Diwali Snacks 2023 Dainik Gomantak
ब्लॉग

‘फोव’चा दिवाळी फराळ

Diwali Snacks : पूर्वी घराघरांत फोव बनवण्याचं ‘लाटं’ असायचं. शेणानं सारवलेल्या जमिनीत खड्डा खणून त्यात जाड आकाराचं लाकूड बसवलं जायचं.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

रात्री उशिरापर्यंत नरकासुर बघून झाले असतील. आज भल्या पहाटे उठून आईच्या हातून तेल आणि नाल्लाचा रोस (नारळाच्या खोबऱ्याचा) लावून अभ्यंगस्नान करून झालं असेल आणि आता तऱ्हेतऱ्हेचे ‘फोव’, ‘अंबाड्याचे करम’, चण्याच्या उसळीचा फराळ करायला बसला असाल. खूप दिवसांनी घरातील सर्व मंडळी एकत्र आली असतील.

दारापुढे सुंदरशी रांगोळी आणि दरवाजाला फुलांचं तोरण बांधलं असणार. दिव्यांच्या प्रकाशात घर उजळून निघालं असेल. प्रत्येकाच्या घरी साधारण असंच चित्र असेल.

बाकी देशभर वेगवेगळ्या राज्यांत दिवाळीची जशी धूमधाम असते, तशी गोव्यात बघायला मिळत नाही. गोवा आपलं वेगळेपण इथंही जपतो. इथली दिवाळी वेगळीच असते. गोव्यातल्या दिवाळीत साधेपणा जपला जातो. गोमंतकीय मंडळींना दिवाळी तेवढं अप्रूप नसतं.

आगळावेगळा दिवाळी फराळ

लहानपणापासून दिवाळीचा फराळ म्हणून ताटात काही विशिष्ट पदार्थ बघायची सवय झाली होती; पण आता ही सवय मोडली गेलीय. पाच प्रकारचे ‘फोव’ (पोहे) आणि अंबाड्याचं करम खाल्ल्याशिवाय दिवाळी साजरी करतोय, असं वाटत नाही. जी मंडळी गोवेकर नाहीत, त्यांना हे जरा विचित्र वाटेल.

‘दिवाळीत कसले पोहे खाता? आम्ही तर वर्षभर पोहे खात असतो. दिवाळीत कसं काहीतरी वेगळं असलं पाहिजे’ असं काहीजण म्हणतील. पण याच काळात शेतातून नवा तांदूळ आलेला असतो. याच तांदळाचे ‘फोव’ बनवण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी घराघरांत फोव बनवण्याचं ‘लाटं’ असायचं. शेणानं सारवलेल्या जमिनीत खड्डा खणून त्यात जाड आकाराचं लाकूड बसवलं जायचं.

त्याच्या खाली उकडलेल्या तांदळाचे दाणे ठेवून घरातील बायका याला पायाने जोर देऊन त्याचे पोहे बनवायच्या. आताच्या पिढीला पोहे बनवण्याची ही पद्धत माहीत नसेल. पण घरातील ज्येष्ठ व्यक्ती लाट्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या पोह्यांची रम्य आठवण काढतात.

या पद्धतीनं जेव्हा पोहे बनवायला सुरुवात व्हायची, तेव्हा कोणत्या घरी पोहे बनवले जात आहेत, हे सांगण्याची वेगळी गरज भासत नव्हती.

वाऱ्यासोबत पोह्यांचा सुवास सर्वत्र आपोआप पोहोचायचा. मग काय... आजूबाजूच्या सर्व छोट्या मुलांची पोहे बनवतात तिथं गर्दी जमायची. मोठ्या उत्सुकतेनं पोहे बनवण्याच्या कामाचं निरीक्षण सुरू व्हायचं. मध्येच हातात मूठभर पोहे मिळायचे.

पण मूठभर पोह्यांचं काय मोठं आकर्षण असायचं. ‘फटाक फटाक’ असा येणारा आवाज आणि त्यासोबत तांदळाच्या दाण्यांचे तयार होणारे पोहे एखाद्या जादूच्या खेळासारखं भासायचं.आता पोहे बनवण्याची पद्धत दुर्मिळ झाली आहे. थेट दुकानातून पोहे मिळू लागल्यावर कोण आता असे पोहे तयार करेल?

खास दिवाळीतले वेगवेगळ्या प्रकारचे ‘पोहे’

बाकी वर्षभर स्वयंपाकघरात पोह्यांना एवढं महत्त्व मिळत नसलं तरी दिवाळीत अतिशय महत्त्वाचं स्थान मिळतं. दिवाळी आणि पोहे यांचं नातं आजही जपलं गेलंय. गोवा सोडून सर्व साधारणपणे घराघरांमध्ये केले जाणारे पोहे आणि खास दिवाळीसाठी म्हणून गोमंतकीय घरांमध्ये केले जाणारे पोहे यात खूप अंतर आहे.

इथं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनवले जातात कि केवळ त्याचे प्रकार जरी ऐकले तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल. रोसातले फोव, ताकातले फोव, दह्यात कालवलेले, दुधातले फोव, पाकातले फोव, फोंवा खीर, फोवा चिवडो, बटाटा फोव, तिखशे फोव अशी न संपणारी लिस्ट आहे. यातले किमान पाच प्रकारचे फोव घराघरांत नरक चतुर्दशीला बनवले जातात. शिवाय यासोबत वाटाण्याची उसळ आणि ‘आंबाड्याचे करम’ बनवतात.

आंबाडे हे चवीला आंबट. याचं आंबट-तिखट-गोड असं करम बनवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या पोह्यांसोबत वाटाण्याची उसळ आणि आंबट -तिखट-गोड करम खायला छान लागतं. आंबाड्याचे करम हा पदार्थ फारच आगळावेगळा. या दिवशी याला खास महत्त्व असतं.

माझ्या मनात बालपणी अनुभवलेल्या दिवाळीच्या प्रतिमेचा अधिक प्रभाव आहे. रांगोळी, तोरण, अभ्यंगस्नान हे सगळं या प्रतिमेत देखील असलं तरी फराळाच्या ताटात मात्र फारच निराळे पदार्थ आहेत. लहानपणापासून दिवाळी म्हणजे पाच-सहा दिवसांचा मोठा उत्सव, असं मनावर बिबवलं गेलंय. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवशी दिवाळी वेगळा आनंद घेऊन येते.

इथं मात्र एक नरक चतुर्दशी सोडल्यास बाकीचे सगळे दिवस अनुभवायला मिळत नाहीत. आजूबाजूच्या घरांमधून चकली तळण्याचा, बेसनाच्या लाडूचा, खमंग चिवड्याचा, अनारसे -करंजी- शंकरपाळे तळण्याचा सुवास काही येत नसला तरी मी देखील ‘फोव’चा फराळ करायला आता उत्सुक असते.

नरक चतुर्दशीला सासरी पोहे आणि भाऊबीजेला माहेरी लाडू, चिवडा, चकलीचा फराळ केला की दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटतं. माहेरी आई आणि सासरी सासूबाई मोठ्या उत्साहाने हे पदार्थ बनवून दिवाळीची अनुभूती देतात. वर्षभर इतके वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाल्ले जातात. सर्वत्र दिवाळी अतिशय उत्साहाने साजरी होत आहे.

घराघरांत तऱ्हेतऱ्हेचे गोडधोड पदार्थ बनत आहेत. पण दिवाळीच्या दिवसांत अतिशय सात्त्विक पद्धतीचे पोहे खाणारे फक्त गोवेकर मंडळीच असणार. दिवाळीत अशा साध्या चवीचे पोहे खाणं, ही खरोखरंच आगळीवेगळी अनुभूती वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT