History

 

Dainik Gomantak

ब्लॉग

क्रांतिदर्शी मराठी शिलालेख

गोमंतकीय क्रांतिवीरांनी पोर्तुगीजांविरुद्ध आरंभ केलेल्या संघर्षात गोमंतकीय साहित्यिकांनीही क्रांतिज्वाला प्रज्वलित करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. गोमंतकात सत्ता गाजवणाऱ्या पोर्तुगीजांना आव्हान देणारे क्रांतीचे आलेख मराठी भाषेत शिलालेख, अग्रलेख, काव्यरचना, अभंग, नाटक यांमधून आविष्कृत झाले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतावर इ.स.1818 पासून इंग्रजांनी राज्य प्रस्थापित केले. पोर्तुगीजांनी सन 1510 पासून गोव्यावर राज्य केले. 1857 च्या उठावापूर्वी 1583 मध्ये गोव्यात विद्रोही क्रांतीला प्रारंभ झाला होता. पोर्तुगीजांनी कुंकळी, असोळणा येथील मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यावेळी झालेल्या गोमंतकीयांच्या हिंसक प्रतिकारात कित्येक मिशनऱ्यांचा जीव गेला. ख्रिस्तपुराण रचणाऱ्या फादर स्टीफन्सने या प्रसंगाचा उल्लेख आपल्या पत्रात केला होता.

गोमंतकीय इतिहास (History) संशोधक स. शं. देसाई यांनी आपल्या ‘पोर्तुगीज-मराठा संबंध’ या संशोधनात्मक ग्रंथात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या मंदिराचा गोमंतकीयांनी जीर्णोद्धार केल्याची नोंद केली आहे. 1568 मध्ये कुंकळी गावात असलेले श्री रामेश्वर मंदिर, पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मोडून टाकले होते. ते विठोजी मेगोजी यांनी पोर्तुगाली सत्तेला न घाबरता इ. स. 1579 मध्ये पुन्हा उभारले. त्या प्रसंगी त्यांनी एक शिलालेख तयार केला होता, त्यात लिहिले होते, “जो कुणी मराठा होऊनी हे मंदिर पुनरुपी बांधील त्याला काशीयात्रा केल्याचे पुण्य लाभेल.” हा मराठी शिलालेख क्रांतिदर्शी होता.

भारतकारांचे अग्रलेख

पोर्तुगीज (portuguese) काळात जय हिंद, भारत माता की जय, अशा शब्दांचा उच्चार करायलाही प्रतिबंध असतांना हेगडे देसाईंनी साप्ताहिकाला ‘भारत’ असे नाव दिले. भारतकार (India) गोविंद पुंडलिक हेगडे देसाई यांनी क्रांतिकारी पत्रकारिता करण्याचा मार्ग निर्भयपणे स्वीकारला होता. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर पोर्तुगीज सरकारने पन्नासएक खटले भरले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर कारावास भोगायलाही ते डगमगले नाहीत.

गामाचे श्राद्ध, खरा देशाभिमान पाहिजे, स्वदेशी व्रत आचारा, सत्यमेव जयते, आमचे स्वराज्य, सत्याग्रहाचे सामर्थ्य, दडपशाहीचे पर्यवसान, मुस्कटदाबी, स्वर्गस्थ पितरांचा संदेश, एक इशारा, उठा! जागे व्हा!, जोराने हल्ला करा अशा आपल्या सडेतोड जळजळीत अग्रलेखांच्या माध्यमाने भारतकारांनी गोमंतकीय जनतेमध्ये स्वातंत्र्य आकांक्षेचा अग्नी प्रज्वलित केला होता.

क्रांतिकारी काव्यरचना

कुंकळी येथे इ.स. 1583 पासून पोर्तुगीजांविरुद्ध विद्रोही क्रांतीला आरंभ झालाच होता. डॉ. राम मनोहर लोहियांनी 18 जून 1946 रोजी मडगाव येथे पुन्हा स्वातंत्र्याचा शंखनाद केला. गोमंतकीय कवींचा काव्यप्रतिभेतून त्याचा निनाद उमटला. ‘शांतीचा जयजयकार’ करणाऱ्या कविवर्य बा. भ. बोरकर यानी “त्रिवार मंगळवार आजला त्रिवार मंगळवार” अशा रचनेतून स्वातंत्र्याची सिंहगर्जना केली. “माझ्या गोव्याच्या भूमींत, खड्गा जडावाची मूठ! वीर-श्रृंगाराच्या भाळी साजे वैराग्याची तीट!!” अशा त्यांच्या काव्यपंक्तीमधील अंतःस्वर क्रांतीचा आहे.

देवांच्या मूर्ती पोर्तुगीजांकडून दुभंगल्या जात असताना आपली मातृभूमी गोमंतकला भूदेवीच्या स्वरूपात काव्यात वर्णन करण्याचे धाडस दामोदर अच्चुत कारे यांनी केले.

स्मरूनी गोमंतदेवी मूर्ती सौख्यदा

प्रेमभरे हृदय भरे नमन तव पदा

सम्राज्ञीपद तुझेच गमत सृष्टीचे

सिंहासन सह्याद्री खाली गालिचे

अंथरिले हरित धवल गवत वाळूचे

या प्रभावळीत भव्य पहुडशी सदा

प्रेमभरे हृदय भरे नमन तव पदा

असे गोमंतभूमीचे वर्णन असलेली यांची ही काव्यरचना त्यांच्या नंदादीप या काव्य संग्रहात आहे.

क्रांतिकारी अभंग आणि ध्येयगीते

क्रांतिदर्शी जीवनमुक्त महाराज आध्यात्मिक धर्मगुरू होते. पोर्तुगीजांनी क्रांतीचे गोव्यात दमन करण्यासाठी पोलिस अधिकारी कास्मिरो मॉन्तेरो याची नेमणूक केली. त्याने असंख्य क्रांतिविरांचा अमानुष छळ आरंभला होता. असह्य वेदनांना सामोरे जात अस्नोडा येथील बाळा राया मापारी, गोव्याच्या क्रांतियज्ञातील प्रथम हुतात्मा ठरले. त्याचा प्रतिशोध घेणारे पेडणे तालुक्यातील बाळा देसाई आणि बापू गवस मोन्तेरोमुळेच वीरगतीला प्राप्त झाले. जीवनमुक्त महाराजांनी वारंवार त्यांचे स्मरण करून दिले आहे.

“धन्य धन्य ते मर्द तरुण । मातृभूमीसाठी दिला प्राण ।।” अशा अभंगामधून महाराजांनी अमरवीरांना अभिवादन केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा आदर्श स्वीकारून गोव्यात आझाद गोमंतक दलाची स्थापना झाली होती. बोस यांच्याविषयी जीवनमुक्त महाराजांच्या मनात नितांत आदर होता. आपल्या अभंगातून त्यांनी शौर्यगाथेचा गौरव केला आहे. “सुभाष वीर तो भला । ज्यांनी क्रांतयोग केला ।। 1 ।।” श्रीमद्भगवतगीतेतील ‘ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग’ या शब्दांप्रमाणे, या अभंगातून ‘क्रांतियोग’ या अर्थपूर्ण शब्दाची योजना केल्याचे दिसून येते. महाराजांचे शिष्य नारायण शिरोडकर आणि यशवंत मडगावकर आझाद गोमंतक दलाचे सक्रिय सदस्य होते. याच दलाच्या ध्येय गीताची रचना गजानन रायकर यांनी केली होती.

ऊठ शूर सैनिका, टाकुनिया खिन्नता!

निसर्ग तुला प्रेमाने देई आसरा !

जनतेची शक्ती, तुझ्या पाठीशी वीरा!

डोंगर दरी कपारीत, माळरान खोऱ्यातूनी!

वादळी थैमान घाल, गनिमी घाला!!

गजानन रायकर आणखी एक प्रेरणादायी ध्येयगीत आहे. पोर्तुगीजांच्या आधीन असलेल्या राजधानी पणजीवर चाल करून येणाऱ्या, असंख्य सत्याग्रही क्रांतिवीरांनी, हातात भारताचा तिरंगी ध्वज घेऊन “रोवू चला पाणजीवर विजयी झेंडे” ध्येयगीत म्हणत पोर्तुगीजांशी झुंज दिली होती.

‘जळता गोमंतक’ नाटक

पोर्तुगीजांची सत्ता असताना त्यांच्याच विरोधातील कथाशय नाटकातून रंगभूमीवर सदर करण्याचे धाडसी प्रयोगही गोमंतकीय नाट्यकलाकारांनी केले. गोवा मुक्तिसंग्रामावर आधारित सखाराम बर्वें लिखित ''जळता गोमंतक'' हे नाटक लक्षवेधी ठरले होते. ऐतिहासिक घटना प्रसंग जसे घडले तसेच रंगभूमीवर प्रस्तुत केले. मोहन रानडे आणि सहकारी यांच्या गोमंतकातील सशस्त्र क्रांतीचा ज्वलंत इतिहास रंगमंचावर सादर करण्यात हे नाटक यशस्वी ठरले आहे.

प्रा. विनय मडगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT