Gomantak Editorial Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: ग्रंथालय विषयाचा इंग्लिश-कोकणी शब्दकोश

दैनिक गोमन्तक

व्याकरण आणि कोश यांना भाषेचे डोळे म्हटले जाते. कोशातून ज्ञानसंग्रहाचे विशाल अंतरंग आपल्या समोर येते. कोश म्हणजे माहिती, ज्ञानाचा सारसंग्रह. विसाव्या शतकात ज्ञानाचा प्रचंड व वर्धिष्णू असणारा साठा तंत्रज्ञानाद्वारे कमीत कमी जागेत साठवता येतो व माहितीही झटपट मिळते. रोजच्या व्यवहारात कोशासारखा ज्ञानाचा संग्रह अभ्यासक, संशोधक आणि व्यासंगी लेखक यांना संदर्भसाधन म्हणून आवश्यक ठरतो. कोकणी संशोधक स्व. माधवी सरदेसाई यांनी आपल्या एका लेखात कोश साहित्याला भाषेची ’राखणे वेवस्था’(संरक्षक व्यवस्था) म्हटले आहे.

कोकणी भाषेतला पहिला कोश रचला गेला तो 1557 वर्षी. रायतुरच्या सेमिनरीत तिथल्या पाद्रीनी हा 15 हजार शब्दांचा ’कोकणी -पुर्तुगीज’ कोश रचला. या कोशाला देशी भाषांतला पहिला कोश असे मानतात. तदनंतर सतराव्या शतकांत दोन महत्त्वाचे कोश आले. 1626 साली रायतूरच्या सेमिनरीत हस्तलिखितांत आलेला ’कोकणी-पुर्तुगीज’ आणि ’पुर्तुगीज-कोकणी’ शब्दकोश. इटालियन जेझुइस्ट पाद्री आंजेलो फ्रांसिस्क शावियेर माफेय (1844-1899) यांनी मंगळूर येथे छापलेला आणि 1883 वर्षी प्रकाशित झालेला ’इंग्लिश-कोकणी(रोमी)’ कोश हा कोकणीतला पहिला छापून आलेला कोश.

त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा ’कोकणी(रोमी)-इंग्लिश’ कोश 1885 वर्षी प्रसिद्ध झाला. माफेयच्या कोशा नंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 1893साली मोन्सियोर सेबास्तियांव रुदोल्फ़ दाल्गाद यांनी ’इंदू प्रकाश प्रेस’, मुंबई इथे ’कोकणी-पुर्तुगीज’ शब्दकोश प्रसिद्ध केला. कोश साहित्यांत देवनागरी कोकणी वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. 1895साली ’पुर्तुगीज-कोकणी’ शब्दकोश त्यांनी प्रसिद्ध केला.

गोवा मुक्तीनंतर वीस वर्षांनी श्रीपाद देसाई यांनी 1980साली कोकणी-कोकणी या एकहाती खंडाचा प्रथम भाग प्रसिद्ध केला. या शब्दकोशाचे चार भाग प्रसिद्ध झाले. पेडण्याच्या सीताराम प्रकाशनने ते प्रसिद्ध केले. कोकणी शब्दकोशाच्या क्षेत्रात इतके भरीव काम पहिल्यांदाच केले गेले.नंतर प्रो.शांताराम हेदे यांनी रचलेला कोकणी एकभाषिक कोश 1992साली प्रकाशित झाला. तो कोकणी भाषा मंडळाने प्रसिद्ध केला.

गोव्याच्या जनमानसावर इंग्रजीचा प्रभाव वाढू लागला. अशा वेळी इंग्रजी-कोकणी शब्दकोशाची गरज भासू लागली. ही गरज ओळखून गुरुनाथ केळेकर यांनी 16 हजार शब्दांचा इंग्रजी-कोकणी (देवनागरी) शब्दकोश प्रसिद्ध केला.1985साली गोवा विद्यापीठाच्या स्थापने नंतर कोकणी विश्वकोश तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाचे पहिले संपादक होते डॉ. मनोहरराय सरदेसाई. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणी विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. नंतर डॉ. तानाजी हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरलेले तीन खंड प्रसिद्ध झाले.

एकूण 3632 पानाचे हे चार खंड 1991 ते 2000 पर्यंत प्रसिद्ध झाले. 1986साली गोवा कोकणी अकादमी स्थापन करण्यात आली. अकादमीने स्वतंत्र कोश मंडळातर्फे कोश निर्मितीचे व्यापक प्रकल्प हाती घेण्यात आले. अकादमीने चंद्रकांत केणी यांच्या संपादनाखाली ’इंग्रजी -कोकणी-हिंदी उतरावळ’, ’कोकणी शब्दसागर’ खंड ’अ’ आणि ’आ’ (संपादक: पांडुरंग भांगी), ’हिंदी -कोकणी’ शब्दकोश (संपादक - डॉ. अनंत राम भट) , ’इंग्रजी -कोकणी’ 14 हजार शब्दांचा कोश (संपादक: डॉ. मनोहरराय सरदेसार्इ), हे कोश प्रसिद्ध केले. हल्लीच अकादमीने डॉ. वामन नायक यांचा ’इंग्रजी -कोकणी समानार्थी-विरुद्धार्थी’ शब्दकोश पांडुरंग भांगी यांचा ’कोकणी शब्दसागर’ खंड तिसरा प्रसिद्ध केला आहे.

कोकणीतल्या कोश निर्मितीच्या या अवाढव्य कामात राजहंस संकल्पना प्रायव्हेट लिमिटेड, पणजी, यांचा मोलाचा सहभाग आहे. या प्रकाशनाने आतापर्यंत विविध कोश प्रसिद्ध केले आहेत त्यात ’कोकणी-इंग्लिश’ शब्दकोश सुरेश बोरकर, मुकेश थळी आणि दामोदर घाणेकर यांच्या सहरचनेखाली प्रसिद्ध केले आहेत. राजहंस संकल्पनेनेच 2009 साली सुरेश बोरकर आणि दामोदर घाणेकर यांच्या संपादनाखाली ’कोकणी सचित्र आष्टांगी अभ्यासकोश’ प्रसिद्ध केला. 50 हजारच्या वर शब्द आणि २००० पाने असलेला शब्दकोश कोकणी भाषेचा गळ्यांतला एक मोठा अलंकार मानला जातो. हल्लीच या प्रकाशनाने ’मराठी-कोकणी’ शब्दकोश प्रसिद्ध केला आहे.

जेव्हा कोविडमुळे जगातले सर्व व्यवहार ठप्प झाले होते तेव्हा गोवा विद्यापीठातील दोन प्राध्यापक डॉ. कार्लोस फर्नांडिस़ आणि मिलिंद़ म्हामल ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इंग्लिश-कोकणी शब्दकोश तयार करण्याच्या कामात गुंतलेले होते. या कामाचा परिपाक म्हणून हा शब्दकोश 4 एप्रिल 2023 रोजी विद्यापीठात प्रसिद्ध झाला. या शब्दकोशांत ग्रंथशास्त्रावरील चार हजार शब्दांचा अंतर्भाव झाला असून सुमारे एक हजार इंग्रजी शब्दांना नवीन कोकणी शब्द तयार करण्यात आले आहेत.

ग्रंथालय क्षेत्रासाठी हा शब्दकोश उपयोगी पडेलच पण अन्य कोकणी भाषिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. या शब्दकोशाला प्रसिद्ध कोशकार मुकेश थळी यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. वेगवेगळ्या विषयावरील कोश भाषेला समृद्ध बनवितात परिपूर्ण करतात. त्या निमित्याने या प्राध्यापक द्वयीचे आणि अभिनंदन करावे तितके थोडे. असेच विविध विषयावरील कोश येणे फार गरजेचे आहे.

कोकणी भाषेला भूक आहे ती बृहत् कोकणी-कोकणी शब्दकोशाची. ज्यात कर्नाटक, केरळ राज्यांत कोकणी भाषिक शब्द वापरतात त्यांचाही समावेश असावा. ऑनलाइन कोकणी कोश आहे. पण तो अधिक सर्मसमावेशक व्हायची गरज आहे. कोश वापरण्याची संस्कृती अंगी बाणावी म्हणून पालकांनी, शिक्षकांनी प्रयत्न करून मुलांवर संस्काऱ करण्याची गरज आहे. भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी त्याची अत्यंत निकड आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT