Goa Elections: भाजपकडे केपे मतदारसंघ येण्याची आशा Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Elections: भाजपकडे केपे मतदारसंघ येण्याची आशा

दैनिक गोमन्तक

केपे: केपे मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेस उमेदवार निवडून आला असला, तरी हा मतदारसंघ पूर्वी मगो पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. भाजपने राज्यात आपले बस्तान चांगल्या प्रकारे बसवल्याने मगो पक्षाचे अस्तित्व या मतदारसंघातून पुरते गायब झाल्याचे दिसून येते. सध्या या मतदारसंघातून भाजप व काँग्रेस हे प्रमुख पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असले, तरी ‘आप’ सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे यावेळी केपेत लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

केपे मतदारसंघातून उपमुख्यमंत्री असलेले भाजपचे बाबू कवळेकर हे सहज जिंकून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी पालिका क्षेत्र भाजपच्या बाजूने मतदान करेल का? या एका प्रश्नावरच केपेत कोण जिंकून येणार हे ठरणार आहे. बाबू कवळेकर काँग्रेसमध्ये असताना पालिका क्षेत्रातील मतदार त्यांच्यामागे ठामपणे उभे राहत होते. आता भाजपमध्ये गेल्यावरही कवळेकर ही किमया साधू शकणार का? या एकाच प्रश्नावर केपेचे भवितव्य आधारून असून, त्यामुळेच ही लढत एकतर्फी न होता रंगतदारच होणार असे संकेत मिळत आहेत. डिकॉस्‍ता यांनी सूत्रे सांभाळल्‍यामुळे सध्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बराच जोश आला आहे. तरीही काँग्रेसची काही मते ‘आप’ कडे वळली, तर त्याचा जबरदस्त फटका काँग्रेसला बसून भाजपला त्‍याचा फायदा होणार आहे.

बाबूंचा भर विकासकामांवर

बाबू कवळेकर हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने ख्रिस्ती मतदारांमध्ये विलक्षण अशी चीड होती. ही खरी गोष्ट असली तरी कवळेकर यांनी आता विकासकामांद्वारे त्यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते राज्याचे उपमुख्‍यमंत्री असून, त्यांच्याकडे महत्त्वाचे कृषी खाते असल्याने त्यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. शेतकऱ्यांना खत वाटप करण्याचे काम जोरात सुरू केले आहे. मात्र, याचा त्यांना कितपत फायदा होईल? त्यातच आता भूमिपुत्र विधेयकामुळे जनता भाजपवर नाराज असल्याने हा विषय कवळेकर आणि भाजप कसा हाताळणार हेही पाहावे लागेल.

मतदार कुणाबरोबर जाणार?

या मतदारसंघात एकूण 31, 500 मतदार असून, यात हिंदू 20, 500 ख्रिश्चन 9,500 मुस्लीम 1,500 मतदार आहेत. मागील चार निवडणुकांचा निकाल पाहता काँग्रेस पक्षाने जरी विजय संपादन केला असला तरी भाजपने कडवी झुंज दिली होती. कवळेकर हे काँग्रेस सोडून गेल्याने काही प्रमाणात काँग्रेस मतदार नाराज झाले आहेत, त्याचा फायदा एल्टन डिकॉस्ता घेऊ पाहत आहेत. कवळेकर यांना सध्या माजी आमदार प्रकाश वेळीप यांची साथ लाभली असल्याने वेळीप यांची वैयक्तिक अशी सुमारे 3, 500 मते असून, त्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे आठ पंचायतींतील व पालिकेतील शेकडो जुने काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये गेले असल्याने कवळेकर यांचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे. काँग्रेस पक्षातर्फे डिकॉस्ता यांनी पालिका व जिल्हा पंचायत निवडणुकीत जे आव्हान उभे केले होते.

अर्जुन वेळीपही दावेदार

अर्जुन वेळीप यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन केपेतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. काँग्रेसचा जुना कार्यकर्ता असे म्हणत त्यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार शकतात. त्यामुळे केपेत काँग्रेसला नेहमीप्रमाणे बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. यावर काँग्रेस काय तोडगा काढेल त्यावर भवितव्य ठरणार

डिकॉस्‍ता यांच्‍याकडे लक्ष

भाजपने प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या दौऱ्याने येथे प्रचाराचा नारळ कधीचाच फोडला आहे. कवळेकरांनी काँग्रेस सोडल्यानंतर काही प्रमाणात काँग्रेसमध्ये मरगळ आली होती. पण, केपेतील काँग्रेसची धुरा सध्या एल्टन डिकॉस्ता यांनी खांद्यावर घेतली असून, त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षाचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. ‘आप’ चे कार्यकर्तेही घरोघरी जाऊन रेशन वाटप करून पक्षाचा प्रचार करीत आहेत. माजी नगराध्यक्ष राऊल परेरा हे ‘आप’मध्ये सामील झाले असून, त्यांच्याकडे केपेचे उमेदवार म्हणून पाहिले जाते.

काँग्रेसमध्ये एकसंधता नाही

काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून एल्टन डिकॉस्ता यांच्याकडे पाहिले जात असले, तरी कवळेकर यांचे पूर्वीचे स्वीय सचिव अर्जुन सोनू वेळीप यांनीही काँग्रेस उमेदवारीवर दावा केला आहे. पक्षाचे बरेच कार्यकर्ते डिकॉस्ता यांच्याबरोबर आहेत. राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केपे गट काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, त्यावेळी डिकॉस्ता यांनीच जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपणच उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आल्याचे काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडु राव यांना दाखवून दिले आहे. डिकॉस्ता हे मतदारसंघात बरेच सक्रिय असून, त्यांनी या मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या युवा मतदारांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात, हे आगामी काळात स्‍पष्‍ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT