मागोवा नी सांगावा : फादर अल्वारिस; लोकसेवेचे अध्वर्यू

फादर अल्वारिस यांना गोमंतकीयांनी ‘अपोस्टल ऑफ चॅरिटी’ मानले.
Antonio Francisco Xavier Alvares
Antonio Francisco Xavier AlvaresGoogle

सुशीला सावंत मेंडीस

गेल्या महिन्यात सेंट मेरी ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चने बिशप अल्वारिस मार ज्युलियस यांचा १००वा स्मृती उत्सव राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये साजरा झाला. यावेळी माननीय राज्यपाल डॉ. एस. श्रीधरन हे बिशपांसह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संपूर्ण भारतातील चर्चची उपस्थिती लक्षणीय ठरली. अनेकांसाठी मुख्य आकर्षण म्हणजे ‘अल्वारिस मार जलियस पुरस्कार २०२३’ने दयाबाई यांचा होणारा सन्मान.

त्या अत्यंत नम्र समाजकार्यकर्त्या आहेत ज्यांनी मध्य भारतातील असहाय्य आणि दलित आदिवासींसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. विशेषतः मध्य प्रदेशातील गोंड आदिवासींसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

सीरियन ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य आज गोमंतकीयांसाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. त्यांनी दुधात साखर मिसळल्याप्रमाणे मिसळून गोवा समाज गोड बनवला आहे.

अल्वारिस मार ज्युलियस यांचा गोव्याशी असलेला संबंध अनेक गोमंतकीयांना माहीत नाही. आंतोनियो फ्रान्सिस्को झेवियर अल्वारिस यांचा जन्म २९ एप्रिल १८३६ रोजी वेर्णा येथे एका गोमंतकीय कॅथलिक कुटुंबात झाला.

शालेय शिक्षणानंतर ते राशोल येथील प्रसिद्ध सेमिनरीमध्ये सामील झाले आणि सुरुवातीला ते गोव्यातील रोमन कॅथलिक चर्चमध्ये पंथगुरू होते.

अल्वारिस यांना १८६४मध्ये मुंबईत रोमन कॅथलिक पंथगुरू म्हणून नियुक्त केले गेले. अल्वारिस यांनी गोव्याच्या आर्कडायोसीसमध्ये आपली कारकीर्द सुरू केली.

फादर अल्वारिस यांना गोमंतकीयांनी ‘अपोस्टल ऑफ चॅरिटी’ मानले. १८७१मध्ये त्यांनी भटके लोक, भिकारी, गरीब यांना मदत करण्यासाठी वेर्णा येथे धर्मादाय संस्था सुरू केली. काही वर्षांनी त्यांनी गोव्यातील इतर शहरांमध्ये असोसिएशनचा विस्तार केला.

त्यांनी पणजीच्या फॉन्टेनहास येथील भंगी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी कॉलरा, स्मॉल पॉक्स आणि ब्यूबोनिक प्लेग विरुद्ध प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आणि पीडितांना मदत करण्यासाठी कठोर परिश्रम केले.

अल्वारिस यांनी ‘डायरेकोस पॅरा ओ ट्रीटमेंट दो कॉलरा’(कॉलेरावरील उपचारांसाठी दिशानिर्देश) ही पुस्तिका प्रकाशित केली. गोव्यातील अन्नाच्या तुटवड्याबद्दल ते इतके चिंतित होते की त्यांनी लोकांना स्वस्त अन्न तयार करण्याचे आवाहन केले.

त्यांनी मँडिओका (टॅपिओकाच्या लागवडीबद्दल) एक पुस्तिका प्रकाशित केली. गोव्यातील वस्तूंच्या वापराचे त्यांचे आवाहन स्वदेशी विचारसरणीकडे झुकलेले होते.

नारळ, खोबरेल तेल, काजू, फणस, चिंच, आंब्याचे लोणचे आणि मिठाई बिटिश भारतात निर्यात करण्याचे आवाहन गोव्याला करण्यात आले होते.

Antonio Francisco Xavier Alvares
Gomantak Editorial: गाफील राहू नका!

मुख्य बिशप डी. आंतोनियो व्हॅलेंटे यांच्याशी फादर अल्वारिस यांचे मतभेद झाले. कॅथलिक चर्चशी शत्रुत्व असल्याच्या कारणावरून ‘अ क्रुझ’ या त्यांच्या पेपरवर १८८२मध्ये बिशप व्हॅलेंटे यांनी बंदी घातली.

फादर अल्वारिस पत्रकार आणि लेखक, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, परोपकारी आणि खऱ्या ख्रिश्चन पंथावर दृढ विश्वास ठेवणारे म्हणून ओळखले जाऊ लागले. १८८७मध्ये त्यांनी पणजी येथे एका महाविद्यालयाची स्थापना केली.

‘अ व्हेरदाद’(सत्य) आणि नंतर ’द टाईम्स ऑफ गोवा’, ‘ओ ब्रादो इंडियनो’ या त्यांच्या नियतकालिकांद्वारे आणि ‘प्रोग्रेस दी गोवा’, ‘अँटिओक अँड रोम’, ‘युनिव्हर्सल सुप्रीमसी इन द चर्च ऑफ क्राइस्ट’ यांसारख्या पत्रिकांद्वारे लोकांना शिक्षित केले.

या पत्रिकांच्या माध्यमातून ते शोषित, वंचित लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. ते सरकारच्या विरोधात लिहित असल्यामुळे त्यांच्यापैकी बहुतेक नियतकालिकांवर बंदी घालण्यात आली आणि काही वर्षांनी त्यांना प्रकाशन बंद करण्यास भाग पाडले गेले.

फादर अल्वारिस चर्च आणि नागरी शक्तींनी केलेल्या छळाचा सामना करू शकले नाही आणि ते त्रावणकोरला गेले.

इथे त्यांनी तत्कालीन मलंकारा मेट्रोपॉलिटन मार जोसेफ डायोनिसियस (पुलिकॉटिल थिरुमेनी) यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी त्यांना पारुमालाच्या मार ग्रेगोरियोसकडे पाठवले. त्यांच्या महान आणि पांथिक व्यक्तिमत्त्वाने फादर अल्वारिस खूप प्रभावित झाले.

ऑर्थोडॉक्स चर्चच्या श्रद्धा, तत्त्वे, वारसा, चालीरीती आणि परंपरा योग्य आहेत याची त्यांना खात्री होती. त्यांनी १८८७मध्ये ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च स्वीकारले. त्यांच्या पांथिक जीवनामुळे त्यांना २९ जुलै १८८९ रोजी गोवा, भारत आणि सिलोनचे मेट्रोपॉलिटन म्हणून एपिस्कोपल दर्जा मिळाला.

ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सामील झाल्यानंतर बिशप अल्वारेस यांना रोमन कॅथलिक चर्चने बहिष्कृत केले आणि पोर्तुगीज सरकारने त्यांच्याकडे संशयाने पाहिले. त्यांना अटक करण्यात आली, त्यांचे एपिस्कोपल पोशाख काढून टाकण्यात आले आणि केवळ अंतर्वस्त्र अंगावर शिल्लक ठेवून रस्त्यावरून पोलीस लॉकअपपर्यंत धिंड काढण्यात आली.

कोणतीही खाट किंवा खुर्ची नसलेल्या एका घाणेरड्या तुरुंगात त्यांना डांबण्यात आले. त्यांच्याजवळील क्रॉस, अंगठी आणि त्यांनी परिधान केलेली एपिस्कोपल प्रतीकेही जबरदस्तीने काढून घेण्यात आली.

पण, सरकार आरोप सिद्ध करू शकले नाही आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली. काही दिवसांनंतर, त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु न्यायमूर्तींनी त्याला पुन्हा निर्दोष ठरवले.

परंतु, आपला एपिस्कोपल पोशाख वापरण्याची आणि मृत्यूपर्यंत काळा झगा घालण्याची परवानगी त्यांना नव्हती. आपल्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे त्यांनी पणजीमध्ये आपले कार्य सुरू ठेवले.

त्यांच्या घरी कुष्ठरोगी, टीबीचे रुग्ण, सफाई कामगार, गरीब, भिकारी आणि इतर सर्व निराधार लोक राहत होते. त्यांच्याकडे कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांना एका हातात कटोरा आणि दुसऱ्या हातात आधारासाठी काठी घेऊन भीक मागावी लागली.

बिशप अल्वारिस हे मुख्यतः कर्नाटकातील कॅनरा प्रदेशात होते आणि ब्रह्मावर येथे होते. त्यांच्यासोबत मंगळूर ते मुंबईपर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गरीब लोकांमध्ये काम करणारे त्यांचे प्रिय मित्र फादर नोरोन्हा होते.

या भागातील सुमारे ५००० कुटुंबे ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सामील झाली. कोलंबो, श्रीलंका, कर्नाटकातील ब्रह्मावर आणि कलियानपूर या गावांमध्ये त्यांचे कार्य व वास्तव्य होते. शेवटच्या दिवसांत ते रायबंदर येथे राहत होते; इथेच ते ख्रिस्तवासी झाले आणि त्यांचा दफनविधीही येथेच झाला.

आमांशाने आजारी असलेल्या बिशप अल्वारिस यांनी त्यांचे शेवटचे दिवस रायबंदर येथील एक सेवाभावी संस्था असलेल्या रुग्णालयात घालवले. २३ सप्टेंबर १९२३ रोजी त्यांचे निधन झाले. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील नागरिक समितीने भव्य अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.

त्यांना श्रद्धांजली वाहता यावी यासाठी त्यांचे पार्थिव २४ तास महापालिकेच्या सभागृहात ठेवण्यात आले होते. सर्व वृत्तपत्रे त्यांच्याबद्दलचे लेख आणि श्रद्धांजलींनी भरलेली होती. पोर्तुगीज सरकार शत्रू मानत असले तरी गव्हर्नर जनरलने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवला.

हजारो लोकांनी विशेषत: गरीब आणि भिकाऱ्यांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. प्रमुख मान्यवरांची अंत्यसंस्काराची भाषणे झाली. पणजीतील सर्व प्रमुख रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली आणि २४ सप्टेंबर १९२३ रोजी सांतिनेज स्मशानभूमीच्या एका निर्जन कोपऱ्यात कोणत्याही अंत्यसंस्कार विधीशिवाय मृतदेहास दफन करण्यात आले.

चार वर्षांनंतर त्याच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी त्याच्या अस्थी गोळा केल्या, शिशाच्या पेटीत ठेवल्या, त्याच ठिकाणी त्यांना संगमरवरी स्लॅबखाली पुन्हा गाडण्यात आले.

त्या संगमरवरी दगडावर, ‘एम मेमोरिया दे पाद्रे आंतोनिओ फ्रान्सिस्को झेव्हिअर अल्वारिस, दियुए फोइमुइ ह्युमेनितारिओ मिशनरिओ ए उम ग्रेड पॅट्रिओत’ (पाद्री अल्वारिस : एक महान मानवतावादी मिशनरी आणि एक महान देशभक्त) असे लिहिण्यात आले आणि एक मोठा क्रॉस उभारण्यात आला.

हा क्रॉस अजूनही स्मशानभूमीतील सर्वांत मोठा क्रॉस आहे आणि तो त्यांच्या अत्यंत प्रिय हिंदू मित्राने दान केल्याचे सांगितले जाते. अल्वारिस मार ज्युलियस हे एकमेव मलंकारा ऑर्थोडॉक्स मेट्रोपॉलिटन होते ज्यांना केरळच्या बाहेर पुरले गेले.

त्यानंतर चाळीस वर्षे कोणीही त्यांच्या कबरीला भेट दिली नाही. ऑर्थोडॉक्स चर्चच्या याजकांच्या पुढाकाराने संशोधन झाले. गोव्याचे तत्कालीन पॅरिश याजक रेव्हरंड फादर टी. ई. इस्सॅक यांनी दफन स्थळ शोधून काढल्यामुळे अल्वारिस मार ज्युलियस यांचे थडगे १ जानेवारी १९६७ रोजी सापडले.

बिशप अल्वारिस मार ज्युलियस यांचे पवित्र अवशेष रायबंदर येथील सेंट मेरी ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च येथील थडग्यात ६ ऑक्टोबर २००१ रोजी दफन करण्यात आले.

सिरियन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांचा समाज जरी संख्येने कमी असला तरीही, बिशप अल्वारेसच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक शतक ‘ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ गोवा’ टिकून आहे.

रायबंदर येथील सेंट मेरीस ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च, या महान पंथोपदेशक आणि शहीद यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मानित करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा ‘दुक्रोनो’ (स्मरणाचे फेस्त) साजरा करते. या वर्षी या फेस्ताचे शताब्दी वर्ष असल्याने, ते मोठ्या प्रमाणावर साजरे केले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com