पणजी: भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर किती जागा जिंकू शकतो, याविषयी सध्या चाचपणी सुरू आहे. भाजपने कुठेही राजकीय भागीदार नकोच, असे म्हटलेले नाही. कोणाला निवडणुकीत सोबत घेतले तर फायदा किंवा तोटा होऊ शकतो, याची शक्यता आजमावून पाहण्यात येत आहे. त्याविषयीचा निर्णय नेहमीच्या पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार वरिष्ठ घेतील, असे भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ‘गोमन्तक’ ला सांगितले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MG) या पारंपरिक सहकारी पक्षाला युतीसाठी सोबत घ्यायचेच नाही, असे भाजपने ठरवले आहे का, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. ‘गोमन्तक’ चे संचालक संपादक राजू नायक आणि मुख्य प्रतिनिधी अवित बगळे यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला.
निवडणूक तयारीविषयी.....
फडणवीस यांना निवडणूक तयारीविषयी विचारले असता ते म्हणाले, आम्ही ही निवडणूक पुरेशा गांभीर्याने घेतली आहे. सरकारने राज्याला दिलेले स्थैर्य, विकासकामे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वच्छ प्रतिमा या जमेच्या बाजू असल्या तरी निवडणूक आम्ही हलक्याने घेतलेली नाही. ती पुरेशा गांभीर्यानेच लढवली जाईल. स्व. मनोहर पर्रीकर आज आमच्यात नाही ही उणीव जरुर आहे. तरी त्यांचा वारसा आम्हाला फायदेशीर व पक्षाला पुढे नेणारा आहे. यावेळी मतदार विश्वासाने भाजपकडे पाहत असून ते आपले मत भाजपलाच देतील, याची आम्हाला खात्री आहे.
प्रश्न: प्रमोद महाजन राजकीय चर्चेसाठी गोव्यात यायचे तेव्हा तेथल्या तिथे निर्णय होत असे. आता भाजप संसदीय मंडळ निर्णय घेते यात कालहरण होते. कॉंग्रेस चटकन निर्णय घेत नाही, असा आरोप होतोय. आता तो भाजपबाबत होतो, असे वाटत नाही?
प्रत्येक पक्षात निर्णय घेण्याची एक पद्धती असते. भाजपचे बहुतांश निर्णय हे प्रदेश पातळीवरच घेतले जातात. काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून जाहीर करायचे असतात. काही निर्णय धोरणात्मक असतात. ते वरिष्ठ पातळीवरच घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय कोणता यावर तो कुठे घेतला जाणार हे ठरते. आम्ही किती चटकन निर्णय घेतो आणि पटकन त्याची अंमलबजावणी करतो, हे गुजरातेतील ताज्या राजकीय घडामोडींवरून दिसून आले असेल. असा निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेसने कितीतरी घोळ घातला असता.
प्रश्न:भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी सरकारच्या कार्यपद्धती आणि एकंदरीत राजकारण याविषयी नकारात्मक अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली होती. मुख्यमंत्र्यांच्या कामाविषयी तरी सारे समाधानी आहेत का?
आपण सांगता आहात तसा कोणताही अहवाल नाही. संघटनात्मक कामाचा आढावा घेतला जातो. त्याचे अहवाल वगैरे नसतात. जेथे काही कमी आहे तेथे त्रुटी दूर करण्यास तिथल्या तिथे सांगितले जाते. कोविड महामारी व्यवस्थापनाचा अलीकडच्या काळात कोणालाच अनुभव नव्हता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करूनच त्यातून शिकून पुढे जावे लागत होते. अगदी प्राणवायू निर्मितीकडे कोणी लक्ष दिले नव्हते, कारण एकूण प्राणवायूच्या केवळ दोन टक्के प्राणवायू वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष पुरवले, पण प्राणवायू वाहून नेण्यासाठी क्रायोजेनिक टॅंकर नव्हते. ते जगभरात जिथे मिळतील तेथून आणावे लागले.
प्रश्न:आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे निवडणुकीची जबाबदारी सोपवली असतानाही दिल्लीकडे बोट दाखवता. भाजप खरोखरच बदलला आहे?
मी सर्वांशी संवाद साधत आहे. त्यातून माझे राजकीय आकलन तयार होईल. त्या आधारे अहवाल होईल. त्याआधारेच तर वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. याचा अर्थ निर्णय केवळ त्यांनी घेतले असा होणार नाही. ती एक सामूहिक प्रक्रिया असते. प्रत्येकाची त्यातील भूमिका ठरवलेली असते. पक्षाची एक चौकट असते. अनुभवातून कोणते निर्णय कधी घ्यायचे हे ठरून गेलेले असते. त्यानुसार सारे काही होत असते.
