Goa Folk Songs Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Folk Songs : गोव्यातल्या लोकगीतांतील वाघ

सत्तरीतील पिसुर्ल्याजवळ ‘वाघुरे’ आणि फोंड्यातील ‘वाघुर्मे’ ही ग्रामनामे तेथील वाघांचे अस्तित्व अधोरेखित करत असतात

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

गोव्यात वाघाला ‘व्याघ्रेश्वर’, ‘वाघ्रो’ म्हणून पुजण्याची परंपरा आहे. ‘वाघाहन्न’, ‘वाघ्रेगाळ’, ‘वाघबीळ’, ‘वाघाहोवरी’, ‘वोघ्रेपान्न’ अशी स्थळनावे असलेल्या जागांचे पावित्र्य लोकमानसाने पूर्वापार जपलेले आहे. सत्तरीतील पिसुर्ल्याजवळ ‘वाघुरे’ आणि फोंड्यातील ‘वाघुर्मे’ ही ग्रामनामे तेथील वाघांचे अस्तित्व अधोरेखित करत असतात.

वाघुरेत तर वाघाची शिकार करायला पूर्ण मनाई असून, त्याची हत्या केल्यास कुटुंबाचा निर्वंश होतो असा समज रूढ आहे. पट्टेरी वाघ हे गोव्यातल्या जंगलांचे नैसर्गिक वैभव आहे. इथल्या लोकमानसासाठी त्याच्या शौर्य, कार्य व शक्तीमुळे त्याचप्रमाणे त्याच्या रंगरूपामुळे अनादी काळापासून तो आकर्षण ठरलेला आहे.

हडप्पा व मोहेंजोदाडो येथील उत्खननात वाघांचे ठसे आढळले असून त्यावरून सिंधू संस्कृतीतल्या लोकांना वाघाची माहिती असली पाहिजे. अथर्ववेदात वाघाचा ’व्याघ्र’ असा उल्लेख आढळतो. इसवी सनाच्या ४००-५०० काळात गुप्त साम्राज्यातल्या नाण्यांच्या मागील बाजूवरती वाघाचे चित्र कोरले आहे.

मध्य प्रदेशातील बैगा आदिवासी वाघांपासून आपली उत्पत्ती झाल्याचे मानून त्याबाबत सार्थ अभिमान बाळगतात. भारतातील आदिवासी आणि जंगलनिवासी जातीजमातीत वाघाला लोक देव म्हणून पुजतात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या गोव्यात वाघ हा मार्जार कुळातला जंगली प्राणी म्हणून मानलेला असला तरी त्याला ‘व्याघ्रेश्वर’, ‘वाघ्रो’ म्हणून पुजलेला आहे. ‘वाघाहन्न’, ‘वाघ्रेगाळ’, ‘वाघबीळ’, ‘वाघाहोवरी’, ‘वोघ्रेपान्न’ अशी स्थळनावे असलेल्या जागांचे पावित्र्य लोकमानसाने पूर्वापार जपलेले आहे.

सत्तरीतील पिसुर्ल्याजवळ ‘वाघुरे’ आणि फोंड्यातील ‘वाघुर्मे’ ही ग्रामनामे तेथील वाघांचे अस्तित्व अधोरेखित करत असतात. वाघुरेत तर वाघाची शिकार करायला पूर्ण मनाई असून, त्याची हत्या केल्यास कुटुंबाचा निर्वंश होतो असा समज रूढ आहे.

गोव्यातल्या पारंपरिक लोकगीतांच्या गायन परंपरेत वाघाचा प्रामुख्याने उल्लेख येतो. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या सत्तरीतील सुर्ल गावात शरद ऋतूच्या काळात ’गीती’ गायन केले जायचे.

त्यातली दुबळा तान्हा, बळी गाय आणि वाघाभोवती फिरणारे कथागीत श्रवण करताना, त्यातले भावविश्व, गायनाची परंपरा अस्वस्थ करून टाकले. तुळशी वृंदावनाला साक्षी ठेवून या कष्टकरी स्त्रिया आर्तपणे गाऊ लागतात :

बळी बळी खातो तुला

नको वाघा खाऊ मला

घरी हाये दुबळा तान्हा

त्याला येतो पाजूनी पान्हा

या कथागीतात वाघ गाईला आपल्या पाडसाकडे जाऊन, त्याला दूध पाजून येण्याची अनुमती देतो, तर गाय दिलेल्या शब्दाप्रमाणे वाघासमोर बळी जाण्यात धन्यता मानते. कथागीत गायनाची ही लोकपरंपरा, जुन्या काळी सुर्ल गावातल्या लोकमानसाचे जंगल, जैवसंपदा आणि पर्यावरणाशी असलेल्या अनुबंधाचे, जिव्हाळ्याचे विलोभनीय दर्शन घडवते.

आज लोकमनाचे वाघाशी असलेले ऋणानुबंध विस्मृतीच्या उंबरठ्यावरती असून, येथील वाघ, जंगल आणि जैवसंपदा संकटात आहे.

आज हणजुणे धरणच्या जलाशयात बुडालेला गुळ्ळे गाव पर्यावरणीय संस्कृतीला विशेष महत्त्व द्यायचा. आपल्या गावाच्या सभोवतालच्या जंगलात वाघ असणे, त्याचा वावर त्यांच्यासाठी अभिमान आणि आनंदाची बाब होती.

शिगमोत्सवाच्या काळात गुळ्ळे गावात ‘भरणूल’ लोकनाट्याची समृद्ध परंपरा होती. या भरणुलात पट्टेरी वाघाची कथा गायली जाते. वाघ हा लोकांना मामाच्या रूपात भेटायचा आण त्यामुळे गावाजवळ वाघ दृष्टीस पडला म्हणजे लोक कुमेरी शेती करण्यासाठी जायचे. कुमेरी या पारंपरिक शेतीत डोंगर उतारावरची झुडपे जाळून नाचण्यासारख्या पिकांची कष्टकरी पैदास करायचे.

वाग मामा येयलो

शेत शिनोक या

वाग मामा येयलो

आगी घालून या

अशा लोकगीतातून तत्कालीन जंगलनिवासी समाजाचे वाघाविषयीच्या भावस्पंदनांचे दर्शन अनुभवायला मिळते. वाघाशी मामाचे अनुबंध न कळत्या वयापासून लोकमनास त्याकाळी निर्माण करायचे आणि त्यासाठी वाघाची शिकार करण्याचे धाडस सहसा केले जात नसे. गोव्यात पौष महिन्यात स्त्रियांचा धालोत्सव खेळला जातो.

नृत्य, नाट्य, गायनाद्वारे धालो गीतांचे सादरीकरण केले जाते. विविध पारंपरिक खेळ धालोत खेळले जातात. त्यातला मोर आणि वाघ खेळातून इथल्या शेतात राब राबणाऱ्या स्त्रिया आपले भावविश्‍व समूर्त करतात.

वाघ - मोराच्या खेळात, एक स्त्री वाघ तर दुसरी स्त्री मोराची भूमिका वठवते. तर इतर स्त्रिया फेर धरून, त्या खेळनृत्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. वाघ मोराची शिकार करण्यास कसा उत्सुक असतो, त्याचे दर्शन या खेळातून घडते.

वाघ झालेली स्त्री म्हणते, ‘आयज मोर खंय खंय’ त्याबरोबर इतर स्त्रिया एकत्रितपणे म्हणतात, ‘सवर्ण पिकला थंय थंय’. त्यानंतर वाघ म्हणतो,

‘आयज मोराची कळपुटी’. स्त्रिया उत्तर देतात, ‘शिक्या बांदल्या नळखुटी’. यावर वाघ उद्गारतो, ‘आयज मोराक खातलंय’. वाघ मोराच्या या खेळनृत्यात मोरावरती झडप घालून त्याला खाण्यास तत्पर झालेल्या वाघाचा क्रौर्य आणि शौर्य यांचा आविष्कार अभिनयातून लोक कलाकार सुंदररीत्या घडवतात.

मोर आणि वाघाच्या प्रतिकांतून जंगलाच्या परिसरात या दोन्ही प्राण्यांचे त्यांनी प्रत्यक्ष किंवा ऐकीव गोष्टींद्वारे आकलन केलेल्या भावभावनांचे दर्शन घडविताना नाट्याभिनयात सजीवपणा आणण्याचा कुशलपणे प्रयत्न करतात. वाघ-मोराचे खेळनृत्य निसर्ग निरीक्षणातून तत्कालीन स्त्रियांनी निर्माण केले असले पाहिजे.

ग्रीष्म ऋतूत आदिवासी गावडा जमातीत ‘जागर’ या लोकनाट्याची समृद्ध परंपरा पाहायला मिळते. नृत्य, गायन, वादन, नाट्याभिनय आदीतून संपन्न होणारा गावडा जागर आपल्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संचितांचे दर्शन घडवत असतो.

या लोकनाट्यात चक्क रंगरंगोटी आणि साजेल अशी वेशभूषा करून लोककलाकार वाघाच्या रूपात प्रवेश करतो, त्यातून या जमातीत वाघाविषयी असलेल्या श्रद्धा, समज, रीतीरिवाज पाहायला मिळतात.

गोव्यातल्या माळरानावर त्याचप्रमाणे डोंगर दऱ्यांत पशुपालक धनगर जमातीचे एकेकाळी वास्तव्य असायचे. वाघाने शेळी, बकरी आणि गाई म्हशींवरती हल्ला करून, त्यांना इजा करू नये यासाठी वाघ देवाला प्रार्थना करतात.

जंगलात हल्ला करून वाघाने कधी गाय किंवा बकरीचा अडशा पाडलेला असला तरी त्याच्याविषयी अपशब्द चकारपणे काढला जात नसायचा. दिवाळीच्या वेळी बलिप्रतिपदेच्या दिवशी धनगर जमातीत गाई-गुरांची ओवाळणी करण्याची परंपरा आहे. त्यावेळी लोकगीते गायिली जायची,

आबु झाबुचं पालं, गळा गोसावी न्हालं

जटा पडल्या तागा, गायी मारी वाघा

वाघा पिल्याची जाळी, अनखारल्या माळी

वाघासारखा जंगली प्राणी आपल्या परिसरात आहे, म्हणून पूर्वीच्या काळी जंगलनिवासी लोकमानसाने विशेष कुरबुर केली नाही. अन्नसाखळीत शिखरस्थानी असलेला पट्टेरी वाघ जंगलात वावर करू लागला तरच आपले जगणे समृद्ध, संपन्न होईल, याची त्यांना आशा होती.

त्यासाठी जेथे वाघाचा अधिवास असेल ते वनक्षेत्र वाघापान्न म्हणून त्यांनी राखून ठेवले. धारबांदोड्यात शिगावच्या खाणपट्ट्यात लोह खनिज उत्खननाला प्रारंभ होण्यापूर्वी येथील हिरव्या जंगलांची वाघ शान होता आणि त्यासाठी वाघाच्या पाषाणी मूर्तीची स्थापना करून देवराईची निर्मिती केली.

घनदाट जंगल सुरक्षित असल्याने तेथून बारमाही वाहणारी झर, पेयजलाबरोबरच कष्टकरी समाजाची तहान भागवायची. वाघ आपल्या परिसरातील, पर्यावरणातील सुसंवाद राखण्यात महत्त्वाची भूमिका वठवतो.

तृणभक्षी प्राण्याची शिकार करून वाघ शिकार करणारे प्राणी आणि जंगलातील वृक्षवनस्पती यांच्यात संतुलन राखण्यास मदत करतो याचा अनुभव, निरीक्षणाद्वारे लोकमानसाला जाणीव निर्माण झाली असावी. त्यासाठीच गोवा, कोकणात महिषासुरमर्दिनी म्हणून पुजल्या जाणाऱ्या शक्तिरूपिणी, दुर्गादेवीच्या पाषाणी मूर्तींवर तिचे वाहन कोरले जाते आणि वाघाची देव म्हणून पूजा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT