

सासष्टी: गेले काही दिवस वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे दक्षिण गोव्यातील खासकरून सासष्टीतील किनारपट्टी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मासेमारी बंद आहे व पर्यटनावरही विपरित परिणाम झाला आहे. किनाऱ्यांवर शॅक्स उभारणी झाली आहे; पण गिऱ्हाईक नसल्याने शॅकमालक चिंतातुर आहेत. शेतकऱ्यांनाही अतोनात नुकसान सोसावे लागत आहे.
मडगाव मार्केटमध्ये मासळी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही लोकांनी आपला मोर्चा सुक्या मासळीकडे वळविला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोलवा, बाणावली येथे मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या होड्या, बोटी किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत.
मासेमारीसाठी समुद्रात जाण्याचा धोका मच्छीमार पत्करत नसल्याचे दिसत आहे. किनारपट्टी भागातील पर्यटन ठप्प झाले आहे. त्यामुळे कित्येकांना गिऱ्हाईक मिळत नाही. मडगाव मासळी मार्केटमध्येही कमी प्रमाणात मासळी उपलब्ध असल्याने किमती गगनाला भिडल्या आहेत. जी मासळी विक्रीस आहे ती ताजी नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे मासळी मार्केटमध्ये सर्वसाधारण लोक मासळी विकत घेताना दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, आम्ही हवामानात बदल केव्हा होईल याची वाट पाहत असल्याचे बोटमालक सिप्रियान कार्दोज यांनी सांगितले.
मच्छीमार जुझे कामिल सिल्वा यांनी सांगितले की, वारा जोरात वाहत असल्याने आम्ही बोटी घेऊन समुद्रात जाण्याचे टाळत आहोत. १ नोव्हेंबरपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मासळीसाठी मागणी आहे; पण मिळत नाही. समुद्रकिनाऱ्यावरही मासळीसाठी लोक येत आहेत. आपल्याकडे जवळ-जवळ २५० मजूर असून सध्या त्यांना काम नाही. त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था पाहावी लागते, त्यामुळे नुकसान सोसावे लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.