प्रश्न: तरीही राज्य सरकारच्या कारभाराविषयी वरिष्ठ समाधानी आहेत का? आपले याबाबतचे काही वेगळे आकलन आहे का?
हे पहा, भाजपचे सरकार मग ते कोणत्याही राज्यातील असो त्याची कार्यपद्धती ही ठरून गेलेली असते. लक्ष द्यायचे घटक ठरलेले असतात. सध्याच्या सरकारच्या कारभाराविषयी वरिष्ठ खुश नाहीत, असे वाटण्याचे कोणतेही संकेत नाहीत. याउलट पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या दौऱ्यात आणि दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कारभाराची स्तुती केली आहे. यावरून तरी सरकार योग्य दिशेने कार्यरत आहे, असे माझे आकलन आहे. महाराष्ट्रात आम्ही वारंवार मागणी करूनही तेथील सरकारने पारंपरिक व्यावसायिकांना, बुलुतेदारांना मदत केली नाही, मात्र गोवा सरकारने केली हेही उदाहरण पुरेसे असावे.
प्रश्न: भाजपमध्ये 14 आमदार हे इतर पक्षातून आलेले आहेत. त्यांचे ओझे आता भाजपला जाणवू लागले आहे का?
त्यांच्यापैकी बहुतांशजण अनेक वर्षे निवडून येतच आहेत. पक्षविस्ताराचे एक धोरण असते. निवडणूक लढवत रहा आणि पक्ष विस्तार करा किंवा निवडून येणाऱ्यालाच आपली ध्येयधोरणे पटवा व पक्षात घ्या. ते पक्षात आल्याने साहजिकपणे पक्षाची शक्ती वाढली आहे. तेथे वर्षानुवर्षे भाजपसाठी कार्य करणाऱ्यांना विधानसभा उमेदवारी हा मार्ग बंद झाल्याचे समजता येते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे असे मार्ग बंद झालेल्यांना कुठे ना कुठे सामावून घेता येते. शेवटी निवडणूक लढवणे हेच अंतिम राजकीय ध्येय नसते.
प्रश्न: ज्या काळात भाजपची उमेदवारीही घेण्यासाठी कोणी पुढे येत नसे त्या काळात पक्ष रुजवण्याची जबाबदारी पार पाडलेल्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी सहन करावी लागणार आहे, त्याला कसे तोंड देणार?
इतर पक्षाचे कार्यकर्ते व भाजपचे नेते कार्यकर्ते यात मोठा फरक आहे. इतर पक्षाचे नेते कार्यकर्ते फक्त माझाच विचार करा, असे त्यांच्या पक्षश्रेष्ठींना सांगत असतात. भाजपचा नेता, कार्यकर्ता माझा विचार करा, असे म्हणतो पण त्यापुढील वाक्य पक्षाच्या हितासाठी काय योग्य तेही पहा असे असते. भाजप कार्यकर्त्याच्या हृदयात पक्ष सत्तेवर आला पाहिजे हीच भावना असते. त्यामुळे नाराजीला तोंड देण्याची आपण म्हणता त्या अर्थाने वेळ येणार नाही. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी २२ पक्षांचे सरकार चालवले तेव्हा त्यांना 370 कलम हटवता आले नाही आणि संसदेत पूर्ण बहुमत मिळाले तेव्हा 370 कलम हटवले गेले.
प्रश्न: पणजीत भाजपला राजकीय पेचास सामोरे जावे लागू शकते. स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी निवडणुकीच्या राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ते सक्रिय राजकारणात येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. ते पर्रीकर पुत्र असल्याने त्यांच्याविषयी प्रेम, आपुलकी आम्हा सर्वांना वाटणे साहजिक आहे. तेही मी पर्रीकर यांचा पुत्र आहे म्हणून मला उमेदवारी द्या, असे म्हणणार नाहीत. याउलट पक्षासाठी हे एवढे काम केले आहे आता माझा विचार करा, असे सांगतील असा विश्वास आहे. राजकीय कामासाठी अनेक प्रकारच्या संधी असतात. राज्याच्याच काय देशाच्या राजकीय इतिहासातून पर्रीकर हे नाव पुसता येणार नाही. त्यांचा वारसा पुसण्याचे कोणताही प्रयत्न नाही. व्यावहारीक विचार केला तरी त्यांच्या वारशाचा आम्हालाच फायदा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.