकटवून ठेवीत असे. कितीतरी वर्षे मी ती वही जपून ठेवली होती. ती हरवल्याची हुरहूर मला अजूनही आहे.

अगदी सुरुवातीला आमच्याकडे ‘गोमन्तक’च आणला जात असे त्यावरील ते ढाल आणि तलवारीचे असणारे चित्र अजूनही माझ्या लक्षात आहे. कधीतरी ‘नवप्रभा’ आणला जायचा आणि बाकी पेपर संपले असतील तर क्वचित कधीतरी ‘राष्ट्रमत’ आणला जायचा. हे तीन पेपर सोडून तेव्हा दुसरे पेपर नव्हते काही काळानंतर ‘तरुण भारत’ आला.

कोंकणी- मराठीचा वाद आमच्या वाचनात आला तो गोमंतक मधूनच. गोमंतक हे तेव्हा मराठीवादी लोकांचे मुखपत्रच होते. ज्या दिवशी कोंकणी राज्यभाषा विधेयक पास झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीचा गोमंतक घेण्यासाठी वाळपईला कशी गर्दी झाली होती त्याचे वर्णन आमच्या आंबेड्याच्या शाळेत जो पेपर घेऊन आला तो करीत होता. आपण शिताफीने पेपर कसा मिळवला याचे वर्णनही तो अगदी तिखटमीठ लावून सांगत होता.

‘अग्रलेख वाचा’ असे बाबांचे आम्हाला सांगणे असे. त्यामुळे अगदी नकळत्या वयातही मी अग्रलेख वाचू लागलो. रविवारच्या पुरवणीचे आकर्षक तेव्हाही लोकांमध्ये खूप होते. आमच्याकडे रविवारचा पेपर सोमवारी आणला जायचा, परंतु अगदी कंदिलाच्या उजेडात बसून देखील त्याचे वाचन व्हायचे.

राजभाषा आंदोलन असो, दयानंद नार्वेकर विरोधातील आंदोलन असो, हे सर्व आम्हाला समजत असे ते पेपरमधूनच! पेपर वाचणे ही सवय कधी झाली ते कळले ही नाही. मी कॉलेजमध्ये जाऊ लागलो त्यावेळी वाळपईला गाडीतून उतरलो की पहिल्यांदा पेपर विकत घेत असे आणि मग दुसऱ्या बसमध्ये चढत असे. कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी चळवळीशी जोडल्याने आमचेही फोटो आणि बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या आणि मग पेपर अधिक आवडीने वाचला जाऊ लागला.

अगदी कॉलेजमध्ये असतानाच वर्तमानपत्रातून माझे लेख प्रसिद्ध होऊ लागले होते. कोकण रेल्वे आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर लाठीहल्ला झाला होता त्यानंतर लगेचच काही दिवसात तत्कालीन शिक्षणमंत्री विनयकुमार उसगांवकर आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि कॉलेजच्या गेटवर आम्ही त्यांना घेराव घातला होता. या घेरावाची बातमी सर्व पेपरांची हेडलाईन्स झाली होती.

आम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असल्याने आमचा मराठी पेपर वाचण्याकडे जास्त ओढा होता का? पण तसे नसावे कारण तसे असल्यास इंग्रजीत शिक्षण घेत असलेले आजचे विद्यार्थी इंग्रजी पेपर वाचताना दिसले पाहिजे होते परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही.

एकूणच आज पेपर वाचण्याची सवयच कमी होताना दिसत आहे जे चिंताजनक आहे. पेपर वाचल्याने आपल्या सामान्यज्ञानात भर पडतेच पण त्याच बरोबर आपण चौकस देखील होतो.

अनेक पुरवण्यांमधून प्रसिद्ध झालेले लेख आपणाला विचार करण्यास प्रवृत्त करतात तर कथा, कविता आपणाला समृद्ध करण्याचे आणि आपणासही सर्जनशील लेखन करण्यास उद्युक्त करतात. आज विद्यार्थ्यांचे सर्जनशील लेखन कमी कमी होत चालले आहे. त्याचे एक मुख्य कारण कमी होत चाललेले नियमित पेपरांचे वाचन हे असण्याची शक्यता आहे.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात पारंपरिक वर्तमानपत्रे विशेषतः देशी भाषांमधील वर्तमानपत्रे कितपत तग धरू शकतील असाच प्रश्न विचारला जात आहे. पण ती टिकली पाहिजेत कारण अजूनही प्रबोधनाचे महत्त्वाचे काम ती करीत आहेत.

आमचा बौद्धिक पाया मजबूत करण्याचे काम दररोजच्या पेपर वाचनानेच केले. आजही माझ्या दिवसाची सुरुवात मराठी पेपरच्या वाचनानेच होते. परंतु आजच्या तरुण पिढीने वर्तमानपत्रांच्या वाचनाकडे दुर्लक्ष केल्यास समाजाचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान होणार आहे एवढे निश्चित!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT