गोंयची दिवाळी, एक महापर्वणी!

गोंयचे अगत्य हे गोंयच्या व्हडल्या दिवाळी इतकेच व्हड
गोंयची दिवाळी, एक महापर्वणी!
गोंयची दिवाळी, एक महापर्वणी!Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या वर्षीची दिवाळी ही गोव्यात मिळाली. गोंयची चवथ दरवर्षी मिळते. पण गोंयची दिवाळी पहिल्यांदा मिळाली. गोवा म्हणजे अखंड अगत्य असते. आणि हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळण्यासारखं नाही. चवथ हा महाउत्सव असतो तर दिवाळी ही महापर्वणी. चवथीला फराळ बनतो. दिवाळी आधी तो संपून दिवाळीच्या आधी पुन्हा बनतो. तारोटी मिरच्याचे शेव , फेणोऱ्या, गोडाच्या आणि शिवाय मस्त हिंग मसाला घालून केलेल्या तिखटाच्या करंज्या, मेथी दाणे गोड घालून केलेल्या चकल्या, पिठाचे भुसभुशीत पण टिकवून बांधून ठेवलेले लाडू, बेसनाचे एका लाडवाचे तीन लाडू होतील इतक्या छोट्या आकाराचे केलेले लाडू, गोड्या आणि खाऱ्या शंकरपाळ्या, कधी बरोबरीने खोबरं वड्या, बटाट्याची कापं. एक ना अनेक अखंड पदार्थ एकत्र एका बशीत येतात.

गोंयची दिवाळी, एक महापर्वणी!
'विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणी दिवशीच गोमंतकीयांची खरी दिवाळी'

मोठाले नरकासुर तयार होतात, त्याचा मुखवटा रंगवला जातो, गवताची गंजी, नारळाची काथ भरून गच्च भरले जातात. कुटुंब रात्री एकत्र जागतात, सगळे षडरिपू ह्या नरकासुरात जाळले जातात. तेलाची मालीश करून, उज घातलेल्या शेकोटीवर घंगाळात कडकडीत पाणी तापवले जाते आणि अंग रगडून रगडून आंघोळ केली जाते. सचैल आणि सतैल कडकडीत आंघोळ केली जाते. कारीट डाव्या पायाच्या टाचेखाली दाबून त्यातील येणारा कडवट बियाबियांचा गर जिभेवर सोडला जातो. एव्हाना स्वयंपाक घरात पांढऱ्या वाटाण्याची उसळ शिजत आलेली असते. दुधातले पोहे, नारळा रसातले पोहे, ताक दह्याचे पोहे, तिखट मिठाचे पोहे, गुळ आणि कच्च्या खोबऱ्याचे पोहे असे पाच प्रकारचे पोहे तयार होतात. हे पंच पोहे, चण्याची/पांढऱ्या वाटाण्याची उसळ, फराळ ताटात सजवला जातो, रांगोळी घालून ताट सजवून ओवाळणी घातली जाते. फुगोटे मारले जातात. आनंद वाटला जातो, वाढवला जातो. लग्न झालेल्या मुलीला कुळारहून ''व्हजे'' पोहोचवले जाते. धाकटी दिवाळी होते आणि त्यामागे एकादशी सोडून व्हडली दिवाळी होते. गावागावात सुंदर सुंदर कार्यक्रम रंगतात. मंडळी एकत्र येतात, गाणी नाटक रंगतात. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. धाकट्या दिवाळीपासून सुरू झालेला उत्सव व्हडल्या दिवाळीत मोठा होतो.

गोंयची दिवाळी, एक महापर्वणी!
गोव्यातील दिव्यांची परंपरा

या दिवाळीच्या तोंडावर आम्ही गोव्याच्या तांबड्या मातीतून घरी परतत आहोत आणि सकाळी शेजारच्या म्हाताऱ्या शेजारच्या मावशी बाई चांगले पाच शेर हात कांडल्याचे पोहे आणि पावशेर गूळ घेऊन आल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर घरी परतत आहात. तुमच्या बायलेच्या कुळाराहून म्हणून हे घरी घेऊन जा. आणि साधारण त्या आधी शेजारच्या वहिनी मुलीला आवडतात म्हणून नाश्त्याला म्हणून आडसराचे पोळे आणी रसरशीत ताज्या नारळाची दाट चटणी घेऊन आल्या. आम्हाला पुरतील इतक्या. गोंयचे अगत्य हे गोंयच्या व्हडल्या दिवाळी इतकेच व्हड, खूप खूप मोठं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com