Congress Dainik Gomantak
ब्लॉग

Congress: 'हाता'ची नवी घडी अन्.....

Congress: तब्बल बावीस वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Congress: तब्बल बावीस वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे. प्रचंड मताधिक्य मिळवून मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा पराभव करून हे पद मिळविले. खर्गे यांचे पारडे या निवडणुकीत पहिल्यापासूनच जड होते आणि खुद्द गांधी घराण्याचा कल त्यांच्याकडे होता, हे लपून राहिलेले नव्हतेच.

त्यामुळे त्यांचा विजय अपेक्षित होता. त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा पाहता ही कमालीची एकतर्फी अशी निवडणूक झाली. तरीही या घटनेला ऐतिहासिक म्हणावे लागेल. या घटनेचे ऐतिहासिकत्व खर्गे की थरूर या निकालात नव्हतेच. पक्षांतर्गत निवडणुकांच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये सुरू झालेली घुसळण ही एक महत्त्वाची घटना म्हणावी लागेल.

पक्षासमोरील वर्तमान आव्हाने लक्षात घेता तशी ती होणे आवश्यक होते. ‘जी-23’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाने पक्षात अधिक ‘मतमोकळेपणा’ आणण्यासाठी पुढाकार घेतला आणि पक्षनेतृत्वासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीशी संबंधित होते. त्यावर काहींनी ‘हे सगळे कथित बंडखोर मागच्या दाराने सभागृहात येणारे दरबारी राजकारणी आहेत’, असा उपहास करून त्यांची खिल्ली उडवली. परंतु त्यातील काही मुद्दे रास्त होते.

या पक्षांतर्गत निवडणुकीमुळे पक्षाच्या रचनेत मूलगामी बदल लगेच संभवत नसला आणि हायकमांडनामक शक्तिपीठ आहे तिथेच राहणार असले, तरीही निदान पक्षात बदलांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली, हेही नसे थोडके. हे घडून येण्यामागे एक महत्त्वाचे कारण स्पर्धेचा रेटा हे आहे, यात शंका नाही.

भारतीय जनता पक्षाने 2014 आणि 2019 या लागोपाठच्या दोन सार्वत्रिक निवडणुकांत जी मुसंडी मारली, त्यात या 137 वर्षांच्या ऐतिहासिक राजकीय पक्षाची अवस्था अक्षरशः दयनीय झाली. या अपयशाची जबाबदारी स्वीकारून पक्षसंघटनेत आमूलाग्र बदल घडवणे आवश्यक होते. संघटनेत नवे रक्त आणण्यासाठी, नवा कार्यक्रम आणि त्याला अनुरूप नवी परिभाषा घडविण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज होती.

नेमक्या त्याच वेळी पक्षात निर्नायकी अवस्थेचे चित्र उभे राहिले होते. सोनिया गांधी आजारपणामुळे आणि राहुल गांधी यांच्या दोलायमान मनःस्थितीमुळे तसे झाले. आता काही प्रमाणात ते चित्र पालटत असून राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने देशभर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी संवाद साधत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत निवडणुकीच्या निमित्ताने निदान पक्षसंघटना चर्चेत आणि काही प्रमाणात ‘कृती’त तरी आली आहे.

खर्गे यांच्या कारकीर्दीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. आजवर फार मोठ्या व्यक्तींनी भूषविलेले हे पद आहे. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरच्या देश उभारणीत यातील अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नव्या अध्यक्षांपुढील आव्हाने साधीसोपी नाहीत. एकीकडे गांधी घराण्याचा वरदहस्त आपल्यावर कायम राहील, याची काळजी घेतानाच स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊन पक्षाला दिशा देण्याचे काम त्यांना करावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष यांच्याशी लढताना विरोधकांचे ऐक्य हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. या ऐक्याच्या प्रयत्नात काँग्रेसची स्वीकारार्हता वाढविणे ही खर्गे यांच्यापुढील एक कसोटी असेल. सध्या तरी या प्रकारच्या वाटाघाटींमध्ये, चर्चांमध्ये काँग्रेसकडे ‘असून अडचण...’ या दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचे दिसते. दुसरे आव्हान जास्त महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे मोदींचा रथ रोखण्यासाठी प्रतिक्रियात्मक राजकारणाची वेस ओलांडून स्वतंत्ररीत्या पुढाकार घेणाऱ्या राजकारणाची गरज आहे.

मोदींच्या कारभाराची एकाधिकारशाहीची शैली, घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवर घातला जाणारा घाला, ध्रुवीकरणाचे धोरण यांच्यावर टीका आणि प्रतिक्रिया देणे हे विरोधकांचे कर्तव्यच आहे. परंतु त्यापलीकडे जाऊन स्वपक्षाचा वेगळा विधायक कार्यक्रम घेऊन, नवी स्वप्ने दाखवत खर्गे आणि अन्य नेतेमंडळींना काँग्रेसला पुढे न्यावे लागेल.

जनसमूहाच्या वाढत्या आकांक्षा हे आजचे वास्तव आहे. त्यांना प्रतिसाद देणारा अभिनव आणि कल्पक असा कार्यक्रम तयार केला, तर पडझडीतही वीस टक्के जनाधार टिकवून धरणारा हा पक्ष पुन्हा मुसंडी मारू शकतो. त्यामुळेच नव्या अध्यक्षाची निवड ही केवळ औपचारिकता न उरता पक्षसंस्कृतीतील बदल ठरावा.

भाजपमध्ये जे.पी. नड्डा अध्यक्ष असले तरी सगळी सूत्रे मोदी-शहा यांच्याकडेच आहेत, हे सगळेच जाणतात. नव्या अध्यक्षाच्या निवडीनंतर तसाच पॅटर्न काँग्रेसमध्ये निर्माण झाला, तर दोघांत फरक तो काय, असा प्रश्‍न निर्माण होईल.

शशी थरूर या पदावर आले असते तर पक्षाचा चेहेरामोहरा बदलू लागल्याचे अधिक ठसठशीतपणे समोर आले असते, असे अनेकांना वाटत होते. ते तुलनेने तरुणही आहेत. खर्गे यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाची पारंपरिक गढी कायम राहिल्याचा सूर त्यांच्याकडून व्यक्त झाला तर ते स्वाभाविकच.

या टीकेत तथ्य असले तरी पक्षांतर्गत निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाने एक नवे वळण घेतले आहे, हे नक्की. त्या मार्गाने यशाचा सोपान गाठता येतो की नाही, हे नवे अध्यक्ष, त्यांची संपूर्ण टीम यांच्या कर्तृत्वावर आणि कौशल्यावर अवलंबून असेल आणि या बदलाचा स्वीकार गांधी घराणे किती मनापासून करते यावरही. त्यामुळेच ‘हाता’च्या अर्थात काँग्रेस पक्षाच्या नव्या घडीकडे सर्वजण अपेक्षेने पाहात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT