Ghungroo payal Dainik Gomantak
ब्लॉग

मंद मंद वाजत आयलीं...

गोमन्तक डिजिटल टीम

Ghungroo payal मैत्रिणीच्या पायातले पैंजण बघताक्षणी मला आवडले. तिने ते कुठून घेतले, कितीला घेतले, किती डिझाइन्स पाहिले, सगळ्याची माहिती मी काढून घेतली. दुसऱ्या दिवशी मी लगेच दुकानात गेले. तिथल्या बाईने पन्नास - साठ डिझाइन्स सहज आणून माझ्यासमोर ठेवले अन् म्हणाली, ‘बघा, पसंत करा’. आता माझा गोंधळ उडाला.

किती ऑप्शन्स होते समोर! नाजूक मोरांची नक्षी असलेले, वेलींमध्ये केशरी-पिवळी-निळी फुले कोरलेले, चंद्रकोर कोरून त्याला खाली घुंगरू लावलेले, मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा ओवलेले, मेंदीचे तोरण लावलेले, पिंपळाच्या पानांची वेलबुट्टी असलेले, सप्तरंगी चांदण्या लावलेले इतक्या पैंजणांचे प्रकार पाहून मी अक्षरशः वेडी झाले.

चांगले तास - दोन तास लावून मी शेवटी माझ्यासाठी एक पैंजण निवडले. दुसऱ्या दिवसापासून मी नव्या कॉलेजमध्ये शिकवायला जाणार होते. त्याच दिवशी या पैंजणांचे उद्घाटन करायचे मी मनाशी ठरवले.

दुसरा दिवस उजाडला. नव्या कॉलेजमधला माझा पहिला दिवस. पहिला दिवस म्हटल्यावर मी जरा जास्तच लवकर उठले. छान वेळ घेऊन तयार झाले. मनासारखे आवरल्यानंतर आदल्या दिवशी आणलेली छोटी गोल डबी उघडली. एवढ्याश्या त्या डबीला आतून मऊ-मुलायम आवरण होते.

त्या मखमली जाजमावरच्या गुलाबी कागदातून चंदेरी चांदण्या डोकावून माझ्याकडे पाहत होत्या. मी अलगद घडी उघडली. फुलपाखराने पंख मिटावेत तितक्या अलगद चिमटीने एक पैंजण उचलले आणि पायांत घातले. चमचमणारी आणि छमछमणारी पावले पाहून माझी मीच खूष झाले.

पैंजणांचे माझे हे वेड अगदी अलीकडचे आहे. लहानपणी इतक्या हौसेने मी कधी पैंजण घातलेले मला आठवत नाहीत. म्हणजे अगदी लहान वयात घुंगुरवाळे घातले जायचे तेवढेच! नंतर मी थोडीशी मोठी झाले, शाळेत जाऊ लागले. शाळेत जाताना मोजे आणि शूज घालणे आम्हांला सक्तीचे होते. त्यावेळी पायातले पैंजण मोजांच्या आत घालावे लागत.

मला त्याचा त्रास होई. घुंगरू टोचून खाज सुटे. त्यामुळे शाळेत असताना मी कधी पैंजण घातलेच नाहीत. पुढे शाळा मागे राहिली आणि मी कॉलेजमध्ये जाऊ लागले. कॉलेजमध्ये गेल्यावर कविता वाचण्याचा नाद जडला. फार गहन-गूढ नव्हे पण बालकवींच्या निसर्गकविता, इंदिराबाईंच्या प्रेमकविता आणि खासकरून शांताबाईंच्या कोणत्याही कविता आणि गीते वाचायला मला आवडत असत.

असेच एकदा वाचनालयात पुस्तके चाळता-चाळता ना. धों. महानोरांचे पुस्तक हाती आले. संग्रह वाचायला सुरुवात केली आणि जणू माझ्या मनाला रानभूल पडली. कसल्यातरी विलक्षण हिरव्या चैतन्याची मोहिनी माझ्या मनावर पडली आणि ना. धों.च्या कवितांचे बोट धरून मी रानातल्या वाटा चालू लागले.

चालता-चालता एका ओळीवर एके ठिकाणी माझी पावले थबकली. जोंधळ्याला चांदणे लखडून जावे कोणीतरी हळूच येऊन माझ्या कानात मंद पैंजण वाजवतेय असा मला भास झाला. इतके लावण्य मी यापूर्वी कधीही कोणत्याही कवितेत अनुभवले नव्हते.

न जाणे, केवळ त्या एका अनुभवासाठी मी ती ओळ पुनः - पुनः किती वेळा वाचली! त्या नऊ शब्दांनी माझ्या मनावर अशी मोहिनी घातली की का कुणास ठाऊक त्या क्षणी मला पायांत पैंजण घालावेसे वाटले आणि त्या दिवसापासून आजतागायत मी रोज पैंजण घालते.

जुने पैंजण उतरवून मी कपाटात ठेवले आणि अगदी खुशीत येत हे नवे पैंजण घालून कॉलेजमध्ये गेले. कॉलेजच्या काही फॉर्मेलिटीज होत्या त्या पूर्ण केल्या आणि स्टाफरूममध्ये गेले. बरेचसे शिक्षक आपापल्या तासाला वर्गात गेले होते. जे स्टाफरूममध्ये होते त्या सगळ्यांच्या माना कामात गढून गेल्या होत्या.

त्या शांत वातावरणात मी एकदम हसऱ्या चेहऱ्याने प्रवेश केला आणि अनपेक्षितपणे अचानक सगळ्यांनी कान टवकारले. जो-तो माना वळवून कोण आलेय म्हणून पाहू लागला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अनोळखी भाव होता. पण तो नव्या ‘माणसासाठी’ नव्हता, मला तो काहीसा त्रस्त वाटला.

पिन ड्रॉप सायलेन्स असलेल्या त्या वातावरणात केवळ माझ्याच पैंजणांचा आवाज येत होता. तो ही, एरव्हीपेक्षा जरा जास्तच! याची जाणीव होताच मी ओशाळले. कामाच्या ठिकाणी कसे जावे याचे मला अजिबात भान नाही असे वाटून मी शरमिंदी झाले. शक्य तितक्या हळुवार पावले टाकत मी माझ्या टेबलवर जाऊन बसले.

संपूर्ण दिवस, कॉलेजमध्ये मी अगदी चोरून चोरून पावले टाकत फिरत होते. कॉलेज सुटून घरी आले तेव्हा कुठे मला मोकळे वाटले. पुढे आठवडाभर मी अगदी काळजीपूर्वक, हलक्या पावलांनी, पैंजणांचा आवाज होऊ न देता चालायचे.

पण अगदी थोड्याच दिवसांत माझे पाय दुखू लागले. दिवसभर दबकत दबकत चालल्याने पायांवर ताण येता होता आणि त्यातून एक दुखणे हळूहळू डोकेवर काढू पाहत होते. शेवटी, नकोच तो त्रास म्हणून कंटाळून मी पैंजण काढून ठेवायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी, पैंजण नसलेल्या उघड्या पावलांनी मी कॉलेजमध्ये गेले. स्टाफरूममध्ये आल्यावर सवयीने सगळ्यांना ‘गुडमॉर्निंग’ म्हटलं. माझ्या बाजूच्याच टेबलवर कोकणीचे प्राध्यापक बसत होते. टेबलवर बसता-बसता हसून मी त्यांनाही ‘गुडमॉर्निंग’ म्हटले.

‘आगो, पांयजणां गो तुजी?’ माझ्या गुडमॉर्निंगवर त्यांचा प्रश्न धडकला आणि मला आश्चर्य वाटले.

म्हणाले, ‘ना सर, पावसाचे दीस न्हीं! चिखल भरता उदकांतलो. म्हणून धुवपाक काडिल्लीं. ती घालपाची उल्लीं’. मी काहीतरी सारवासारव केली. कामाच्या ठिकाणी पैंजण घालून यायला मला लाज वाटते हे खरे कारण मला त्यांना कळू द्यायचे नव्हते. माझ्या उत्तरावर ते लगेच म्हणाले,

‘फाल्यां यादीन घाल. तू जाणां? बाकीबाब म्हजे दैवत! तुजी पांयजणां वाजतकच सदांच म्हाका बाकीबाबालें ते कवन याद जाता, ‘मंद मंद वाजत आयलीं तुजी गो पांयजणां’ आनी म्हजो दीस बरो वता.

वर्गांत जेन्ना हांव भुरग्यांक ती कविता शिकायता तेन्ना सदांच तुजी पांयजणां म्हज्या दोळ्यांमुखार येतात आणि तोच आवाज म्हज्या कानांत घुमता. तू घाल हां पांयजणां’. माझ्या पैंजणांबद्दल मला मिळालेली ही प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित होती. मी मनोमन सुखावले.

मला पहिल्याच तासाला वर्गात जायचे होत. हा तास कमी विद्यार्थ्यांचा असल्यामुळे शेवटच्या मजल्यावर अगदी आडोशाला कोपऱ्यात असलेला एक लहानसा वर्ग आम्हांला दिला होता. मी घाईघाईत तासाची तयारी केली आणि वर्गात गेले. वर्गात पाऊल ठेवते न ठेवते तोच मुली किंचाळल्या.

‘काय मिस! किती घाबरलो आम्ही!’ त्यांचे चेहरे रडवेले झाले होते.

‘अगं, काय झालं इतकं दचकायला?’ मी न कळून विचारले.

‘मिस, तुमची पैंजणं कुठे आहेत? रोज तुम्ही येता, तुमची पैंजणं वाजतात, आम्हांला कळतं की तुम्ही येत आहात. आज तुम्ही अशा अचानक आलात, पैंजणांचा आवाज नसताना किती घाबरलो आम्ही!’

‘मिस, सॉरी हं! मी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतेय, तुम्ही पैंजणं घाला. आम्हांला वर्गात खूप प्रसन्न वाटतं. कसं माहीत नाही पण तो आवाजच एकदम रिफ्रेशिंग वाटतो. सदैव खळखळणाऱ्या झऱ्यासारखा!’ एक विद्यार्थिनी म्हणाली.

माझ्यासाठी हे सारेच फार नवीन होते. हे सगळे अनुभव बघता मीच काहीतरी चुकीची समजूत करून घेते आहे असे मला वाटू लागले. नको त्या गोष्टींचा नको तसा अर्थ लावतेय, चांगल्या गोष्टींची किंबहुना माझ्या संस्कृतीने मला भरभरून दिलेल्या लेण्यांची मी नाहक लाज बाळगतेय असे वाटू लागले.

संध्याकाळी घरी आले. कपाटात ठेवलेले पैंजण पुनः बाहेर काढले. त्यांची माया जणू माझ्या बोटांत उतरत होती. अलगद हातांनी जेव्हा मी ते पैंजण पायांत घातले तेव्हा त्यांची प्रभा माझ्या डोळ्यांत चमकून उठली.

दुसऱ्या दिवशी पैंजणांसकट अगदी अभिमानाने, तोऱ्यात चालत मी स्टाफरूममध्ये प्रवेश केला. गंमत सांगू? आश्चर्य वाटेल..... त्या दिवशी स्टाफरूममध्ये अजून दोन शिक्षिका पैंजण घालून आल्या होत्या...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT