

Karnataka Crime News: कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली, जिथे एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करुन त्यांचे मृतदेह घरातच गाडून टाकले. 27 जानेवारी रोजी घडलेल्या या भीषण गुन्ह्यामध्ये आरोपी अक्षय कुमार याने त्याचे वडील भीमराज, आई जयलक्ष्मी आणि बहीण अमृता यांची हत्या केली.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील डोड्डाकिट्टाडाहल्ली गावचा मूळ रहिवासी असलेला अक्षय आपल्या कुटुंबासह गेल्या काही वर्षांपासून कोट्टूर येथील एका भाड्याच्या घरात राहत होता, जिथे हा संपूर्ण थरार घडला. हे कुटुंब टायर रिट्रेडिंगचा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करत होते, मात्र एका कौटुंबिक वादाचे रुपांतर इतक्या मोठ्या हत्याकांडात होईल, अशी कल्पनाही कोणाला नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येमागचे कारण अक्षयच्या बहिणीचे प्रेमप्रकरण असल्याचे समोर येत आहे. अक्षयची बहीण अमृता एका तरुणावर प्रेम करत होती, ज्याला अक्षयचा तीव्र विरोध होता. या मुद्द्यावरुन घरात वारंवार भांडणे होत असत. घटनेच्या दिवशी जेव्हा आई-वडिलांनी अक्षयला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांसह बहिणीवर हल्ला करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घराच्या आवारातच खड्डा खणून तिघांचेही मृतदेह गाडून टाकले आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिथून पळ काढला.
अक्षयने केवळ हत्याच केली नाही, तर पोलिसांची (Police) दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. त्याने बंगळुरु येथील टिळक नगर पोलीस ठाण्यात जाऊन आपले आई-वडील आणि बहीण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली, तेव्हा त्याच्या बोलण्यातील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला.
सततच्या चौकशीनंतर अक्षयने अखेर आपला गुन्हा कबूल केला आणि तिहेरी हत्याकांडाचा खुलासा केला. या घटनेची माहिती मिळताच विजयनगरच्या पोलीस अधीक्षक जाह्नवी आणि कुडलिगीचे डीएसपी मल्लेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या अक्षयला त्या भाड्याच्या घरी नेले जात आहे, जेणेकरुन मृतदेह गाडलेली नेमकी जागा शोधून ते बाहेर काढता येतील. या घटनेने संपूर्ण कर्नाटक राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.