

एखादी व्यक्ती दुसऱ्यांचा जीव घेण्याच्या इच्छेने एवढी का पछाडलेली असते की, त्यासाठी स्वतःलाही मृत्यूच्या दाढेत ढकलण्याला तयार होते, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे कोणती मानसिकता असते, याचे विवेचन.
ज्या दहशतवादी हल्ल्यात, हल्ला करणारी व्यक्ती स्वत:ला ठार करून इतरांना ठार करते, त्याला ‘आत्मघातकी दहशतवादी हल्ला’ मानले जाते. हा दहशतवादाचा भयंकर प्रकार असून, असा हल्ला थांबवणे अवघड असते. स्वत:ला मृत्यू आला तरी चालेल; पण इतरांना ठार मारण्याचे आपले ‘लक्ष्य’ गाठण्यासाठी व्यक्ती का प्रवृत्त होते, हा प्रश्न सर्वांना पडतो. स्वत:चा जीव उधळून लावून, अनेकांना ठार केले जाते. त्याची जबाबदारी खुलेआम स्वीकारली जातेसुद्धा ! संशोधनाच्या दृष्टीने विचार केल्यास यामागे अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्रीय कारणेसुद्धा आहेत.
मुळात हे आत्मघातकी दहशतवादी मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा वेडे नसून ते पूर्णपणे सजग असतात. आपल्या जीवापेक्षा त्यांना आपले लक्ष्य (टार्गेट) महत्त्वाचे आहे, याची त्यांना खात्री पटलेली असते. ही एक प्रक्रिया असते, ती एका दिवसात घडत नाही, त्यामागे अनेक अंतर्गत आणि बाह्य कारणे असतात. अंतर्गत कारणांमध्ये व्यक्तीची विचारसरणी, प्रेरणा, व्यक्तिमत्व, धार्मिक श्रद्धा, आयुष्यातील घटनांचा प्रभाव असतो. दारिद्र्य-आर्थिक परिस्थिती, दहशतवादी संघटना, राजकारण, समाजातील घटना या बाह्य घटकांचाही प्रभाव असतो.
आत्मघातकी दहशतवादी तयार करण्यासाठी दहशतवादी संघटना अगदी पद्धतशीर काम करतात. या दहशतवादयांचे ‘ब्रेनवॉश’ पद्धतशीरपणे केले जाते. एका दिवसात कुणी आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तयार होत नसतो. सुरुवातीला दहशतवादी संघटना तयार होते तेव्हा, त्यात मोजके सदस्य असतात. मग त्या संघटना सदस्यांना हेरतात. संघटना विस्तारतात. जास्तीत जास्त संवेदनशील असणारी व्यक्ती त्यांना हवी असते. त्या व्यक्तीला हळूहळू आपल्या संपर्कात ठेवून आपली विचारसरणी तिच्यावर बिंबवली जाते.
त्या सदस्याचे ‘ब्रेनवॉश’ केले जाते. नेहमी संलग्न राहणारी व्यक्ती प्रभावित होत जाते. पुढील टप्प्यात, ही व्यक्ती बहुतांश वेळा कुटुंबाचा त्याग करते. आपल्या मनातील ‘ध्येया’साठी जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे आहे, असे तिला वाटू लागते. समविचारी, कट्टर मूलतत्त्ववादी लोक तिला जवळचे वाटू लागतात. सतत त्यांच्यात राहणे ही त्यांची मानसिक – भावनिक गरज बनते. काही तरी ठोस कारण देऊन घर सोडून दुसरीकडे ती व्यक्ती वास्तव्य करू लागते. दहशतवादी संघटनेला हेच हवे असते.
त्या व्यक्तीला आदर्श सदस्य ठरवून तिचा गौरव केला जातो. तिचे कौतुक केले जाते. काही गोष्टी साधण्यासाठी ‘तथाकथित हौतात्म्य’पत्करणे किती गरजेचे आहे, हे बुद्धीच्या जोरावर पटवून दिले जाते. त्या व्यक्तीला आता तिच्या ध्येयाप्रती असणारी ‘निष्ठा’ सिद्ध करायची ओढ लागते. दहशतवादी संघटनेविषयी असणारी भावना कृतीने अमलात आणण्याची ही वेळ असते.
दहशतवादी संघटना विशिष्ट जागेची रेकी करतात. दरम्यान, भावी ‘आत्मघातकी दहशतवादी’ आता पूर्णपणे कोशात वावरू लागलेला असतो. बाहेरची व्यवधाने त्याने सोडलेली असतात. दिवसरात्र एकाच उद्दिष्टाने तो झपाटलेला असतो. शेवटी ‘डी – डे’ – ठरतो. ठरलेल्या दिवशी, पूर्वनियोजनाप्रमाणे ही व्यक्ती त्या ठिकाणी येऊन हल्ला चढवते. अगदी थंड डोक्याने हा हल्ला चढवून ती व्यक्ती आत्मघात करते. हे सर्व टप्पे ९/११ अमेरिकेतील आत्मघातकी हल्ल्यातील ‘हॅमबर्ग सेल’ला लागू होऊन सिद्ध झालेले आहेत.
गेल्या काही वर्षांत इस्लामी मूलतत्त्ववादी विचारसरणीमुळे अनेक जण प्रभावित झाले असल्याचे आढळते. धर्माच्या नावाखाली विशेषत; इंटरनेटच्या माध्यमातून द्वेषयुक्त साहित्य, चुकीची माहिती, संदर्भ, व्हिडीओ अपलोड केले जातात. यातून काही जण ‘सेल्फ –रॅडिकलाईज्ड’ (स्वत:च स्वत:ला प्रभावित करून घेणे) होतात. यात उच्चशिक्षित व्यक्तींची अनेक उदाहरणे आहेत. चॅटिंग, गेम खेळणे, रोज नवीन माहिती वाचणे ज्यांना आवडते, त्यांना हेरून, हळूहळू आपल्या जाळ्यात ओढून संघटनेचे सदस्य करून घेतले जाते.
विशेषत; ‘अल कैदा’सारख्या संघटना तर इंटरनेटवर विविध व्हिडिओ अपलोड करून मुलांना आणि तरुणांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. त्यांना प्रतिसाद मिळतो. अलीकडच्या काळात ‘इसिस’च्या उदयामुळे ‘इस्लामिक स्टेट’ स्थापन करणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे, असे वाटून घेऊन ‘इसिस’ला जाऊन मिळणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. पण ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर व्यक्ती स्वत:हून भरती होण्याचे प्रमाण वाढले.‘लिडरलेस जिहाद’ असे याला म्हटले जाते.
व्यक्तिपरत्वे अनेक मानसशास्त्रीय कारणे यामागे आहेत. कधी वैयक्तिक अपयश लपवण्यासाठी तर कधी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी व्यक्ती दहशतवादी बनते. कितीही शिक्षण घेतले तरीही ‘धर्मरक्षण’ हेच अंतिम ध्येय आहे हे बिंबवणे, प्रियजनांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी, नव्या पिढीपुढे तथाकथित ‘धर्मरक्षणा’चा आदर्श ठेवणे आणि आपली धर्मनिष्ठा सिद्ध करणे ही कारणे दहशतवादी हल्ल्यांच्या मागे असल्याचे दिसून आले आहे.
पॅलेस्टाईनचे दहशतवादी तसेच चेचेन दहशतवाद्यांच्या ब्लॅक विडो, बोको हराम, इसिस, अल शबाब अशा कितीतरी संघटनांनी आपली कट्टर विचारसरणी संवेदनशील तरुण-तरुणींवर बिंबवली आहे. स्त्रिया भावनेच्या आहारी जाऊन दहशतवादाकडे वळतात. किशोरवयीन मुलांना सुद्धा यात गोवले जाते. थोडक्यात, विध्वंस आधी मनात घडतो; नंतर समाजात!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.