सर्वेश बोरकर
Chhatrapati Shivaji Maharaj : घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्यप्रकारांवर शिवकाळात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. सरनौबत ही शिवकाळातील अत्यंत मोठी असामी, दोन्ही विभागांचा घोडदळ आणि पायदळाचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत असे आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत.
हिशेब, ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे शिवकाळात पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत असे, सरकारातून घोडा मिळणारा बारगीर व २५ बारगिरास १ हवालदार, ५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार (पगार ५०० होन सालाना व पालखीचा मान) १० जुमलेदारांच्यावर १ हजारी (सालाना पगार १००० होन) ५ हजारींच्यावर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत. अंदाजे या सैन्य सरनौबतास सालाना ४००० ते ५००० होन इतका पगार होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनौबत कोण होते आणि शिवकाळात घोडदळ व पायदळ सरनौबताचे नाव, नियुक्ती काल व सैन्य प्रकार आपण पाहू - तुकोजी चोर १६४०-१६४१ या दरम्यान सरनौबत, नुरखान बेग १६४३ दरम्यान पायदळ सरनौबत , माणकोजी दहातोंडे १६५४च्या दरम्यान घोडदळ सरनौबत,
येसाजी कंक १६५८च्या दरम्यान पायदळ सरनौबत, नेतोजी पालकर १६५८ च्या दरम्यान घोडदळ सरनौबत, कडतोजी प्रतापराव गुजर १६६६च्या दरम्यान घोडदळ सरनौबत, हंसाजी हंबीरराव मोहिते १८ एप्रिल १६७४ रोजी घोडदळ सरनौबत, तर ही आहे यादी शिवकाळातील सरनौबतांची.
तुकोजी चोर यांना सरनौबत केल्याचा उल्लेख फक्त सभासद बखरीत (पृ. ९) आणि एका पत्रामध्ये आहे (राजवाडे खंड १७ लेखांक १०). छत्रपती शिवाजीराजांचे जे मावळातील बालपणीचे मित्र, त्यातील हे एक. या व्यतिरिक्त याचा उल्लेख सुभानमंगळच्या लढाईसंबंधी शिवभारतात येतो. तुकोजीसोबत एक भैरोजी चोर असेही नाव येते.
तुकोजी नेमके पायदळाचे सेनापती होते की घोडदळाचे हे मात्र माहितीच्या अभावी सांगता येत नाही. शेजवलकर यांच्या अंदाजे तुकोजी यांचा मृत्यू १६५७च्या जुन्नर लुटीच्या वेळी झाला, तोवर तुकोजी हे सरनौबत होते.
नुरखान बेग याचे नाव पुण्यात १६५७साली झालेल्या एका निवाडापत्रात पायदळाचा सरनौबत म्हणून येते. शहाजीराजांनी शिवाजीराजांसोबत जी माणसे पाठवली त्यात हा असावा. या पत्राच्या आधी किंवा नंतर याचा काहीही सुगावा लागत नाही.
पण १६५७ नंतर मात्र लगेचच याला सरनौबतीवरून दूर करून त्याजागी येसाजी कंक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
येसाजी कंक राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सरपाटीलकी असणारे घराणे, येसाजी कंक म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे बाल सवंगडी. या सवंगड्याने आपल्या जिवासरशी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली, जवळजवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते.
अफजल प्रकरण, ७०चा वादळी पराक्रम, भागानगर भेट इत्यादी ठिकाणी यांचे भरपूर उल्लेख आहेत. यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून पडले. यांच्यासोबत एक कोंडाजी कंक असेही नाव येते, परंतु त्याची अधिक माहिती मिळत नाही.
नेतोजी पालकर यांचा उल्लेख आजवर इतिहासात ‘नेताजी’ असा लिहिला गेला; पण ते चूक आहे. समकालीन साधानांप्रमाणे नेतोजी असे आहे. यांना १६५७च्या सुमारास माणकोजींनंतर पागेची सरनौबती मिळाली. दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी प्रती छत्रपती शिवाजीचीच उपमा मिळवली.
पण स्वराज्याच्या कडक नियमात न बसणाऱ्या हलगर्जीपणामुळे त्यांना छत्रपती शिवाजीराजांनी, ‘समयास कैसे पावला नाहीत?’ असा कौल लावीत दूर केले. हे मग अगोदर आदिलशाहीत व तेथून मिर्जा राजाशी संधान बांधून मोगलाईत गेले व परत येऊन शिखर शिंगणापूरला शुद्ध झाले.
कडतोजी प्रतापराव गुजर यांच्या नेमणुकीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत. मिर्झा राजा जयसिंगावर छुपा हल्ला, मोगल सेनापतीची यांनी व छत्रपती शिवाजीराजांनी केलेली एकाच वेळची लूट इत्यादी पण विश्वसनीय पुराव्याच्या आधारे यांना सरनौबती आणि प्रतापराव किताब १६६६ मध्ये मिळाला तसेच दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी तो सार्थ ठरवला. बागलाण, औरंगाबाद स्वारी आणि इतर अनेक पराक्रम यांच्या नावे आहेत.
१६७४मध्ये राज्याभिषेकाच्या काही काळ आधी बहलोल खानला जिवंत सोडल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना, ‘सला काय निमित्य केलात?’ असा करडा सवाल केला आणि बहलोलखानास गर्दीस मेळवून मगच रायगडी आम्हास तोंड दाखवावे, असा कडक आदेश दिला आणि हाच राग मनी बाळगून महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापराव गुजर आपल्या ६ सरदारांना सोबत घेऊन बहलोल खानवर तुटून पडले आणि वीरगतीस प्राप्त झाले.
हंसाजी हंबीरराव मोहिते, माणूस तसा स्थिर बुद्धीचा. शंभूकालात जी मोगली वावटळ उठली त्यात सगळ्यात महत्त्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंसाजी हंबीरराव मोहित्यांनी.
प्रतापरावांच्या नंतर कुणास सरनौबती द्यावी या विचाराने छत्रपती शिवाजी महाराज चिपळूणला असणाऱ्या आपल्या फौजेचा कौल घेऊन आले आणि त्यांनी हंबीरराव मोहिते यांना सरनौबत केले. हे छत्रपती शिवाजीराजांच्या अखेरपर्यंत घोडदळाचे सरनौबत होते. हंबीरराव मोहिते पुढे शंभूकाळात शर्जाखानाच्या लढाईत वाई इथे गोळा लागून पडले.
या सर्व शूर सेनानींना मानाचा मुजरा.
संदर्भ : सभासद बखर , श्रीशिवभारत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.