शिगमोत्सवाचेच ते दिवस होते.फाल्गुन मासात ढोल ताशांचा निनादात लहान पासून थोरांपर्यंत सर्वांचीच पावले थिरकत होती.अंगात उधाण वारा संचारलेला,बेहोशी, बेधुंद, नशा चढलेली.
आपले लाडके ग्रामदैवत रवळनाथाच्या प्रांगणात परंपरेने चालत आलेल्या गडे उत्सवाचा थरार अनुभवण्यासाठी आणि या अतर्क्य अभिव्यक्ती समोर नतमस्तक होण्यासाठी लोक दाटीवाटीने उभे राहिले होते.एक एक करीत गडे पडत होते.
अंगागात वीज संचारल्यागत ते थिरकत होते,ती होती त्यांची एक उन्मनी अवस्था! भारलेल्या अवस्थेत देहभान विसरून…ते नृत्य करीत होते. वर्षोनुवर्षे ही परंपरा आमोणा गावाने जोपासलेली होती.
मंदिराच्या प्रांगणात हा उत्सव साजरा व्हायचा.गडे अवसरच्या स्थितीत मंदिरासमोरून जंगलाच्या.. त्या तिथे पठारावर स्मशानाच्या दिशेने धावत जायचे…तिथे विसावा घेत पहाटेच्या सुमारास पुन्हा मंदिराच्या प्रांगणात येऊन विसर्जित होत असत.
हीच परंपरा गेल्या कित्येक पिढ्यांची…आमोणा गावातील लोकमानसाने ऐकलेली….अनुभवलेली…पण त्या एका रात्री मात्र अगदीच अघटीत.. अनाकलनीय… अविश्वसनीय अदभूत असे काहीतरी घडले.दरवर्षी प्रमाणेच गड्यांचा उत्सव उत्स्फूर्तपणे साजरा होत होता.लोकांची गर्दी शिगेला पोहोचली होती.ढोल,ताशाच्या निनादात गड्यांवर आलेला अवसर वर वर चढत होता.
शेवटी तो क्षण आला.ज्या क्षणी गडे एकामागून एक दूर जंगलात धावू लागले…उत्सवाचा मांड काही वेळ शांत झाला .लोक गडे परतण्याची वाट पाहू लागले.मध्यरात्री स्मशानात गेलेले गडे सकाळी पहाटेच्या प्रहरी परतायला हवे होते.पण तसे घडले नाही.लोकमानस चिंताग्रस्त झाले.
गडे एकाएकी गूढरीत्या गायब झाले तरी कसे?जमलेल्या सर्वांच्याच मुखात हेच शब्द.सूक्ष्मशी भीती भाविकांच्या हृदयात निर्माण झाली होती.आपलं काही चुकलं तर नाही ना?गूढत्वाच्या छटा अधिकच गडद होत गेल्या.या घटनेला अनाकलनीयतेचे वलय होते.कसे घडले ? काय घडले? कोणी घडवून आणले?कोठे असतील गडे? परत का आले नाहीत.
गड्यांचा नातेवाईकांच्या, बायका मुलांच्या डोळ्यात अगतिक असाहाय्यता दाटून आली.त्यांचे हातपाय गळून गेले…काळजाला चरे पाडणारी शांतता सभोवतालाला बोचत टोचत होती.आता असे हातपाय गाळून बसणे शक्य नाही.काहीतरी करायलाच हवे असे म्हणून जुने जाणते लोक उठले.तिथंच असलेल्या रुपोभगत ज्या घुमटीसमोर उभे राहिले.काकुळतीला येत कळकळीने’ तळमळीने रुपोभगतला साकडे घातले.‘‘स्मशानात गेले गडे आजून कशे ना परतले”असे म्हणून गाऱ्हाणे घातले खरे, तेथल्या तेथेच एका बारा वर्षाच्या मुलांवर अवसर आला. अवसाराच्या जोरावर त्याने समूहाला सांगितले…‘‘या स्थळाचे गडे मी मिळवून देतो,मात्र एक अट आहे.की गड्यांची सुटका झाल्यावर एक तर माझी कुड जिवंत असणार नाहीतर गडे जिवंत राहतील.”उपस्थित सर्वानाच परत एकदा धक्का बसला.त्या कोवळ्या मुलाच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.काय करावे?त्यांनाही काही सुचेना.गडे आहेत तसेच परत प्राप्त होणे हा गावाच्या अस्मितेचा तसेच,भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न होता.शिवाय गडे तीस,चाळीस,पन्नासच्या आसपास होते.
एका व्यक्तीला जिवंत ठेवायचे तर पस्तीस चाळीस जणांचे प्राण जातात,आणि एकटा गेला तर सर्वच गडे वाचणार.प्रश्न मोठा बाका होता.गावाच्या हिताच्या दृष्टीने तो कोवळा मुलगा बळी जायला तयार झाला…गावासाठी तो हौतात्म्य पत्करायला तयार झाला.अवसरावर तो धावत जंगलात गेला..तिथे बसलेल्या मंत्रिकाच्या शेंडीला पकडून फरफटत मांडावर घेऊन आला..त्या कोवळ्या मुलाचा रुद्रावतार पाहून सर्वानाच कंप सुटला होता.उग्र,आडदांड मांत्रिक समोर दिसत होता…मात्र गडे कोठेच दिसत नव्हते.
लोकांच्या नजरेतून गड्यांचा शोध चालूच होता.एवढ्यातच त्या कोवळ्या मुलाने अवसाराच्या अवस्थेत त्या मंत्रिकाच्या कमरेत जोराची लाथ घातली.तो जमिनीवर पालथा पडलेला होता..लाथ हाणल्याबरोबर त्याच्या मुखातून एक दगड बाहेर पडला..
आणि काय आश्चर्य? बघता बघता त्या दगडाचे रूपांतर गड्यात झाले.पुढे असेच होत गेले..मुलगा जोरात लाथ मारायचा, इकडे त्याच्या तोंडातून एकेक दगड बाहेर पडायचा.. त्याच दगडाचे रूपांतर मग गड्यात व्ह्यायचे..सर्व गडे मांत्रिकाच्या मुखातून बाहेर पडले आणि क्षणार्धात मुलगा आणि मांत्रिक अंतर्धान पावले.
त्या मुलांच्या रूपाने रुपोभगताने गावचे रक्षण केले होते. दुःख आणि आनंद याचे मिश्रण त्या वातावरणाशी समरस झाले.गावचे रक्षण करणारा…गावाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान करणारी ती व्यक्ती म्हणजे “रुपोभगत” होता,असे लोक सांगतात.
रुपोभगत आणि बाबली भगत हे दोघेही सख्खे भाऊ. आमोणा गावात ते फिरत फिरत कधी एकेकाळी आले. स्थिरावले ते कोणालाच माहिती नाही.रुपोभगत अगोदर आले? की बाबली भगत? हे एक गूढच आहे.
गावचे भगत या दोन भावाना जोडून आहेत.मात्र ते किती काळापासून इथं नांदताहेत हे कोणालाही माहिती नाही.ते या गावात आले..नाथसंप्रदायाचे गोरक्षनाथ,गहिनीनाथ यांचे अनुयायी बनून विभूती लावणे,दोरे बांधून भक्तांना दिलासा दिला.
आजही आमोणा गावाच्या जत्रेत या परंपरेचे पालन केले जाते. गुरूवर त्यांची असीम निष्ठा.त्या निष्ठेच्या बळावर त्यांनी योगसिद्धी प्राप्त केली.गावाशी ते समरस झाले. गावकऱ्यांच्या सुखदुःखाशी जोडले गेले.
गावाचे लोकमनाचे संकटापासून रक्षण करणे हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले.अडीअडचणीला लोक रुपोभगताकडे येऊ लागले. गाऱ्हाणे मांडू लागले.त्याने लावलेल्या विभूतीने त्यांना दिलासा मिळू लागला.
हे असेच चालू राहिले.गावाचे त्यांच्याशी नाते दृढ बनले.हळूहळू करून रुपोभगताची कीर्ती थेट बंगालपर्यंत पोहोचली. बंगाल मधील मांत्रिकाला रुपोभगताचा हेवा वाटू लागला.कोण कुठला हा रुपोभगत? त्याला कशी सिद्धी प्राप्त झाली?मी असा अघोरी विद्या शिकून मला कोणी वश होत नाहीत?एवढा हा रुपोभगत कोण लागून गेला आहे? एकदा तरी त्याच्या जवळ जायचेच!या विचारानेच मांत्रिक रुपोभगताचा शोध घेत घेत.
आमोण्याच्या जंगलात स्थिरावला.त्याने गडे उत्सवात हाहाकार माजविण्याचे ठरविले.झालेही तसेच.एकेक गडा मांडावरून धावत स्मशानाच्या दिशेने जायचा.मांत्रिक तिथेच टपून बसलेला होता.
तो पटकन गड्याला पकडायचा.मंत्रसामार्थ्याने त्याचा दगड बनवायचा..व मटकन गिळून टाकायचा…हे असे एक दोन नाही तर कित्येक जिवंत गड्याना त्यांनी दगड बनवून गिळून टाकले. या घटनेमुळे गावावर आरिष्ट आले असते.परंतु रुपोभगताने ते थोपवून धरले.अशी लोकांची श्रद्धा आहे.
रुपोभगताने मांत्रिक गावात येण्यापूर्वीच आपलं गावाप्रतीचे कार्य उरकून समाधी घेतली होती.मात्र मांत्रिकाने गावाला धर्मसंकटात घातल्यामुळे त्याला मुलाच्या रुपात अवतीर्ण व्हावे लागले. तो अमर झाला.आजही गावच्या रवळनाथ भूतनाथाच्या तरंगा मध्ये रुपोभगताचा कळस माथ्यावर घेऊन कोवळा मुलगा घराघरात फिरतो तिथे त्याची सन्मानाने पूजा केली जाते.
रवळनाथाच्या प्रांगणात रुपोभगत, बाबली भगत यांच्या जशा समाधी आहेत तसेच या अनाकलनीय घटनेची येणाऱ्या पिढीला जाणीव व्हावी म्हणून तो कोवळा मुलगा आणि मांत्रिक याचीही प्रतिकचिन्हे आढळतात… त्यांच्यासमोर नतमस्तक होत गावकरी आपल्या व्यथा वेदना मांडतात….समस्यातून मार्ग दाखविण्यासाठी साकडे घालतात ..आणि निश्चिंत होतात.रुपेभगत गावाचे रक्षण करणारच! हीच अढळ श्रध्दा त्यामागे असते….
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.