Gomantak Editorial डिचोली येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात घडलेला भयंकर प्रसंग समग्र शिक्षणव्यवस्थेला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा आहे. अकरावीच्या वर्गातील चार विद्यार्थ्यांनी ‘पेपर स्प्रे’चा वापर करून विद्यार्थिनींना लक्ष्य केले व ११ मुलींचा जीव गुदमरतो या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पाहिले पाहिजे.
धक्कादायक व संवेदनशील घटना असूनदेखील शाळा व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार केली नाही. पोलीस विद्यालयालाच विद्यार्थ्यांवर कारवाईच्या सूचना देतात हे अतर्क्य आहे. बेबंद विद्यार्थ्यांचे क्रौर्य, पीडित मुलींच्या जिवावरही बेतू शकले असते, ही स्थिती नजरेआड करून चालणार नाही.
यापूर्वीही डिचोली तालुक्यातीलच एका शाळेतील मुलीला विद्यार्थ्याने वाटेत अडवून चाकूचा धाक दाखवण्याचा प्रकार घडला. लोकलज्जेस्तव ते प्रकरण पुढे आणले गेले नाही. सहानुभाव (माणुसकी) हरवलेल्या मुलांकडूनच अशा कृती घडतात व अनेक मुली व त्यांचे कुटुंबीय तणावाखाली जातात.
अशा प्रवृत्तींना जरब बसायला हवी. ‘पेपर स्प्रे’ प्रकरणातील चार विद्यार्थ्यांवर कारवाई होणे त्यासाठीच महत्त्वाचे ठरते. तो इतरांसाठी धडा ठरावा. प्रश्नाची व्याप्ती इथे संपत नाही. विद्यार्थिदशेतील बदलत्या आयामांचे अवलोकन करून शिक्षक, शिक्षण संस्था व पालकांना सम्यक भूमिका ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
स्वत:च्या भावना ओळखणे व त्या हाताळता येण्याचे तंत्र विद्यार्थिदशेतील मुलांमध्ये आज अभावानेच जाणवते. समोरच्या व्यक्तीला काय वाटते, याची समज नसते. अशा कौशल्याच्या अभावातून क्रौर्याला पाय फुटतात.
शाळा केवळ मार्क मिळवण्यासाठी बनलेल्या फॅक्टरी नाहीत. नातेसंबंध जपण्याचे आत्मभान देणारी, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करण्याची ती केंद्रे आहेत. तेच घडत नसेल तर गुन्हेगारी वृत्ती पोसण्याची शक्यताच अधिक.
डिचोली येथील प्रकरणातील संशयितांना शाळा व्यवस्थापनाने ओळखले आहे. ते अल्पवयीन आहेत. पोलीस कारवाई झाल्यास त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त होतील, असा मात्र कुणी सूर आळवू नये. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी; तरच ‘चुकीला माफी नाही’ हा संदेश पोहोचेल, जो भविष्यात अशा घटनांना पायबंद ठरेल.
काही दिवसांपूर्वी याच विद्यालयात असाच एक प्रकार घडला होता. त्याचा दोन मुलींना फटका बसला होता. तेव्हा तपासणीवेळी काही जणांच्या सॅकमध्ये ई-सिगारेट सापडल्याची माहितीही समोर आली आहे. वास्तविक, त्याचवेळी व्यवस्थापनाने कठोर पाऊल उचलायला हवे होते.
अल्पवयीन गुन्हेगारांना सुधारण्यास कायद्यात सुयोग्य तरतुदी आहेत. पुनर्वसनासह समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्यात नक्कीच येतो. कालच्या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाची राहिलेली संदिग्ध भूमिका संतापजनक आहे.
असे प्रकार यापूर्वी घडूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच कालचा दुर्दैवी प्रसंग उद्भवला, असे म्हणता येते. शिक्षण खात्याने केवळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून थांबू नये. प्राचार्यांसह व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती याच विद्यालयात शिक्षिका आहेत.
सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पोलीस कसे पाळतात, हे पाहावे लागेल. बदलता सामाजिक पोत, पालकत्वामधील त्रुटी, अपवाद वगळता आत्मीयता हरवलेल्या शिक्षकांचा ‘नोकरी’ म्हणून पाहण्याचा बळावलेला दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या अधोगतीला पूरक ठरतोय. मुलांना घडविण्याची पद्धत चुकतेय.
तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याची जाण नसलेल्या वयात मोबाइल हाती आले. मोकळ्या वेळेत बाहेरच्या व्यक्तींशी त्यांचा संवाद चालतो. पालकही चुकतात, त्यांचे अति लाड नडतात. वाहतूक पोलिसांसमोर विद्यालयांत दुचाकीने ट्रिपल-सीट विद्यार्थी येतात. विद्यालयांतून दप्तरे तपासताच लाइटर, सिगारेट, मटक्याच्या स्लीप मिळतात.
सरसकट नाही, पण अशी बरीच उदाहरणे घडत आहेत; संस्थेची बदनामी टाळण्यासाठी त्याची जाहीर वाच्यता होत नाही. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी सिंहावलोकन करण्याची आवश्यकता आहे. ‘युनेस्को’ने गेल्या वर्षी आपल्या अहवालात, ‘विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल नको’, असे सोदाहरण विषद केले आहे.
अनेक देश त्यावर मंथन करत आहेत. डिचोलीसारख्या प्रकरणांच्या मुळाशी जाणेही गरजेचे आहे. शिक्षणसंस्था स्वत:ची अब्रू झाकण्याचा प्रयत्न करतात; बदनामी होईल म्हणून पीडित मुलांचे पालक घाबरतात. यातून सहज मुक्तता होते ती पुढे होऊ घातलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची. विद्यार्थ्यांच्या अनेक गोष्टींचे अनेक माध्यमांतून सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) केले जात आहे.
जे नियम, ज्या भावना तरुण वयात सामान्य असतात, त्या विद्यार्थ्यांसाठीही सामान्य गृहीत धरल्या जाऊ लागल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. इथे फक्त विद्यार्थीच दोषी आहेत, असे नव्हे तर इतर पूरक घटकही तितकेच दोषी व जबाबदार आहेत.
विद्यालयात शिकण्यासाठी जायचे असते हा विचारच आता प्रतिगामी व कालबाह्य होऊ लागला आहे. ‘करू द्या काय करतात ते, मुलेच आहेत’ असा दृष्टिकोन घातक आहे. उद्याचे चांगले नागरिक घडवणे शिक्षण संस्थांकडून अपेक्षित आहे, गुन्हेगार निर्माण होणे नाही.
छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने समस्या सुटत नाही, उलट ती अधिकच उग्र होत जाते. वेळीच योग्य समुपदेशन, योग्य शिक्षा व त्यातून वेगळे वर्तन असलेल्या विद्यार्थ्यांची सुधारणा होतेय की नाही याची सातत्याने पडताळणी प्रत्येक शिक्षण संस्थेत होणे गरजेचे.
यात पालक व शिक्षकांचा सकारात्मक सहभाग बदल घडवण्यास पुरेसा ठरावा. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना करायची की पुन्हा घटना घडेपर्यंत टाळाटाळ करायची, हे शिक्षण खात्याला त्वरेने ठरवावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.