Hotel Highway Gomantak At Bandra Mumbai Dainik Gomantak
ब्लॉग

खाद्यभ्रमंती : मुंबईतील गोवेकरांचे ‘हायवे गोमंतक’

विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, लेखक या सगळ्यांचे ‘हायवे गोमंतक’ हे आवडते रेस्टॉरंट आहे.

Manaswini Prabhune-Nayak

Food Blog : Hotel Highway Gomantak: गोवेकर मंडळींना पुण्यापेक्षा मुंबई जास्त जवळची वाटते. याचे कारण अगदी सोप्पे आहे. कारण तिथे गोव्यासारखी ताजी ताजी मासळी मिळते. गोव्याहून मुंबईला जाणे झाले की खाण्यापिण्याचे काही थांबे ठरलेले असतात.

यात मग ताडदेवची ’सरदार पावभाजी’, चौपाटीवर ’भेळपुरी’, फोर्टमधील इराणी रेस्टारंटमधील ’ब्रून मस्का पाव’ आणि यात सर्वांत महत्त्वाचे वांद्—यामधील ’हायवे गोमंतक’. गोव्यातून निघतानाच ’हायवे गोमंतक’मध्ये जायचे हे मनात पक्के केलेले असते.

हे रेस्टॉरंट एअरपोर्ट रोडवर असल्यामुळे आणखीनच सोयीचे. पूर्वीच्या काळी प्रवासाला जाताना वेशीवरच्या वेताळाचे दर्शन घेऊन, त्याच्या पाया पडून मग पुढच्या प्रवासाला लागले जायचे. ’हायवे गोमंतक’ आमच्यासाठी अशीच भूमिका पार पडते.

मुंबईत शिरताना किंवा मुंबईमधून बाहेर पडताना एकदा तरी इथे जाऊन यायलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की गोव्यात रोज ताजी मासळी खायला मिळत असताना मुंबईत येऊन परत मासळीच काय खाता? हे म्हणणे मात्र खरे आहे, पण ’हायवे गोमंतक’मध्ये काही मासळीचे प्रकार असे मिळतात की ते गोव्यातदेखील मिळत नाहीत. ते फक्त इथेच खायचे.

‘हायवे गोमंतक’चे मडगाव कनेक्शन

आम्ही माडगावकर, त्यामुळे ‘हायवे गोमंतक’चे ‘मडगाव कनेक्शन’ आम्हांला अधिक भावते. हायवे गोमंतकचे संस्थापक मालक रमेश पोतनीस हे मूळचे गोमंतकीय आणि रमेश यांच्या पत्नी, ज्यांच्यामुळे हे रेस्टॉरंट आकाराला आले त्या शशिकला पोतनीस या मूळच्या मडगावच्या.

मडगावची कोणीही व्यक्ती जेवायला गेली तर रमेश पोतनीस यांना आनंद होतो. ते त्यांच्याशी कोकणीत पोटभर गप्पा मारतात. शशिकला यांना आपल्या आईकडून चविष्ट पदार्थ बनवण्याचा वारसा मिळाला.

त्यांच्या आई मोहिनी या मडगावात एका गाड्यावर खाद्यपदार्थ विकायच्या. शशिकला आईच्या हाताखाली स्वयंपाक बनवायला शिकल्या. पण आपण कधी रेस्टॉरंटसाठी स्वयंपाक करू असे त्यांना वाटले नव्हते.

रमेश पोतनीस हे ’ग्लॅक्सो’ नावाच्या कंपनीत कामाला होते. कंपनी बंद पडल्यावर त्यांनी छोटी मोठी कामे केली. पण, कदाचित नियतीने त्यांचा मार्ग ठरवलेला होता. त्यांनी पत्नी शशिकला यांच्या मदतीने १९९१साली ’हायवे गोमंतक’ सुरू केले.

लोकांना चविष्ट असे घरगुती जेवण मिळावे हाच त्यामागचा उद्देश होता. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना कधी एकही जाहिरात करावी लागली नाही. लोकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

गोव्यात सर्व प्रकारची ताजी मासळी मिळते. रोज पाहिजे ती मासळी आपल्या ताटात असते. पण मुंबईत जसे बोंबील मिळतात, तसे गोव्यात कुठेच मिळत नाहीत आणि ‘हायवे गोमंतक’मध्ये ज्या पद्धतीने बोंबील बनवतात त्या पद्धतीचे बोंबील मी कुठेच खाल्ले नाहीत.

बोंबीलमध्ये बऱ्यापैकी पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे बोंबील तळताना ते फुटण्याची अधिक शक्यता असते किंवा नीट तळले गेले नाहीतर बोंबील लिबलिबीत राहतात. पण ‘हायवे गोमंतक’मधले बोंबील कधीही खा, मस्त कुरकुरीत तळलेले असतात.

बोंबीलला मसाला लावून अतिशय हलक्या हाताने छान कुरकुरीत तळून देतात. शिवाय त्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी - कांदादेखील दिला जातो. खोबऱ्याच्या चटणीसोबत कुरकुरीत बोंबील फार चविष्ट लागतो.

एरवी मी फार चवीने मासळी खाणाऱ्यातली नाही, पण ‘हायवे गोमंतक’मधले बोंबील फार आवडीने खाते. इथे बोंबील फ्रायला भरपूर मागणी असते. मासळीमध्ये बोंबील फ्राय ही त्यांची ’सिग्नेचर’ डिश म्हणावी तशी आहे.

शकुंतला पोतनीस या मूळच्या मडगावच्या. त्यांच्या स्वयंपाकाला अस्सल गोमंतकीय चव आहे हे इथे जेवताना जाणवते. उड्डमेथी, बांगड्याचे दबदबीत, तिसऱ्यांचे सुके, किसमूर, पातोळ्या, मनगणे असे गोमंतकीय पदार्थ स्वतः शकुंतला पोतनीस बनवतात.

स्वतः घरी बनवलेले मसाले त्या रोजच्या स्वयंपाकात वापरतात. शिवाय मुंबईमधील कोकणातील लोकांची लक्षणीय संख्या बघता इथे खास असे मालवणी पदार्थदेखील मिळतात. यामध्ये इथले कोंबडी वडा, मटण वडा प्रसिद्ध आहेत.

एक काळ असा होता की गोमंतकीय हिंदू खानावळीला ’कोकण्याची खानावळ’ असे म्हटले जायचे. ‘हायवे गोमंतक’ची आजही ’कोकण्याची खानावळ’ म्हणून ओळख आहे. रमेश पोतनीस आता ९२ वर्षांचे आणि शकुंतला पोतनीस ८१ वर्षांच्या आहेत.

मागच्या आठवड्यात हायवे गोमंतकमध्ये आम्ही सगळे कुटुंबीय गेलो असता, काउंटरवर स्वतः रमेश पोतनीस बसले होते. थोडावेळ काउंटर सोडून आमच्याशी गप्पा मारायला येऊन बसले. पणजीत घर बांधलेय असे मोठ्या अभिमानाने सांगत होते.

९२ वर्षांचे हे गृहस्थ अजूनही रोज इथे येतात. त्यांचा उत्साह बघून नव्वदी पार केली आहे असे अजिबात वाटत नाही. किचन ते काउंटर हे सगळे आजही त्यांच्या देखरेखीवर असते. विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपटांमधील कलाकार, लेखक मंडळी या सगळ्यांचे ‘हायवे गोमंतक’ हे आवडते रेस्टॉरंट आहे.

नुकतेच एका मुलाखतीत दीपिका पदुकोणने तिचे मासळी खाण्यासाठी मुंबईमधले सर्वांत आवडते ठिकाण म्हणून ’हायवे गोमंतक’चे नाव घेतले होते. जवळच ’साहित्य सहवास’ असल्यामुळे लेखक मंडळीदेखील इथे आवर्जून येत असतात. ’दर्जेदार रेस्टॉरंट’ म्हणून शेकडो बक्षिसे मिळाली आहेत.

अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फूड ब्लॉगर्स, शेफ मुद्दाम इथे येऊन गेले आहेत. ‘या सर्वांनी ‘हायवे गोमंतक’वर भरभरून प्रेम केलं’ हे सांगताना रमेश पोतनीस भावनिक झाले होते.

नेहमी आम्हीदेखील घाईगडबडीत असतो. तसे यावेळीही होतो, पण तरीदेखील पोतनीसांशी झालेल्या गप्पांमुळे मासळी खाण्यात मजा आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT