

सर्वेश बोरकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, शंभूराजांची रयतेमधील अफाट लोकप्रियता व स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी त्यांनाच दिलेल्या पाठिंब्यामुळे संभाजी महाराज छत्रपती बनले. मुघलांपासून पोर्तुगिजांपर्यंत अनेक शत्रूंना एका वेळी तोंड द्यावे लागलेल्या संभाजी महाराजांना स्वकीयांच्या राजकारणाचादेखील सामना करावा लागला. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलशाची मदत घेतली.
छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्यासाठी लढा सुरू ठेवला. राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसांत हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. १६८३च्या संभाजी राजांच्या मोहिमेदरम्यान, गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को डी टाव्होर काउंट डी आल्वोर यांनी बार्देशमधील संरक्षण सुधारण्याचे आदेश दिले होते.
अशा प्रकारे कोलवाळ आणि थिवीच्या स्थानांमधील मध्य किल्ला तसेच थिवीच्या दक्षिणेस तटबंदी बांधण्यात आली. या सर्व स्थानांना खंदक असलेल्या भिंतीने जोडले गेले होते. धूर्त पोर्तुगिजांचा गोव्यातील मराठा किल्ल्याचा ताबा किल्लेदाराला लाच देऊन घेण्याचा विचार होता.
पोर्तुगिजांनी गोवा शहराच्या (सध्याचे जुने गोवे) सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर काउंट दि अल्वोर याने बऱ्याचशा तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहीत होते, की गोव्यात शिरून पोर्तुगिजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल.
गव्हर्नरला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे आखत होते. गोव्याजवळील (जुने गोवे) फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले गोव्याच्या पोर्तुगिजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.
ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली, की गोव्याजवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे. त्याच बरोबर बराचसा दारूगोळाही जमा करून ठेवला आहे.
या वेळी संभाजी महाराज रायगड किल्ल्यावर होते. गव्हर्नरला ही बातमी माहीत होती. गव्हर्नरला माहीत होते की फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाही आणि किल्ल्यावर जास्त सैन्यही नाही. त्यामुळेच तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला.
संभाजी राजांच्या गनिमी काव्यात गव्हर्नर बरोबर अडकला. त्याने आपल्यासोबत ३,२०० लढाऊ लोक, २५ घोडेस्वार आणि चार तोफा असे पोर्तुगीज सैन्य घेतले आणि १ नोव्हेंबर १६८३ रोजी फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले. गव्हर्नर आपले पोर्तुगीज सैन्य घेऊन किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते.
पोर्तुगिजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडीवरूनच ते मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर तोफ गोळे डागत होते.
त्याचबरोबर पोर्तुगीज सैनिक गोळ्यासुद्धा चालवत होते. दुसऱ्या दिवशीपर्यंत हा मारा सुरू होता, त्या तोफांच्या माऱ्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरूज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खूश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकूम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीज सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता.पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता.
किल्ल्यावरचे सरदार येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.आणि इतक्यात दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले. ललकाऱ्या ऐकू येऊ लागल्या, ‘हर हर महादेव’, ‘शिवाजी महाराज की जय’, ‘संभाजी महाराज की जय’.
फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तटबंदीवर आणि बुरुजावर उभे राहून तिकडे पाहू लागले. क्षणाक्षणाला तो आवाज वाढत होता. राजापुरात मुक्कामाला असलेले छत्रपती संभाजी राजे योग्यवेळी येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावरूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला. किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, ‘संभाजी महाराज की जय!’ संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला.
पोर्तुगिजांना हे उशिरा लक्षात आले. मग मात्र त्यांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे ६०० शिपाई ८०० घोडेस्वार पोर्तुगिजांच्या देखतच फोंड्याच्या किल्ल्यात गेले. त्यांना थोडाही विरोध करायची पोर्तुगिजांची छाती झाली नाही.
आत्तापर्यंत गव्हर्नरने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते; आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पुरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीज सैन्यदेखील याच आदेशाची वाट बघत होते. आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले. तो दिवस होता दिनांक १२ नोव्हेंबर १६८३. महाराजांना बघून किल्ल्यातील मराठ्यांनासुद्धा चेव आला. आता मात्र पोर्तुगिजांची अवस्था बिकट झाली.
संभाजी महाराजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. गव्हर्नरने माघारीचा हुकूम देताच त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्भाटजवळ मराठा घोडेस्वारांनी माघार घेऊन दौडत्या शत्रूस गाठले.
पोर्तुगिजांचे मोर्चे धरलेल्या बंदुका कडकडल्या तशी मावळे आपली घोडी बिचकून फिरवू लागले. ते पाहून येसाजीपुत्र कृष्णाजी चालून गेले. शत्रूचे मोर्चे पार विस्कळीत झाले; घुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द गव्हर्नर नशिबाने सलामत निसटला होता.
कित्येकजण नदीतून पोहत होते, कित्येकजण गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या गव्हर्नरने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली होती. पोर्तुगिजांच्या बंदुका कडकडल्या तशाच अवस्थेत अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागून मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळ्याच गोळ्या झेलून रक्तबंबाळ दिसणारा, कृष्णाजी कंक छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळले.
पिता येसाजी कंकही जायबंदी झाले होते त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांना फोंडा किल्ल्यात कांबळ्यावर आणून ठेवले गेले. पुढे संभाजी महाराजांनी पितापुत्रांना भुतोंडे, भोर येथे राजगडच्या पायथ्याशी त्यांच्या गावी पोहोचवण्याची आज्ञा केली. या युद्धात येसाजी कंक कायमचे जायबंदी झाले होते तर कृष्णाजी कंक यांना वीरमरण आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.