Balkrishna Kelkar Dainik Gomantak
ब्लॉग

‘क्या लेके आयो जग में क्या लेके जायेगा? ओ बंधू!’

लहानपणीच आईवडिलांपासून दूर आरवलीच्या मामांकडे राहून गरिब परिस्थितीत गुरुवर्य बाळकृष्ण केळकर यांनी शिक्षण घेतले.

दैनिक गोमन्तक

काही माणसांचे कर्तृत्त्व एवढे असते की त्यांना वेगळ्या परिचयाची गरजच नसते. गुरुवर्य बाळकृष्ण केळकर असेच एक व्यक्तिमत्व. त्यांची कारकीर्द किंवा प्रसिद्धी खूप उशिरा मिळूनही, कधीही कुठेच अहंपणा न ठेवता सतत जमिनीशी नाते जोडलेले केळकर गुरुजी.

लहानपणीच आईवडिलांपासून दूर आरवलीच्या मामांकडे राहून गरिब परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. मामा कीर्तनकार असल्याने आपसूकच त्यांना गाण्याची आवड निर्माण झाली. विविध देवळात सादर करून त्यांनी शाबासकी मिळवली. हुशार, मेहनती स्वभावामुळे बी.एससी. (केमिस्ट्री) ही पदवी प्राप्त केली. मात्र, पुढे शिकायची इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे त्यांना घरी परतावे लागले. त्यानंतर सीआयबीए कंपनीत सिनियर पोस्टवर काम केले. त्याच दरम्यान खऱ्या अर्थाने संगीत त्यांच्या आयुष्यात आले. पं. सुधाकर करंदीकर यांच्याकडे अलंकारपर्यंतचं शिक्षण विविध अडथळे पार करत पूर्ण केले. केळकर गुरुजींनी नोकरी सांभाळूनही रियाजात खंड पडू दिला नाही.

म्हणूनच करंदीकर गुरुजींच्या पट्ट शिष्यांत त्यांचे नाव अव्वल आहे. त्यानंतर त्यांनी मार्शेलमध्ये गायनाचे क्लास घेतले व त्यांच्या संगीत क्षेत्रातील वाटचाल सुरु झाली. याच दरम्यान, नोकरी सोडून त्यांनी आपले जीवन संगीताला वाहिले. हेडगेवार आणि मुष्टीफंड शाळांत संगीत शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. तिथे असंख्य मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण करून सलग २० ते २५ वर्षे विविध गीते शिकवली. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या मुलांचे वेगळे वर्ग घेऊन त्यांना गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला बसवणं, आत्मविश्‍वास वाढवणे, प्रोत्साहन देणे, हे सगळं निस्वार्थीपणे त्यांनी केले. शास्रीय गायनाबरोबरच त्यांचा उपशास्त्रीय गायनावरही तेवढाच पगडा होता. शास्त्रीय गायक म्हणून त्यांचे नावलौकिक तर होतेच पण एकमेव उत्तम नाट्यगीत गायक म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांनी नाटकांमधूनही काम करून रसिकांची दाद मिळवली. पुढे प्रकृतीस्वास्थ्यामुळे नाटकात काम करणे जमले नाही. पण संगीत शिक्षकाचे काम तेवढ्याच जोमाने व उत्साहाने करत राहिले.

मुलांमध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने केळकर गुरुजींनी ‘अभिजात सांस्कृतिक मंडळ’ संस्थेची स्थापना करून संगीत विद्यालय सुरू केले. तिथे हळूहळू 150 विद्यार्थी गायन, हार्मोनियम आणि तबला शिकण्यासाठी येऊ लागले. उत्तम गायक असूनही त्यांनी शिक्षकी पेशेला अधिक महत्त्व दिले. मोठमोठ्या संगीत समारोहात, प्रतिष्ठित शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन स्पर्धांमधून गाणे सादर करून, अनेक स्पर्धा जिंकूनही त्यांनी कधीच प्रसिद्धीचा किंवा पैशांचा हव्यास शिवू दिला नाही.

त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे, त्यांनी गोव्यातील थोर संगीतकार रामकृष्णबुवा वझे यांची ओळख सर्वांना करून दिली. वझेबुवांचे कार्य, त्यांचे संगीत गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही लोकांपर्यंत पोचवणे यात खूप महत्त्वाचा वाटा त्यांनी उचलला. पं. प्रसाद सावकार, पं. भालचंद्र पेंढारकर, पं. रामदास कामत, तुळशीदास बोरकर, यशवंतबुवा जोशी अशा अनेक दिग्गजांचा वरदहस्त केळकर गुरुजींवर होता.

आयुष्याच्या जमापुंजीसाठी, कष्टांसाठी, चांगल्या कार्यासाठी साहजिकच जनसामान्यांची व जाणकारांची दाद, सन्मान व पुरस्कार रुपी मिळणारच. कितीतरी पुरस्कार, राज्य पुरस्कारासारखा मोठा सन्मान मिळवूनही त्यांच्या वागण्यात कुठेही गर्व दिसला नाही. त्यांचा नम्र, शांत आणि निर्मळ स्वभाव कायम तसाच राहिला. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता आपले काम त्यांनी निरंतर सुरू ठेवले. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्यातील कलाकारावर लोक भाळले होते. गेल्या वर्षी 2021 साली 25 मे रोजी आकस्मिकपणे या थोर व्यक्तीला देवाज्ञा झाली आणि त्यांना ओळखणारा प्रत्येक माणूस हळहळला.

केळकर गुरुजींवर असलेले असंख्य लोकांचे आशीर्वाद, प्रेम, आदर आणि सद्भावना कायम त्यांच्यासोबत आहेत. आणि त्यांचे विचार, शिकवण, आठवणी, त्यांचं आभाळाएवढं निस्वार्थी कार्य कायम आमच्याबरोबर आहे. म्हणूनच म्हणाले, ‘क्या लेके आयो जगमें क्या लेके जायेगा? ओ बंधू!’. केळकर गुरुजींना सादर प्रणाम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT