Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak
ब्लॉग

मर्मवेध : कसोटी

Raju Nayak

Goa Politics: गेले काही दिवस भंडारी समाजातील नेत्यांनी राज्यात अस्वस्थता पेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रमोद सावंत अधिकारावर आल्यापासून या समाजात अस्वस्थता आहे.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असेतोवर त्यांना सतत भंडारी समाजाला ‘इनगूड स्माईल’ ठेवावे लागायचे. कारण एवढेच तीन टक्के असलेल्या सारस्वत समाजातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर बसते, तेव्हा त्या पदाला राजकीय पाठबळ बहुसंख्य समाजाचेही आहे, असे त्यांना भासवावे लागायचे.

परंतु प्रमोद सावंत अधिकारावर आल्यानंतर त्यांना ही राजकीय कसरत करण्याची गरजच राहिली नाही. कारण बहुजन समाजातीलच नेता अधिकारावर आला आहे, तेव्हा इतर कोणाचा टेकू त्याला घेण्याची गरजच काय? त्यामुळे पर्रीकरांनंतर भंडारी समाजाचे राजकीय महत्त्व कमी झाले.

सावंत मंत्रिमंडळात रवि नाईक, सुभाष शिरोडकर असे दोघेच मंत्री आहेत. सध्या गोवा विधानसभेत भंडारी समाजाचे चारच आमदार असून त्यात भाजपचे केवळ दोन आहेत. हीसुद्धा भंडारी समाजाच्या राजकारणाची परवड आहे.

पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी भंडारी समाजातील सर्वांत जास्त नेत्यांना उमेदवारी दिल्या होत्या. त्यांच्या मंत्रिमंडळात भंडारी समाजाचे चार मंत्री होते. परंतु या राजकीय कसरतीतही चलाख पर्रीकर स्वतः अधिक चमकतील हे कटाक्षाने पाहत.

याचे कारण ते अभ्यासू होते, बुद्धिमान होते आणि राजकारण २४ तास हाताळण्याची, श्रम करण्याची त्यांची तयारी होती. त्यांच्या सुदैवाने तेव्हा त्यांना बहुजन समाजाचे चलाख आणि बुद्धिमान नेते भेटले नाहीत.

विष्णू वाघ काही काळ त्यांच्याच सरकारात आमदार होते. परंतु उपसभापतिपदावरच वाघांची बोळवण करण्यात आली. पर्रीकरांचा करिष्माच एवढा होता की वाघांना अधिक चमकोगिरी करता आली नाही.

नाही म्हणायला वाघ अधूनमधून पर्रीकरांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करायचे. परंतु पर्रीकर स्वतःच्या धडाडीने बहुजन समाजातही आपला मानसन्मान टिकवून होते.

भंडारी समाजाचे अस्तित्व गेल्या काही वर्षांत नाजूक पातळीवर पोहोचले आहे, यात तथ्य आहे. या समाजाला गोव्यातील आपले राजकीय स्थान बळकट करता आलेले नाही याची कारणे त्या समाजाने स्वतः शोधायला हवीत. नेतृत्वातही उणिवा आहेत.

मला आठवते, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना भंडारी समाजाची निवडणूक झाली व नवनिर्वाचित सदस्य, संपादक म्हणून मला भेटायला आमच्या कार्यालयात आले होते.

त्यावेळी मी त्यांना पहिलाच प्रश्न केला, तो राजकीय होता. ‘तुमचा सर्वांत मोठा राजकीय नेता कोण?’

ते स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. श्रीपाद नाईक, रवि नाईक, सुभाष शिरोडकर अशा अनेक नेत्यांची नावे एक-एक सदस्य घेत राहिला. मीच त्या चर्चेची कोंडी फोडताना मनोहर पर्रीकरांचे नाव घेतले.

भंडारी समाजाचा गोव्यातील सर्वांत मोठा नेता मनोहर पर्रीकर आहे, असे मी म्हणताच, त्यांची तोंडे बघण्यालायक झाली. परंतु ते सत्य नाकारू शकले नाहीत. कारण भाजपमध्ये अनेक आमदार त्या समाजातील होते.

त्यांच्याकडे महत्त्वाची खातीही होती, परंतु मनोहर पर्रीकर यांच्याहून उंच नेता भंडारी समाजात नव्हता, त्यामुळे भंडारी समाजातील तरुण वर्ग पर्रीकरांचा चाहता बनला होता. या काळात भंडारी समाजाची मते विशेषतः तरुण वर्गाची, मनोहर पर्रीकरांसाठी भाजपला पडत.

मला पक्के आठवते २००५ साली पर्रीकरांशी दगाफटका करीत दिगंबर कामत भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले. मडगावातील ही निवडणूक त्यावेळी अटीतटीची झाली. कामत यांनी विष्णू वाघांसह भंडारी समाजातील सर्व प्रमुख नेत्यांना आपल्या व्यासपीठावर आणले होते.

वाघ तर मडगावामध्ये १५ दिवस ठाण मांडून बसले होते. वाघांची भाषणे जोरदार होत; ते भाजपला, विशेषतः मनोहर पर्रीकरांना फोडून काढीत. परंतु या निवडणुकीत भंडारी समाजाची मते काँग्रेसला मिळू शकली नाहीत.

मडगावातील भंडारी समाज त्यावेळी भाजपबरोबर राहिला. सारस्वत समाजानेही दिगंबर कामत यांना मते घालणे नाकारले. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना सारस्वत आणि बहुजन समाजातील, प्रामुख्याने भंडारी समाजातील बहुसंख्य मते भाजपच्या पारड्यात पडत. ही किमया मनोहर पर्रीकरांच्या करिश्म्याने साधली होती.

मनोहर पर्रीकर व त्यावेळच्या भाजपच्या संघटनात्मक नेत्यांचे कौशल्य हेच की त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा आधारस्तंभ असलेला बहुजन समाज भाजपकडे वळवला. त्यावेळी जरूर त्यांना भाजपच्या व संघाच्या बहुजन समाजातील बड्या नेत्यांची साथ मिळाली.

परंतु हा त्यांच्या सामाजिक अभिसरणाचा अत्यंत जोरदार राजकीय डाव होता आणि मगो पक्ष त्याला बळी पडला. सुभाष वेलिंगकर यांच्या बरोबरीने त्यावेळी पर्रीकरांना साथ मिळाली ती सतीश धोंड यांची.

सतीश धोंड यांनी मला सांगितल्याप्रमाणे मगोप ग्रामीण भागात ढेपाळलाच होता. या पक्षाचे नेते आपल्या ग्रामीण कार्यकर्त्यांना बांधून ठेवू शकले नाहीत. हे नेते स्वतःची चमकोगिरी करीत राहिले, परंतु खेडेगावात जाऊन तेथे मगोपची पताका फडकवत ठेवणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देऊ शकले नाहीत.

या ग्रामीण कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा, ती म्हणजे प्रमुख नेत्यांनी आपल्याकडे येऊन आपले चार तिखट बोल ऐकून घ्यावेत. परंतु तोपर्यंत सहज पडणाऱ्या सिंह निशाणीवरील मतांनी नेत्यांना माज चढला होता.

श्रीपाद नाईक यांची भूमिका येथे आपण विचारात घेतली पाहिजे. नाईक यांनी जरूर पहिली पताका हातात धरली. पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये बहुजन समाजातीलच शुद्ध चारित्र्याच्या व्यक्ती होत्या, ज्यांना समाजात मान होता.

नाईकांबरोबर लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर... ही नावे त्यावेळी प्रामुख्याने घेतली जायची, परंतु हे होते संघशरण कार्यकर्ते. पक्षबांधणी, मतांवर गारुड घालणे त्यांच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. त्यात नाईक यांचे अस्तित्व केवळ पंचायत पातळीवर राहिले.

मनोहर पर्रीकर यांनी जी धडाडी आणि उत्साह दाखवला, त्यामुळे पक्षबांधणी वेगाने झाली. वेगवेगळ्या समाजाचे लोक भाजपकडे आकृष्ट झाले. भट समाज होताच. काँग्रेस पक्षात सारस्वतांवर अन्याय झाला होता.

हा समाज एकमुखी भाजपच्या, म्हणजेच मनोहर पर्रीकरांच्या मागे राहिला. पर्रीकरांनी सर्वाधिक उमेदवाऱ्या भंडारी समाजाला दिल्या. परंतु नेतृत्व आपल्याकडे राहील याची तजवीज केली.

