ISIS Crime Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: गाफील राहू नका!

‘सुशेगाद गोवा’ हे बिरुद तपास यंत्रणांनाही लागू व्‍हावे का? सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने जागतिक पातळीवरील बदलते आयाम विचारात घेऊनच भविष्‍यात वाटचाल करावी लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial: इसिस या दहशतवादी संघटनेने पश्‍चिम घाटातील गोव्यासह कर्नाटकातील काही भागांत तळ उभारण्याची तसेच रासायनिक बॉम्‍बस्फोट घडवून आणण्याची तयारी सुरू केल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली.

परंतु तशी माहिती ‘एनआयए’ने दिलेली नसल्‍याने गोवा पोलिसांना चौकशीची गरजही वाटली नाही, हे नवल आहे. ‘सुशेगाद गोवा’ हे बिरुद तपास यंत्रणांनाही लागू व्‍हावे का? सुदैवाने गोव्‍यात आतापर्यंत मोठा घातपात झाला नाही.

तथापि, सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने जागतिक पातळीवरील बदलते आयाम विचारात घेऊनच भविष्‍यात वाटचाल करावी लागेल. यापूर्वी यासिन भटकळ, रिचर्ड हॅडली गोव्‍यात निर्धास्‍तपणे वास्‍तव्‍य करून गेल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे.

यासिन भटकळ याने तपास यंत्रणेला दिलेल्‍या जबानीतून एक मुद्दा ठळकपणे अधोरेखित झाला होता. स्‍थानिकांचे सहकार्य मिळू शकले नाही, असा त्‍याचा दावा होता. गोव्‍यातील एकोपा व स्‍थानिकांचा शांतताप्रिय स्‍थायिभाव विचारात घेऊन त्‍याच्‍या दाव्‍यात तथ्‍यही असेल असे क्षणभर मानले तरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

नोकरी, धंद्यानिमित्त परराज्‍यातून गोव्‍यात वास्‍तव्‍य करणाऱ्यांची संख्‍या मोठी आहे. उसगाव-फोंडा येथे काही दिवसांपूर्वीच एका तरुणाला दहशतवाद्यांशी संबंध असल्‍याच्‍या संशयावरून चौकशी करण्‍यात आली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील. अशा परप्रांतातून आलेल्‍या नागरिकांकडे सपशेल दुर्लक्ष करून चालणारे नाही.

दहशतवाद आणि त्याची कार्यप्रणाली यात इतक्या वर्षांच्या कालावधीत बराच फरक पडला आहे. दहशतवाद्यांनी आता नवनवीन क्षेत्रांत पदार्पण केले आहे. दहशतवाद्यांची पारंपरिक हत्यारे जुनी झाली आहेत. इंटरनेटपासून जैविक दहशतवाद ते कृषी दहशतवादापर्यंत नवशस्त्रास्त्रांचे लोण जगभर पाय पसरू लागले आहे.

त्यामुळे नुकसान हे केवळ धमाक्यातून जनजीवन विस्कळीत होण्यापुरते मर्यादित उरले नाही. आर्थिक, सामाजिक, आरोग्य या अशा कुठल्याही क्षेत्रात दहशतवादी कृत्ये भविष्यात घडणार आहेत. जैविक, जनुकीय हत्यारांमार्फत मोठ्या प्रमाणावर केवळ विशिष्ट समाजाच्या लोकांनाच संपवणे दहशतवाद्यांच्या दृष्टिपथात आले आहे.

जिनेटिकली मॉडिफाइड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट हेसुद्धा एक प्रभावी शस्त्र म्हणून वापरण्यात येऊ लागले आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी बेकार, अशिक्षित युवकांपासून ते उच्चशिक्षित युवकांपर्यंत सर्व स्तरावरील युवकांची भरती करणेही दहशतवाद्यांना क्रमप्राप्त आहे.

हे स्लीपर सेल तयार करण्यासाठी कायम कुणाचे सहसा लक्ष जाणार नाही, अशा धार्मिक सलोखा टिकवून ठेवलेल्या जागा निवडल्या जातात. इथे प्रत्यक्ष दहशतवादी कृत्ये घडवून आणली जात नाहीत. त्यामुळे तसा संशयही कुणाला येत नाही.

अशा ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उघडली जातात. जवळपासच्या किंवा इतर ठिकाणाहून प्रशिक्षणार्थी येथे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतात. त्यांना प्रत्यक्ष कृती करण्यासाठी जगभरात कुठेही पाठवले जाते.

दहशतवादाचे हे बदलते पैलू लक्षात घेऊन, स्थानिक प्रशासन यंत्रणा, पोलिस दल यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त आहे. पण, दुर्दैवाने गोव्यात येणारे बहुतांश पोलिस अधिकारी शांत, कटकट नसलेला प्रदेश निवडतात तो ‘जिवाचा गोवा’ करण्यासाठी. एखादी घटना, गुन्हा घडल्यानंतरच आपले कार्य सुरू होते, हा परंपरागत पोलिसी भ्रम येथे पोसला आहे.

गुन्हा घडू नये यासाठी आपण सतर्क असले पाहिजे, याचे भान दुर्दैवाने पोलिस यंत्रणेला व राज्य सरकारला नाही. प्रत्यक्षात गोवा पोलिसांनी पकडलेले ड्रग्ज व केंद्रीय यंत्रणेने पकडलेले ड्रग्ज यांची तुलना करून पाहिल्यास हा फरक स्पष्ट होईल.

केंद्रीय यंत्रणाही गोवा पोलिसांना आयत्या वेळी सूचना देते किंवा अंधारात ठेवते तेव्हा कारवाईस यश आलेले दिसते. हीच बाब मानवी तस्करीबाबतही घडते. अमली पदार्थ, मानवी तस्करी, जुगार हे गुन्हे आणि दहशतवादी कृत्ये, स्लीपर सेलना आश्रयस्थान लाभणे या गोष्टी भिन्न आहेत. त्यांच्या कार्यकक्षा आणि व्याप्तीही वेगळी आहे.

गुन्हा घडून गेल्यावर कलमे लावून अटक करणे, अपराध्यास शिक्षा होईल अशी तजवीज करणे एवढे हे सोपे नाही. गोव्यात स्लीपर सेल शोधले जातात, दहशतवाद्यांना अटक केली जाते आणि त्याची खबर गोवा पोलिसांना लागत नाही, यातच सरकार व पोलीस यंत्रणा किती सुस्त झोपली आहे, हे लक्षात येते. त्यातही ‘एनआयए’ने आम्हाला कल्पना दिली नाही, असे सांगणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

राज्याच्या सुरक्षेकडे लक्ष पुरवणे ही राज्याची जबाबदारी आहे. इथे कोण येते, कुठे येते, का येते, याची कसलीही कल्पना पोलिसांना नसते. ‘भाडेकरूंची नोंद तपासणे’ नावाच्या फार्सिकल नाटकाचे प्रयोग असे काही वृत्तपत्रांत छापून आल्यावर केले जातात. त्यानंतर पोलीस यंत्रणा पुन्हा झोपी जाते.

तब्बल अठरा ठिकाणी रासायनिक स्फोट घडवून आणण्याची तयारी आपल्याच नाकाखाली सुरू आहे, याचा सुगावा पोलिसांना लागत नाही, याहून दुसरे दुर्दैव ते काय? दहशतवादी हे फार लांबचे प्रकरण झाले, इथे भुरट्या चोरांनाही पोलिसांची भीती उरली नाही. पोलिसच चोरांशी हातमिळवणी करतात, तिथे गोमंतकीयांची दहशतवादी कारवायांपासून सुरक्षा होईल अपेक्षा बाळगणे खरे तर व्यर्थच आहे.

गुन्हा घडून गेल्यावर त्याचा तपास करणे हे जसे पोलिसांचे कर्तव्य आहे, तसेच गुन्हा घडूच नये यासाठी कायम सतर्क, सावध असणे हेसुद्धा कर्तव्यच आहे.

गोव्यात धार्मिक सलोखा बिघडणे याला जेवढे प्रत्यक्ष कृती करणारे जबाबदार आहेत, तेवढेच त्याचा एवढासाही सुगावा न लागणे यासाठी पोलीस यंत्रणा व सरकार जबाबदार आहे. गोव्यात कोणतेच दहशतवादी कृत्य घडणार नाही, त्यामुळे ‘भिवपाची गरज ना!’ या भ्रमात सरकार व पोलीस यंत्रणेने न राहणे उचित ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT