मनोदय फडते
मुक्या प्राण्यांना एकदा लळा लावला की ती माणसाळल्याची आपण अनेक उदाहरणे पाहतो असाच एक प्रकार सध्या सांगे बाजारात घडत आहे. दोन मोकाट वासरांपैकी एक तर अधिकच माणसाळले आहे. प्रत्येक दुकानांत आणि जवळच्या घरांत अन्नासाठी हे वासरू नेहमीच फेरफटका मारते. काहीजण पाव, बिस्कीट, चपाती चारून मुक्या जनावरांची माया करतात.
इथपर्यंत ठीक आहे, पण अगदी लहान वयापासून दररोज वासरांना काही तरी खायला दिले पाहिजे म्हणून पुरुषोत्तम वैष्णव दररोज सकाळी पन्नास रुपये खर्च करून दोन्ही वासरांना खाऊ घालतात.
त्यापैकी एक वासरू संपूर्ण बाजार फिरून झाल्यानंतर बिनधास्तपणे पुरुषोत्तम वैष्णव यांच्या छोट्याशा मोबाईल दुकानासमोरील मॅटवर तासनतास मॅटवर बसून राहते. ग्राहक आले किंवा गेले म्हणून त्या वासराला काहीच फरक पडत नाही.
ग्राहकांनासुद्धा त्याचा लळा लागला आहे. पुरुषोत्तमना यासंबंधी विचारले असता, हा त्या वासराचा नित्यक्रम असून आपल्याला हवा तितका वेळ ते बिनधास्तपणे बसून राहते आणि आपला वेळ झाल्यावर उठून जाते.
पुरुषोत्तम वैष्णव यांनी त्याला आवडीने ‘जय’ म्हणून नाव ठेवले आहे. काही कामानिमित्त एक दोन दिवस ते दुकान बंद करून बाहेर गेल्यास हे वासरू बंद दुकानाच्या शटरवर जोरजोरात डोके आपटत असते.
हे सांगेतील लोक दररोज अनुभवत असतात. पुरुषोत्तम यांना गंमतीने हे वासरू नंतर बैल झाल्यानंतर दुकानाचे ग्लास फोडले तर... यावर ते म्हणाले जरा मोठे झाल्यावर त्याला थोडी तरी अक्कल येणार आणि नाही आल्यास काय करणार? पण त्याला मोकाट सोडणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार विसेक दिवसांचे वासरू असताना गाईला अज्ञात वाहनाने ठोकरून मारल्याने केवळ पोट भरण्यासाठी बाजारात फिरणाऱ्या या वासराला बाजारातील लोकांनी आपलेसे केल्यामुळेच त्यालाही लळा लागला आहे.
भटक्या कुत्र्यांचेसुद्धा फारच लाड केले जात आहेत. एक दोन महिला तर नेहमीच दहा बारा कुत्र्यांना खाऊ घालीत असते. काही का असेना सध्या मुक्या आणि भटक्या जनावरांना चांगले दिवस आले आहेत हेच खरे.
हल्लीच्या काळात भूतदया खूपच वाढलेली आहे. काहीजण भटक्या कुत्र्यांवर जीव लावतात, तर काहीजण मोकाट गायीगुरांवर. या मुक्या प्राण्यांना एकदा लळा लावला की ती इतकी माणसाळतात की दोघांचे प्रेम मग उतू जाते ...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.