विधानसभेत मंत्री उत्तरे देऊ शकत नाहीत हे लक्षात येताच, बहुसंख्य सदस्यांच्या प्रश्नांना तेच उत्तरे द्यायला उभे राहायचे. भंडारी नेत्यांचे अपयश यावेळी नजरेत भरायचे. पर्रीकरांनाही तेच शाबीत करायचे होते.

श्रीपाद नाईक यांनी पक्षबांधणीत आणि सरकार निर्माण करण्यात नक्की काय योगदान दिले, याची चर्चा करायला खरे म्हणजे हीच योग्य वेळ आहे. मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार श्रीपाद नाईक अनेकदा करायचे.

त्यांना मुख्यमंत्री बनायचे होते. मनोहर पर्रीकरांच्या आधी आपला तो अधिकार आहे, असाही त्यांचा दावा होता. परंतु गोव्यात त्यांना कोणता सुरक्षित मतदारसंघ होता? मडकई त्यांना सुरक्षित नाही. मडकईत भंडारी समाजाची मते सर्वाधिक असतानाही तेथे ब्राह्मण व्यक्ती जिंकून येते, याचे कारण स्वतः भंडारी समाजाने शोधले पाहिजे.

तेथे मगोपची उमेदवारी हे ढवळीकरांचे एक बलस्थान आहेच. परंतु ढवळीकरांनी घराघरांना बांधून ठेवले आहे. या त्यांच्या धडाडीशी आणि इतर राजकीय कौशल्यांशी श्रीपाद नाईक बरोबरी करू शकतील काय? या मतदारसंघात एकेकाळी रवि नाईकांचे प्राबल्य होते.

१९९४च्या निवडणुकीत संघाने आपले कौशल्य पणाला लावून या मतदारसंघात श्रीपाद नाईकांना विजयी केले. शिवाय त्यावेळी भाजपची मगोपबरोबर युती होती, परंतु त्यानंतर मात्र श्रीपाद नाईक या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम निर्माण करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

हा सुरक्षित मतदारसंघ हातचा गेल्यानंतर त्यांना कुठे उमेदवारी द्यायची, हा प्रश्न भाजपपुढे उभा राहिला. ते नंतर २००२मध्ये फोंड्यात रवि नाईक यांच्या विरोधात पराभूत झाले.

मनोहर पर्रीकरांनी श्रीपाद नाईकांची गोची केली, हा आरोप मान्य केला तरी श्रीपाद नाईकांनी स्वतः आपल्यासाठी कोणता मतदारसंघ निवडला? पर्वरी मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावी, असा दावा असे.

परंतु या मतदारसंघात ठाण मांडून बसणे, त्यांना शक्य झाले नाही. ते राहत असलेल्या कुंभारजुवे मतदारसंघावरती त्यांचे प्राबल्य नाही. त्यांच्या पुत्रालाही जिल्हा पंचायतीवरच नव्हे तर पंचायतीवर जिंकून येण्यासही अडचणी होतात, याचा अर्थ काय?

मनोहर पर्रीकरांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना अनेकदा मान्य केले होते, श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देऊन पक्षाचे काम संपत नाही.

तर आम्हांला खस्ता खाऊन त्यांना जिंकून आणावे लागते. कारण श्रीपाद नाईक ही पक्षाची प्रतिष्ठा आहे. नाईकांचा पराभव हा पक्षाच्या नामुष्कीचा भाग बनतो.

श्रीपाद नाईक आमदार असता भाजप सत्तेवर आला असता तर मात्र पर्रीकरांपुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला असता, यात तथ्य आहे. त्यामुळे पर्रीकरांनी राजकीय व्यूहरचनाच अशी केली की श्रीपाद नाईक लोकसभेवर ढकलले गेले.

परंतु श्रीपाद नाईक यांना जिंकून आणणे, त्यांचे राजकीय वजन निर्माण करण्यात पर्रीकरांचे जरूर योगदान आहे. केंद्रात श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद मिळाले, तेही पर्रीकरांच्या लॉबिंगमुळे, असे मानणारा राजकीय निरीक्षकांचा एक वर्ग जरूर आहे.

त्यामागचा तर्क असाच की, गोव्यात सारस्वत मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय समतोल राखण्यासाठी केंद्रातील मंत्रिपद भंडारी समाजातील श्रीपाद नाईकांना मिळावे. परंतु या काळात मांडवी-जुवारीतून बरेच पाणी वाहून गेले आहे.

मनोहर पर्रीकरांची धडाडी, एक हाती त्यांनी गोव्यात भाजपला दिलेली ऊर्जितावस्था, ज्या पक्षाचे अस्तित्वही नव्हते, तो पक्ष स्वबळावर गोव्यात जिंकून आणणे, एवढेच नव्हे तर मनोहर पर्रीकरांनी आपल्या नेतृत्व गुणांची राजकीय छबी राष्ट्रीय पातळीवर चमकवली. त्यामुळे केंद्रात त्यांना आदराने बोलावून घेण्यात आले.

प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर केंद्रात नेतृत्वाची उणीव निर्माण झाली तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने मनोहर पर्रीकरांचे नाव घेतले जायचे. हा गोव्यासाठी एक मोठाच बहुमान होता.

एवढे राजकीय कौशल्य यापूर्वी कोणाही नेत्याला दाखवता आलेले नाही. पर्रीकरांना त्यामुळे संरक्षण मंत्रिपद मिळाले आणि ते गोव्याचे एकमेव निर्विवाद नेते बनले. हे कौशल्य पर्रीकरांनी स्वतःच्या हिकमतीवर निर्माण केल्याचेही कोणी मान्य करेल.

पर्रीकरांशी बरोबरी करू पाहणाऱ्या श्रीपाद नाईक यांचे याबाबतीतील कौशल्य काय? गेली अनेक वर्षे केंद्रात मंत्रिपद मिळवूनही गोव्याच्या किंवा देशाच्या राजकारणावर त्यांनी कितीसा प्रभाव टाकला?

ज्या राष्ट्रीय क्रीडा सामन्यांच्या सहभागाबद्दल श्रीपाद नाईक प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्यांच्या आयोजनात तरी त्यांचे योगदान काय?

मी भाजपच्या एका प्रमुख नेत्याशी बोलत होतो, ते म्हणाले, ‘याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा आढावा घ्यायला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आले होते. ते श्रीपाद नाईकांना कितीतरी कनिष्ठ.

परंतु त्यांच्यापुढे श्रीपाद नाईकांनी हतबल होऊन आपल्या अस्तित्वाचा प्रश्न मांडला. मी गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष असूनही मला या स्पर्धेत कुठेही सहभागी करून घेतले नाही. मला राज्यातही कधी काही विचारले जात नाही, अशी आपली कैफियत नाईकांनी मांडली.‘

ते बोलत असताना गोव्याचे प्रमुख नेते मिश्किलपणे हसत होते. म्हणजेच श्रीपाद नाईक यांनी मांडलेला विषय गोव्यातील नेत्यांनी हसण्यावारी नेला. वास्तविक गेल्या २० वर्षांत पर्रीकर असो किंवा प्रमोद सावंत, श्रीपाद नाईकांनी आपली भूमिका कधी जोरकसपणे मांडण्याचे धैर्य दाखविले आहे काय? त्यांचे नेतृत्वगुण या काळात का चमकले नाहीत? राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या गुणांचा खरा कस केंद्रातून निधी आणण्यात लागणार होता.

या स्पर्धेसाठी ६०० कोटी रुपये खर्च आला आहे. केंद्राकडून निधी आणण्याची जबाबदारी श्रीपाद नाईकांची होती. हे सामने गोव्यात भरवायलाही श्रीपाद नाईकांचे योगदान नाही आणि सामने सुव्यवस्थितपणे भरतील यासाठीही त्यांची कामगिरी शून्य आहे, असे मत एका ज्येष्ठ भाजप नेत्याने व्यक्त केले.

हा नेता पर्रीकरांची आठवण सांगत म्हणाला, ‘श्रीपाद नाईकांना नेहमी आपल्यापुढे भरलेले ताट हवे असते. पर्रीकरांनी गोव्यात पक्ष उभा करायला खस्ता खाल्ल्या, तेवढ्या श्रीपाद नाईक यांनी नाही.

श्रीपाद नाईकांचे एकमेव योगदान म्हणजे, पर्रीकर आपल्या घिसाडघाईने अनेकांचा अपमान करायचे, परंतु श्रीपाद नाईकांनी प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवला. पर्रीकर जरूर पक्षाचे धाडसी नेते होते, परंतु श्रीपाद नाईक यांनी आपल्या मंद दरवळणाऱ्या सुहास्याने कार्यकर्त्यांची मने राखली.

दोघांनी पक्ष उंचीवर नेला, यात तथ्य आहे. परंतु श्रीपाद नाईक हे मते गोळा करू शकत नाहीत. आपल्यासह पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी लागणारी आमदारांची संख्या वाढवू शकत नाहीत, हे तथ्य आहे.‘

सध्या तर भाजप एका मोठ्या आवर्तनातून पुढे जात आहे. जिंकून येणे आणि पक्षाला कायम सत्तेवर ठेवणे, हा पक्षाचा नवा नियम आहे. पक्षाच्या केंद्रीयकरणात स्थानिक नेत्यांचे महत्त्व कमी झाले आहे.

गोव्यात कायम पक्षाला सत्तेवर ठेवणारे नेते हे मग कोणत्याही जातीचे, समाजाचे असो, ते केंद्रीय नेतृत्वाला हवे आहेत. त्यामुळेच प्रमोद सावंत यांचे महत्त्व वाढले. मतदारसंघाशी नाते ठेवून पक्ष संघटनेबरोबर काम करून राज्याचा शकट हाकणे आणि त्याचबरोबर केंद्रीय नेत्यांबरोबर तेवढेच निकटचे संबंध ठेवणे ही राजकीय अपरिहार्यता आहे आणि ती कसरत प्रमोद सावंत यांना जमली आहे.

वास्तविक अर्धी खाकी चड्डी आणि फुल पॅँट यांच्यामध्ये जेवढा फरक आहे, तेवढाच श्रीपाद नाईक आणि प्रमोद सावंत यांच्यामध्ये आहे. परंतु प्रमोद सावंत दिल्लीच्या नव्या निकषांना पुरून उरले, हे तेवढेच सत्य लक्षात घेतले पाहिजे.

श्रीपाद नाईक हे सौजन्यमूर्तीच आहेत, त्याबद्दल वाद नाही, परंतु ते आक्रमक नेते नाहीत. गोव्यात भाजप समर्थक आजच्या सर्व ३३ आमदारांना विचारा, त्यातील एकही जण नेतृत्वासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव घेणार नाही.

मुख्यमंत्रिपदासाठी अशी व्यक्ती चालत नाही. कारण निर्णयक्षमता असलेलीच व्यक्ती त्या पदावर येते. निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला झपाटा लागतो, वाईट परिणामांनाही सामोरे जायची तयारी ठेवावी लागते. नाहीतर अशा व्यक्ती राज्यपालपदासाठी लायक असतात.

त्यामुळे परवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. त्यांनी श्रीपाद नाईकांकडे पाहिलेही नाही, त्यांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे नाव घेतले.

श्रीपाद नाईकांना आपल्याबरोबर रथात बोलविणे ते सोयीस्कर विसरले. या घटनेचा राजकीय संदर्भ श्रीपाद नाईकांसह भंडारी समाजानेही शोधला पाहिजे.

भंडारी समाजाची मते या समाजसंघटनेच्या हातात आहेत काय? समाजाचे प्रमुख राजकीय नेते म्हणून श्रीपाद नाईक यांच्याबरोबरीने रवि नाईकांचे नाव घेतले जाते.

भंडारी समाजाच्या तरुणांना हे नेते अजूनही भुरळ घालू शकतात का? नव्या दमाचे नेते, राजकीय मुत्सद्देगिरी व धमक असलेले नेतृत्व भंडारी समाजातून का पुढे येत नाही? हे नेतृत्व पुढे आणण्याची जबाबदारी कोणाची? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भंडारी समाजही राजकीयदृष्ट्या दिशाहीन झाला आहे काय? या सर्वांची उत्तरे या समाजानेच शोधायची आहेत.

केवळ समाजाच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले आहेत काय? नव्या पिढीचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या आशा-आकांक्षांना भिडण्याचे काम जो नेता करून दाखवेल त्याच्याच मागे या समाजातील तरुण मुले उभी राहणार आहेत.

सध्याच्या स्पर्धात्मक राजकीय वातावरणात नेभळट नेतृत्व कोणालाही आवडत नाही, हे जरी कटू असले तरी ते सत्य स्वीकारावेच लागते! श्रीपाद नाईक वादात याच प्रश्नाला सामोरे जायचे साऱ्यांनीच टाळले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT