Goa Food : पणजीत नाश्त्याचे पारंपरिक खाद्यपदार्थ देणाऱ्या कॅफेंच्या बरोबरीने अनेक ‘फँन्सी कॅफे’, ‘बिस्त्रो’ सुरू झाले आहेत. आपल्याला कधी कधी छोटी भूक लागते. त्यावेळी खूप, भरपेट खायचं नसतं, तर थोडंसं काहीतरी खायला हवं असतं. अशा वेळी रेस्टोरंटमधला तोच तो मेनू बघून कंटाळा येतो. नेहमी काय तो इडली-वडा आणि डोसा खायचा? ‘छोट्या भुकेसाठी जरा काहीतरी हटके खायला पाहिजे ना!’, असा विचार मनात डोकावतो आणि पाय आपोआप या जरा वेगळा मेनू असलेल्या कॅफेकडे वळतात.
उत्साहाने बहरलेल्या तरुणाईने कॅफेदेखील बहरून गेलेला असतो. ते काय खात आहेत, यावर हळूच नजर टाकली जाते. त्यांच्या टेबलवरील पदार्थांवरून त्या कॅफेतील सर्वांत जास्त मागणी असलेला पदार्थ कोणता, हे लगेच कळतं. बरोबर संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पोटात या छोट्या भुकेची जाणीव होते. पुण्यात माझ्या ऑफिसच्या खाली असंख्य फूड स्टॉल होते. अतिशय कमी किमतीत चविष्ट असे असंख्य खाद्यपदार्थ मिळायचे. घरून आणलेला टिफिन दुपारीच संपायचा. मग, संध्याकाळी भूक लागायची. अशावेळी याच फूड स्टॉल्सचा आधार असायचा. आता पणजीतल्या ऑफिसच्या आसपासदेखील छोटेसे कॅफे, मिल्कशेक, भाजीपाव मिळणारी ठिकाणं आहेत, पण स्वस्तात मस्त असा प्रकार नाही. पणजीत अशाच फॅन्सी आणि जरा वेगळे पदार्थ देणाऱ्या कॅफे कम रेस्टोरंटमध्ये ’गॅस्ट्रोनट’ हे माझं आवडतं रेस्टोरंट आहे. इथे जाण्यापूर्वी त्या रस्त्याने जाताना अनेकदा ’गॅस्ट्रोनट’ हे नाव वाचून उत्सुकता वाटायची. ’ऍस्ट्रोनट’ माहीत होतं पण, ‘हे गॅस्ट्रोनट काय प्रकरण आहे?’, असा प्रश्न पडायचा. मग उत्सुकतेपोटी आजच्या पिढीच्या भाषेत मी ’गुगल’ केलं, तर तिथे ’गॅस्ट्रोनॉट’चा छान अर्थ मिळाला. अन्नाबद्दल उत्कट कौतुक असलेली व्यक्ती किंवा अशी व्यक्ती जिचे लक्ष फक्त उत्तम आणि दर्जेदार अन्नावर असते ती म्हणजेच ’गॅस्ट्रोनॉट’. याच ’गॅस्ट्रोनॉट’ वरून शाहरुख हरजी याने ’गॅस्ट्रोनट’ हा शब्द आपल्या रेस्टोरंन्टसाठी प्रचलित केला.
पणजी ही राज्याची राजधानी, शिवाय पणजीत पर्यटकांचा लोंढा असतो. अशावेळी रेस्टोरंट क्षेत्रात कमालीची स्पर्धादेखील आहे. पर्यटकांपासून ते तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वांना आवडेल असं रेस्टोरंट असलं पाहिजे, शिवाय ते इतर रेस्टोरंटपेक्षा वेगळंदेखील असलं पाहिजे, या विचारातून शाहरुख हरजी या तरुणाने 2016 साली पणजीत ’गॅस्ट्रोनट’ नावाचं आगळंवेगळं रेस्टोरंट सुरू केलं. यावेळी शाहरुख फक्त वीस वर्षांचा होता. या व्यवसायाचा कोणताही पूर्वानुुभव नसताना शाहरुखने ’गॅस्ट्रोनट’ सुरू केलं.
पणजीतल्या डॉन बॉस्को शाळेच्या चौकात अगदी मोक्याच्या ठिकाणी त्याला दुकानाचा एक गाळा रिकामा असलेला दिसला. इतक्या मोक्याच्या ठिकाणी खाण्यापिण्याचा व्यवसाय चांगला चालू शकतो याची शाहरुखला खात्री होती. त्याने ही गोष्ट आपल्या वडिलांना बोलून दाखवली आणि वडीलच त्याच्या व्यवसायातील भागीदार बनले. २०१६साली पणजीमध्ये शाहरुखच्या गॅस्ट्रोनटची पहिली शाखा सुरू झाली तेव्हा याच्या आणखी शाखा सुरू होतील, असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. अवघ्या दोन वर्षांत त्याची पर्वरीला दुसरी शाखा सुरू झाली आहे. कोणताही प्रचार-प्रसार न करता केवळ लोकांनीच केलेल्या तोंडी प्रचार-प्रसिद्धीमुळे पणजीतलं गॅस्ट्रोनट एकदम प्रसिद्ध झालं. तरुणाईचा अड्डा बनलं. या सगळ्या यशात हरवून न जाता शाहरुखने स्वतःला हे काम पुढे चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. यश फक्त नशिबावर टिकून नसतं, त्यासाठी अपार कष्टदेखील घ्यावे लागतात. शाहरुखने तेच केलं. अन्नप्रक्रिया विषयाशी संबंधित वेगवेगळे कोर्स त्याने पूर्ण केले. याच वेळी त्याच्या लक्षात आलं की, त्याला आइस्क्रीम विषयात जास्त गोडी आहे आणि गोव्यात आइस्क्रीमची विक्रमी विक्री होते. शाहरुखने इटलीला जाऊन तिथल्या खास ‘जिलेटो’ या आइस्क्रीम प्रकारचे प्रशिक्षण घेतलं. इटलीमध्ये सर्व प्रकारच्या आइस्क्रीमना ‘जिलेटो’ म्हटलं जातं. गॅस्ट्रोनटमध्ये गेल्यावर सर्वांत पहिलं ‘जिलेटो’चं काउंटर दिसतं. यामुळेच सुरुवातीला ’गॅस्ट्रोनट’ हे आइस्क्रीम पार्लर आहे असाच माझा गैरसमज झाला होता आणि म्हणूनच तिथं जायचं मी सारखं टाळत राहिले. मग, एकदा कधीतरी आइस्क्रीम खाण्यासाठी म्हणून गेले तर आत एकदम अलिबाबाची गुहा असल्याप्रमाणे मोठा खजिनाच सापडला. यात आइस्क्रीम कुठल्या कुठेच राहिलं आणि हाताशी वेगवेगळे पदार्थ लागले.
काय मिळतं गॅस्ट्रोनटमध्ये?
गॅस्ट्रोनट हे ’फाइन फास्ट डायनिंग’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारं रेस्टोरंट आहे. इथं तुम्हाला माफक दरात उत्तम पदार्थ मिळतील. इथला खिमा-पाव, वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स जसे की, चिकन रोल, पनीर रोल, चिकन पेरी रोल, प्रॉन्स रेषाद रोल मिळतात, सॅन्डविचचे विविध प्रकार इथे आहेत. खास गोवन पोईबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या संगती आहेत जसे चिकन कबाब पोई, मटण कबाब पोई, चिकन काफ्रियाल पोई, मशरूम काफ्रियाल पोई मिळते. याशिवाय मंगलोरी चिकन करी राइस, गोवन प्रॉन्सकरी राइस, केरला प्रॉन्सकरी राइसदेखील मिळते. पास्ता, पिझ्झा, बर्गर तर आहेतच, पण ताजे कोल्ड-प्रेस्ड ज्यूस, मिल्कशेक यासाठीही गॅस्ट्रोनट प्रसिद्ध आहे. मला इथला अवाकाडो मिल्कशेक आवडतो.
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा संध्याकाळची छोटी भूक यातील कोणत्याही वेळी तुम्ही गॅस्ट्रोनटला जाऊ शकता. रोजच्या भाजीपाव किंवा इडलीवडाला कंटाळा असाल, तर गॅस्ट्रोनट अतिशय योग्य जागा आहे. जवळच डॉन बॉस्को शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे हे रेस्टोरंट विद्यार्थिप्रिय झालं आहे आणि हेच विद्यार्थी गॅस्ट्रोनटचे ’ब्रँड अँबेसिडर’ आहेत. कारण, हेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गॅस्ट्रोनटबद्दल कौतुकाने लिहितात. 2016 साली सुरू झालेल्या गॅस्ट्रोनटचा 2019 पर्यंत छान जम बसला होता. लॉकडाउनमध्ये गॅस्ट्रोनट बंद होतं. त्यावेळी खूपच अनिश्चित वातावरण होतं. पण, या परिस्थितीलादेखील तोंड देऊन गॅस्ट्रोनटने परत उभारी घेतली. इथल्या वैविध्यपूर्ण मेनूसाठी गॅस्ट्रोनट ओळखलं जातं.
मनस्विनी प्रभुणे-नायक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.