

Peru Bus Accident: दक्षिण पेरुमध्ये बुधवारी (12 नोव्हेंबर) पहाटे एक मोठी आणि भयानक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक बस दुसऱ्या एका वाहनाला धडकल्यानंतर जवळपास 200 मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कमीतकमी 37 लोकांचा मृत्यू झाला असून, 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अरेक्विपा भागाचे आरोग्य व्यवस्थापक वाल्टर ओपोरतो यांनी स्थानिक रेडिओ आरपीपीला सांगितले की, बस एका पिकअप ट्रकला धडकली आणि त्यानंतर रस्त्यावरुन घसरुन खोल दरीत कोसळली.
हा अपघात पेरुच्या अलीकडच्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या आणि गंभीर दुर्घटनांपैकी एक आहे. 'लाममोसास' (Lamosas) कंपनीची ही बस कॅरावेली प्रांतातील चाला (Chala) शहरातून अरेक्विपा शहराकडे जात होती. चाला हे दक्षिण पेरुमधील एक खाणकाम क्षेत्र (Mining Area) आहे. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी प्रवास करत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, एका वळणावर पिकअप ट्रक्सोबत समोरासमोर टक्कर झाल्यानंतर बस सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळली. अरेक्विपाचे प्रादेशिक आरोग्य व्यवस्थापक वाल्थर ओपोर्टो यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, "आमच्याकडे 37 लोकांच्या मृत्यूचा आणि 24 जखमी झाल्याचा आकडा आहे." जखमींवर सध्या स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
अपघातानंतरची (Accident) दृश्ये खूप भयानक होती. बसचे अक्षरशः तुकडे उडाले होते. मदत आणि बचाव पथके जखमींना स्ट्रेचरवर टाकून दरीतून बाहेर काढताना दिसले. बस खोल दरीत पडल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे आले.
पेरुमध्ये रस्ते अपघात वारंवार होतात. यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. देशात भरधाव वेग, रस्त्यांची खराब स्थिती आणि अधिकाऱ्यांकडून नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित न करणे, यामुळे अनेकदा अपघात होतात.
याचवर्षी ऑगस्ट महिन्यात एका महामार्गावर बस उलटली होती, ज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये राजधानी लिमाहून पेरुच्या ॲमेझॉन क्षेत्राकडे जाणारी एक बस उलटली होती, ज्यात कमीतकमी 18 लोक ठार झाले होते, तर 48 जण जखमी झाले होते. बुधवारी झालेल्या अपघातामागील नेमके कारण काय होते, याचा तपास स्थानिक पोलीस (Police) करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.