‘आमचे गोंय आमकां जाय, तुमी भायले तुमच्या देशान वचात’! पोर्तुगीज पोलिसांनी फुटक्या ‘काऊटेल’ चाबकानं अक्षरश: फोडून काढलं..

Portuguese police brutality Goa: ऍन्ड्रयु आणि त्याच्या सहयोगी पोलिसांनी विशेषतः काम्पुस काबन आमच्या पाठी काळ्या निळ्या होईतोवर आम्हाला फोडून काढलं.
 Portuguese police brutality Goa| Goa History|
Portuguese police brutality Goa| Goa HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

सूर्यकांत काळोखे

गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे आम्ही केलेल्या विद्यार्थी सत्याग्रहामुळे आम्हांला कोठडीत लोटलं आणि ‘तुमका नेहरू जाय काय दांडो जाय?’, असे विचारत फुटक्या ‘काऊटेल’ चाबकानं अक्षरश: फोडून काढलं. ऍन्ड्रयु आणि त्याच्या सहयोगी पोलिसांनी विशेषतः काम्पुस काबन आमच्या पाठी काळ्या निळ्या होईतोवर आम्हाला फोडून काढलं.

थोबाडून आमचे चेहरे सुजवून ठेवले. आम्ही अर्धमेले होऊन पडलो. मार चुकवण्यासाठी आम्ही जमिनीवर लोळण घेतली. आम्हां सगळ्यांना एका कोठडीत आणि आमचा पुढारी श्रीकांतला दुसऱ्या कोठडीत टाकलं होतं.

मी अवघा १४ वर्षांचा होतो तर श्रीकांत माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा होता. आम्ही पाचजण एकमेकांना धीर देत मार खात होतो. पण श्रीकांत बिचारा एकटा पडला. त्याला त्यांनी काऊटेलबरोबरच लाथा-बुक्क्यांनी तुडवला.

असह्य होऊन आम्ही वेदनेनं विव्हळत होतो तर श्रीकांतच्या तोंडून किंकाळ्या फुटत होत्या. पण ना त्याने ना आम्ही आमच्या हातातले तिरंगे सोडले. तोंडावर फटके बसत होते, तरीही तोंडून ‘जय हिंद’ निघत होतं.

शेवटी मार असह्य झाल्यावर आमच्यापैकी वयाने सगळ्यात लहान म्हणजे १३ वर्षांच्या शंभूशेटनं मोठ्याने गळा काढला. तो बिचारा लाडाकोडात वाढलेला. नाजुक चणीचा, गोरापान. मारामुळं लालभडक होऊन गेला. मार असह्य होऊन रागानं तो दातओठ खात ओरडला, ‘आमचे गोंय आमकां जाय, तुमी भायले तुमच्या देशान वचात.’ त्याबरोबर त्याच्या पाठीवर काऊटल कडाडला आणि शंभूशेट निपचित पडला.

आम्ही गळे काढले जोराने. आम्हांला वाटलं शंभू मेला. मग मात्र म्हापसा पोलिस स्टेशनचा कोमानाद (पोलिस इन्स्पेक्टर) जेरार्ड आमच्या कोठडीत अवतरला. त्याने आमच्यावर तुटून पडलेल्या त्या राक्षसांना आवरलं.

आमची नाव विचारली आणि आपल्या एका शिपायाला हाक मारली. तो म्हापशाचाच होता. त्याला आमच्या प्रत्येकाची घरं माहीत होती. त्याला आम्हां प्रत्येकाच्या वडिलांना बोलावून आणायला पिटाळलं. प्रत्येकाचं कुणी ना कुणी आलं. माझे बाबा, त्यांना आम्ही काका म्हणायचो, ते चांगलं पोर्तुगीज बोलायचे.

त्यांचं जे काही शिक्षण झालं होतं ते पोर्तुगीज भाषेतून झालेलं. ते ज्या कंपनीत काम करायचे तिथलं कामकाज त्याच भाषेतून चालायचं. त्यामुळे ते त्या जेरार्ड नावाच्या कोमानादकडे अस्खलित पोर्तुगीज बोलले. कदाचित त्यामुळेच असेल पण नंतर काही आमची पिटाई झाली नाही.

काकांचं आणि त्या जेरार्डचं काय बोलणं झालं त्यांनाच माहीत. इथं कुणा लेकाला पोर्तुगीज येेत होती? पण काकांनी त्याच्याकडे बोलणं झाल्यावर माझ्याकडे वळून मला विचारलं, ‘काय रे काय हवं तुला?’

एरवी काका घरात आले रे आले की मुंडी खाली घालून पुस्तकात डोकं खुपसायचो. पण त्या दिवशी माझ्या अंगात गोवामुक्तीचं वारं संचारलं होतं. मी मान अगदी ताठ ठेवली. काकांच्या डोळ्यात थेट बघितलं आणि अगदी जोरात बोललो, ‘‘स्वातंत्र्य!’’

जेरार्ड आणि काकामध्ये काहीतरी बोलणं झालं. काका ‘‘बरे तर’’ असं माझ्याकडे बघत पुटपुटले आणि वळून सरळ पोलीस स्टेशनच्या बाहेरच पडले. बाकीच्यांचे बाबाही निघून गेले. आम्ही आपले शूरवीर सरदारांसारखे दुरवरी अंग सावरत जमिनीवर बसलो.

 Portuguese police brutality Goa| Goa History|
Portuguese Goa History: 1895 साली दादा राणेंनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं; आफ्रिकेत पोहोचले गोव्यातले सच्चे मराठे सैनिक

पोटात कावळे ओरडत होते. स्वातंत्र्य मिळेल आज ना उद्या पण या भुकेचं काय करायचं? कुणाच्याही खिशात काहीही नव्हतं.

चणे-फुटाणे, कुरमुरे, बोरं काहीही चाललं असतं. पाणी मागितल्यावर प्यायला पाणी दिलं. पण तेही एकच टमरेलभर. पण निदान दिलं. एकाच टमरेलातून आळीपाळीने पाणी प्यायलो. पुन्हा मागितलं तर ‘नाही’ म्हणाले. काय करणार? मग गुपचूप बसलो.

 Portuguese police brutality Goa| Goa History|
Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

सवयीने तिन्हीसांजेच्या त्या कातरवेळेला हात जोडले गेले. घाबरलेल्या मनाने ‘शुभं करोती’ पुटपुटलो आणि समोरून माझी बहीण शुभावती हातात जेवणाचा डबा घेऊन येताना दिसली. मागोमाग सगळ्यांच्याच घरचे कुणी ना कुणी घेऊन आले आणि देवावरचा विश्वास आणिकच दृढ झाला.

पिकनिकला आल्यासारखे पण माराच्या अंगदुखीने विव्हळत पोटभर जेवलो आणि शांतपणे झोपीही गेलो. चला आजचा दिवस मस्त गेला. पुढचं पुढे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com