Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant
Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Congress Rebel : बंड करुन ‘त्या’ आठ आमदारांनी काय साध्य केलं?

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Rebel : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांसह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये शिरल्यास आता जवळ जवळ दोन महिने होत आलेत. पण, अजूनही या आठही जणांच्या हाती विशेष काही लागलेले नाही. या आठ जणांपैकी एकालाही मंत्रिपद वा एखादे महामंडळाचे अध्यक्षपद अजून तरी लाभलेले नाही.

या आठ जणांत आलेक्स सिक्वेरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आहेत. आलेक्स हे दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळात 2007 ते 2012 पर्यंत वीजमंत्री होते. 2012 साली त्यांचा पराभव झाला व ते राजकीय अज्ञातवासात फेकले गेले. 2017 साली ते रिंगणात उतरले नाहीत. 2022 साली काँग्रेसने त्यांना परत उमेदवारी देऊन त्यांची पुनर्स्थापना केली. 2017 साली निवडून आलेल्या बाबाशान यांनी काँग्रेसमधून फुटून जात भाजपमध्ये शिरकाव केल्यामुळे आलेक्सचे ‘कम बॅक’ होऊ शकले. पण तेही आता बाबाशानाच्याच वाटेने गेले आहेत. आपण काँग्रेसचे निष्ठावंत पाईक म्हणून मिरवणारे आलेक्स शेवटी भाजपच्या गळाला लागलेच. त्यांनी मंत्रिपद मिळणार अशी हवा होती. पण, अजूनही ही हवा प्रत्यक्षात उतरलेली नाही.

दिगंबर कामत हे तर बोलूनचालून माजी मुख्यमंत्री. 2007 साली रवी नाईक, प्रतापसिंग राणेंच्या ‘तू तू मै मै’ मुळे काँग्रेसमध्ये त्यावेळी नवखे असल्याने दिगंबरांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली होती. तडजोडीचे उमेदवार म्हणून त्यांना हे पद लाभले होते आणि तडजोडीचे राजकारण करून दिगंबरांनी पाच वर्षे पूर्णही केली होती. पण, 2012 साली राज्यात काँग्रेसचा जो अभूतपूर्व पराभव झाला त्याला दिगंबरांचे हे तडजोडीचे राजकारण व कारणीभूत असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. पूर्वाश्रमी भाजपवासी असलेल्या दिगंबरांनी आता ‘घरवापसी’ केल्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

मायकल लोबो तर भाजपचेच होते. आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळत नाही हे पाहून त्यांनी काँग्रेसमध्ये उडी घेतली. मंत्रिपद त्यागत त्यांनी ‘कुर्बानी’ दिल्याचा आव आणला होता. काँग्रेसची त्यावेळी हवा होती. काँग्रेस सत्तेवर येऊन आपण राज्याचे उपमुख्यमंत्री बनणार, असाही त्यांचा होरा होता. पण, काँग्रेसचे केवळ 11 आमदार निवडून आल्यामुळे लोबोंचा अवकाशात उडणारा महत्त्वाकांक्षी फुगा जमिनीवर आपटला. त्यात परत मंत्री विश्‍वजीत राणेंनी त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावल्यामुळे त्यांची ‘इकडे आड तिकडे विहीर’, अशी अवस्था झाली. राणे यांच्या दणक्यामुळे लोबोंजवळ भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. ‘पतीमागे पत्नी’ त्याप्रमाणे त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी व शिवोलीच्या आमदार दिलायला याही भाजपवासी झाल्या. लोबो आपले सोयीचे राजकारण खेळले.

संकल्प, केदार, राजेश, रुडाल्फ हे पहिल्यांदाच निवडून गेलेले आमदार. संकल्प वगळता इतर तिघांचा काँग्रेसशी तसा विशेष संबंध नव्हताच. ते फक्त उमेदवारी मिळावी म्हणून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आले होते. संकल्प आमोणकर मात्र काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक, म्हणून गणले जात होते. त्यांनी तत्कालीन मंत्री तथा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना निवडणुकीच्या तोंडावर अक्षरशः मेटाकुटीला आणले होते. म्हणूनच तर दोनदा पराभूत होऊनसुद्धा तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखविला होता. पण, सध्याच्या राजकारणात ‘विश्वास’ला जागाच नाही हे संकल्पनेही दाखवून दिले. पण सध्या जरी हे फुटीर आमदार चाचपडत असल्याचे दिसत असले, तरी यांनी अप्रत्यक्षरीत्या बराच मोठा तीर मारला आहे यात शंकाच नाही.

गोव्यात काँग्रेस संपविण्याचे जे कार्य मागच्या वेळी काँग्रेसच्या 16 आमदारांनी सुरू केले होते. ते या आमदारांनी पूर्णत्वास नेण्याजवळ आणले आहे. आणि अर्थात महत्त्वाचे म्हणजे केवळ माणसांनीच नव्हे तर देवाचीसुद्धा कशी फसवणूक करता येते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. गोव्यातील आमदार देवतांनासुद्धा जुमानीत नाहीत हा संकेत या आमदारांनी पुन्हा दुनियेला दिला आहे. आतापर्यंतच्या पक्षांतरात देव कोणच नव्हता. पण हे आठ जण देवापेक्षासुद्धा मोठे बनल्याचे दिसायला लागले आहेत. यामुळेच या फुटीर आठ आमदारांनी पक्षांतर करून काय साध्य केले, याचा जमाखर्च मांडणाऱ्यांनी देवापेक्षा मोठे बनण्याचा एक आगळा विक्रम करणाऱ्या आमदारांच्या या करामतींकडे दुर्लक्ष करता कामा नये हेच खरे!

-मिलिंद म्हाडगूत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

SCROLL FOR NEXT