Auspicious day of Diwali has dawned Dainik Gomantak
ब्लॉग

दिव्यांनी मिटावा काळोख अंतरीचा

दैनिक गोमन्तक

आपल्या सहनशक्तीची, सहजीवनाची, आपल्या विजिगिशेची परीक्षा पाहाणारा कालखंड मागे पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. क्षितिज प्रकाशमान होते आहे. कोरोनाचा अंधःकार ओसरू लागला आहे. शैथिल्याची आसक्ती थोडीशी दूर ठेवली आणि नियमांच्या अधिन राहून सार्वजनिक वर्तन केले तर कमीत कमी क्षती होऊन या कृष्णछायेखालून आपण सगळेच बाहेर निघू. आश्वस्ततेचे उन्मेश तरारत असले तरी सावधगिरी अजूनही वाऱ्यावर सोडण्याचे दिवस आलेले नाहीत. देशांत कोरोना विषाणू आपल्या स्वभावधर्माला अनुसरून नवनव्या स्वरूपात अजूनही दर्शन देत आहे. त्याच्या संक्रमणाचा झपाटा मोठा आहे; बंदिस्त जिणे न परवडणाऱ्या व जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत परावलंबी असलेल्या आपल्या राज्यात ते संक्रमण हजार वाटांनी शिरू शकते. त्यामुळे अष्टावधानी असणे आपल्यासाठी अगत्याचे आहे. पर्यटन व्यवसायावर किनारी गोवा अवलंबून आहे, जगभरातून माणसे येथे येत राहातील. थोडीशी उसंत कोरोनाने दिलीय म्हटल्यावर पर्यटनाच्या दाबून ठेवलेल्या उर्मी आताही उफाळून येताना दिसताहेत. विमानतळावरला, रेलस्थानकावरला वाढता पदरव पर्यटकांचे लोंढे गोव्यावर आदळत असल्याचे संकेत देत आहे. या पाहुण्यांची सरबराई करताना आपले सुरक्षेचे भान हरवू नये यासाठी पर्यटन पट्ट्याबरोबरच समस्त गोमंतकीयाना खबरदारी घ्यावीच लागेल.

संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध लादले आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. यामुळे रोजगाराची फेरमांडणी झाली व अनेकांच्या रोजीरोटीवर संकट आले. सांस्कृतिक अभिव्यक्तीपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सगळ्याच समाजजीवनावर चढलेली निराशेची पुटे धुऊन निघण्याची वेळ आलेली आहे. उतू मातू न जाता, संयतपणे जर आपण नियोजन केले तर जनव्यवहारातील अनेक गोष्टी मार्गी लागतील. जसजसा अर्थव्यवस्थेचा प्रवाह मोकळा होत जाईल तसतशी ती नव्याने उभारी घेईल, याविषयी शंका नको. माणूस आशेवर जगत असतो आणि उद्याचा दिवस उज्ज्वल व्हावा म्हणून आज गुंतवणूक करत असतो. भवितव्याविषयीची आश्वस्तता दिवाळीच्या दीपांच्या मंद प्रकाशासोबत समस्तांच्या हृदयांत विराजमान व्हावी, ह्याच सदिच्छा. येते वर्ष गोव्यासाठी निवडणुकीचे वर्ष असेल. निवडणूक ही केवळ लोकशाही प्रक्रिया नसते तर आपल्या सामूहिक अभिव्यक्तीसाठीचे ते पांच वर्षांतून एकदाच भेटणारे माध्यम असते. निवडणुकांचा खरा अर्थ ज्या समाजाला कळतो, तो उत्तरदायित्वाची नवनवी आव्हाने राजकीय आसमंतापुढे टाकून त्याला सतत कार्यमग्न ठेवत असतो.

दुर्दैवाने आपण हे भान हरवत चाललो आहोत आणि त्यामुळेच राजकीय आसमंत आपल्याला गृहित धरत चाललेला आहे. निवडणुका संपल्या की लोकनियुक्त प्रतिनिधीना जनता म्हणजे मेलेलं कोंबडं वाटते, ज्याला कसेही लाथाडावे आणि कुठेही उकिरड्यावर फेकावे. असे होण्यामागे आपणच निवडणुकीप्रती स्वीकारलेली निरिच्छचा कारणीभूत आहे. निवडणुकीकडे आपण अपप्रवृत्तीच्या निर्दालनाचे शस्त्र म्हणून पाहायला हवे. दिवाळीचा खरा अर्थ आहे अंधःकाराचा नाश, मग राजकीय अंधःकाराच्या निर्मूलनासाठी ज्ञानाचा प्रकाश आपल्या हृदयांत शिरायला नको का? केवळ निवडणुकीचाच नव्हे तर राज्याच्या पुढच्या किमान पंचवीस वर्षांचा राजकीय ''अजेंडा'' काय असेल हे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी ठरवायचे नसते तर आपण नागरिकानी ठरवायचे असते. पक्ष आणि नेत्यांचे काम असते त्या अजेंड्यानुसार धोरणे आखून त्याना मूर्तरूप देण्याचे. यालाच लोकतंत्र म्हणतात आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. दिवाळीच्या पूर्वसंध्येला जसे नरकासुर उभे राहातात तसेच निवडणुकांच्या मिशाने अनेक अपप्रवृत्तींचे नरकासुर मते मागत आपल्या दारी उभे राहातील. त्यांचे विधिवत निर्दालन करणे आपल्याच हाती आहे, याचे भान पुढचे चार महिने गोमंतकीयानी हरवू देता कामा नये. कर्तव्य आणि सामर्थ्य यांचे भान आपल्याला या दीपोत्सवामुळे यावे अशीही प्रार्थना आम्ही यासमयी करत आहोत.

गोमंतकीय समाज आपल्या सौहार्दासाठी, सहिष्णुतेसाठी नावाजला जायचा. शांततेने जगणे हा गोव्याचा स्थायिभाव असायचा. हे सगळे इतिहासजमा होते आहे. गोमंतकीय समाजाची चेहेरेपट्टी बदलते आहे आणि त्यामागे परप्रांतियांचे घाऊक स्थलांतर हे प्रमुख कारण आहे. या स्थलांतरासाठीचा अवकाश आपणच तर तयार करतो, हेही आपल्या लक्षात येत नाही. संपन्नतेच्या भावनेतून ऐशोआरामाची गरज उद्भवते. ती गरज भागवण्यासाठी निरनिराळी प्रलोभने उपलब्ध होतात. यातून होणारे माणसांचे अभिसरण आपला शेजारपाजार बदलू लागले आहे. परक्यांची वर्दळ वाढली की मानसिक कुंपणेही उभी राहातात. एकामेकाना समजून घेताना अडचणी उद्भवतात आणि विसंवादाला तोंड फुटते. विद्वेशाचे बीजारोपण गोव्यात होते आहे, हे राजकीय जमात मान्य करणार नाही, कारण तिची पतपेढीच विद्वेशावर आधारित असते. पण समाजाविषयी विचार करणाऱ्याना त्या विद्वेशाकडे डोळेझाक करून चालणार नाही. स्थलांतरिताना उत्तर म्हणून आपण हिंसक प्रादेशिकवाद जोपासला तर त्याचे प्रतिध्वनी देश-विदेशांतही उमटतील, हे ध्यानात ठेवून अभिसरणावरच नियंत्रणाचा पर्याय आपल्याला सजगपणे राबवावा लागेल. निवडणुकीत मतदान करताना गोमंतकीयांच्या सुशिक्षित जाणिवांसमोर तो निकष प्राधान्याने असेल, अशी आशा आम्हाला वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT