Guidebook
Guidebook Dainik Gomantak
ब्लॉग

‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईसाठी- 21 मान्यवरांचे लेख

गोमन्तक डिजिटल टीम

Guidebook वाचनवेड्यांना पुस्तकांविषयी अपार प्रेम व निष्ठा असते. आवडलेली पुस्तके अनेक, उदंड असतात. पण, जीवनावर आमूलाग्र प्रभाव टाकणारी फारच अल्प. आमच्यासारख्या वाचकांना इतर लेखक काय वाचतात, कुठल्या पुस्तकाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले, ते का व कसे, यासंबंधी जाणून घेण्याचे कुतूहल असते.

पुस्तकांविषयीची काही पुस्तके माझ्या वाचनात आली आहेत. त्यात अरुण टिकेकर याचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’, सारंग दर्शने संपादित ‘ग्रंथाच्या सहवासांत’, निरंजन घाटे यांचे ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ आणि सतीश काळसेकर यांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’.

याच धाटणीचे एक नवीन पुस्तक नुकतेच माझ्या हातात आले. साधना प्रकाशनचे विनोद शिरसाठ संपादित ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या शीर्षकाचे पुस्तक.

यात विविध क्षेत्रांतील २१ मान्यवरांचे लेख आहेत. या पुस्तकाच्या प्रास्ताविकांत संपादक विनोद शिरसाठ लिहितात, कल्पना अशी की आपणाला आवडलेली पुस्तके अनेक असतात, प्रभावित करून गेलेली तुलनेने कमी असतात. त्यांतली थोडी पुस्तके अशी असतात जी अधिक सखोल, गहन व गंभीर प्रभाव टाकून गेलेली असतात.

तो प्रभाव आपली भाषा, शैली, विचार यांवर परिणाम करणारा असू शकतो. सामाजिक।राजकीय जाणिवा विकसित करणारा असू शकतो. कला, साहित्य, संस्कृती यांच्या विषयीचे आकलन वाढवणारा असू शकतो. एखादे नवे व अनोखे दालन खुले करून देण्यास कारणीभूत ठरलेला असू शकतो.

जीवनाविषयक दृष्टिकोनाला कलाटणी देणारा असू शकतो किंवा अन्य काही प्रकारचा असू शकतो. प्रस्तुत पुस्तकात २१ मान्यवरांचे लेख आहेत. त्यातील ११ लेख इंग्रजी पुस्तकांविषयीचे, आठ लेख मराठी पुस्तकांवरचे आणि तीन लेख हिंदी पुस्तकांसंबंधीचे आहेत.

वैचारिक पुस्तकांवर जास्त लेख आहेत. या पुस्तकातील मान्यवर लेखकांच्या परिचयावर नजर फिरविल्यास त्यात आपल्याला संपादक, उद्योजक, मनोविकारतज्ज्ञ, वकील, पत्रकार, सनदी अधिकारी, सिने-नाटक समीक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक अशा विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्ती आहेत.

यात मला ज्यांचा विशेष उल्लेख करायला आवडेल ते म्हणजे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि गोव्यातील नामांकित उद्योजक आणि लेखक दत्ता दामोदर नायक. गिरीश कुबेर काही वर्षे गोव्यात वास्तव्यास होते.

गोमंत विद्या निकेतनमध्ये एका व्याख्यानमालेत त्यांचे तेलावरचे व्याख्यान मी ऐकले होते. त्यांची त्या विषयावरची पुस्तकेही वाचली होती. पण हे लिहिण्यास, आणि तेल या विषयाचा सखोल अभ्यास करण्यास जो लेखक प्रेरणादायी ठरले ते म्हणजे डॅनियल एर्गिन व त्यांचे ‘द प्राइझ’ हे पुस्तक.

या लेखात डॅनियल एर्गिन एक व्यक्ती म्हणून किती महान आणि त्यांच्या या पुस्तकासंबंधी वाचायला मिळते. या माणसाचे तेल विषयावरचे सखोल ज्ञान आणि या क्षेत्राचा भविष्याचा वेध, भाकिते वाचून अचंबित व्हायला होते.

या लेखकांच्या मांदियाळीत गोमंतकीय साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांचे आल्बर्ट एलिस यांचे ‘अ गाइड टू रॅशनल लिव्हिंग’ या पुस्तकासंबंधातील भाष्य आहे. लेखक दत्ता नायक या लेखात आपला जीवनपट उलगडून दाखवतात.

कारण युवा अवस्थेपासून जेव्हा जेव्हा त्यांना मानसिक आधाराची गरज भासली तेव्हा या पुस्तकाने त्यांना खूप आधार दिला. ते लिहितात, या आधाराविना मी वाकलो असतो, कोलमडलो असतो, उद्ध्वस्त झालो असतो. एवढे वाईट किंवा बरे वाईट प्रसंग प्रसंग माझ्या जीवनात आले.

आल्बर्ट एलिसच्या विवेकनिष्ठ मानसशास्त्रामुळे या सर्व प्रसंगांतून मी सावरलो. पदोपदी आपल्याला स्थिरावण्यास एका ग्रंथमित्राचा हातभार लागला आणि त्या पुस्तकाला, ग्रंथकाराला विनम्रतेने श्रेय देणारा हा लेखक. गोमंतकीय व तेही माझ्या शहरातील लेखक दत्ता नायक यांचे नाव या मांदियाळीत समाविष्ट झालेले पाहून अभिमान वाटला.

तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे यांनी त्यांच्यावर प्रभाव टाकणारे पुस्तक म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला आहे. ते वाचल्यावर ज्ञानेश्वरीचा असाही प्रभाव पडू शकतो हे वाचून आश्चर्य होते.

एक कविता संग्रहसुद्धा जीवनावर प्रभाव टाकू शकतो हे विदेश सेवेतील माजी निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कविता संग्रहावर भाष्य केले आहे. हे सर्व वाचल्यावर कोकणी भाषा क्षेत्रांतील पुस्तकाचा प्रभाव सोडाच पण पुस्तके वाचण्यासंबंधी अनास्था दिसून येते.

या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये संपादक विनोद शिरसाठ लिहितात, या पुस्तकातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात.

यातून ‘वाचनाचे’ व अधिक चांगल्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता प्रतिभा यांना चालना देणारी पुस्तके, प्रभाव टाकून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात.

ही गुणवैशिष्ट्ये तरुणाईच्या संदर्भात अधिक महत्त्वाची ठरू शकतात. कारण त्यांचे मानस अशाच मार्गदर्शकांच्या किंवा बियाण्यांच्या शोधात असते. सारांश, हे पुस्तक वाचनाची सवय असलेल्या, बऱ्यापैकी राजकीय-सामाजिक भान आलेल्या व ‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईला अंधूक का होईना दिशा दाखवणारे वाटू शकेल. एक आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल ग्रंथ निर्मितीचे व्रत आचरणाऱ्या साधना प्रकाशनाचे अभिनंदन!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT