Sea Dainik Gomantak
ब्लॉग

समुद्र स्नानाचा रिवाज

समुद्राच्या पाण्यात आंघोळ करणे हे त्वचेवरच्या मृतपेशी जाउन, त्वचा मऊ होण्यासाठी पुरेसे असते.

गोमन्तक डिजिटल टीम

शिरगावची जत्रा झाली की समुद्र स्नानाला (खारें उदक न्हावप) मोसम सुरू झाला असे गोव्यात एकेकाळी मानले जात होते. गोव्यातल्या अंतर्भागात राहणारी अनेक कुटुंबे किनाऱ्याजवळील गावात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे या दिवसात राहायला येत असतात आणि समुद्र स्नानाचा वार्षिक आनंद एखाद्या शाही रिवाजासारखा लुटत असत. अजूनही साठी पार केलेली अनेक ज्येष्ठ मंडळी उन्हाळी समुद्रस्नानाचा वार्षिक रिवाज चुकवत नाहीत.

या समुद्र स्नानाच्या रिवाजामागे काही आरोग्यविषयक कारणे सांगितली जात असली (ज्यामध्ये एकवाक्यता नाही) तरी समुद्राचा सहवास वर्षातून एकदा उत्कटतेने घडावा हेच त्यामागचे मुख्य कारण असू शकते.

उन्हाळ्याने आपला उच्चांक गाठला (बहुतेक मे महिन्यात) की घरची भांडीकुंडी, अंथरूण-पांघरूण उचलून, समुद्रकिनाऱ्यावरच्या एखाद्या सावलीदार झाडाखाली मुक्काम ठोकून, खाऱ्या वाऱ्याला आणि खाऱ्या पाण्याला अंगाखांद्यावर काही दिवस मनसोक्त बागडू द्यावे आणि संसारातल्या दैनंदिन रटाळतेपासून मुक्ती मिळावी यासारख्या साध्यासोप्या सुखाची कल्पना त्या काळात अगदीच सुसंगत होती.

घरकामाचा रगडा कायम पाठीमागे असलेल्या स्त्रियांसाठी तर ही एक हमखास मुक्ती देणारी सहल होती. लांबलचक समुद्रकिनारा लाभलेल्या या प्रदेशातील लोकांसाठी, वर्षाचा काही काळ मोकळेपणे देणारा तो लांबरुंद अवकाश होता.

समुद्रावर यावे, तिथल्या किनाऱ्यावर (पाण्यात खोल न उतरता) लाटांचे पाणी अंगावर येत पहुडावे, तिथेच स्वयंपाक करावा, चार घास खावे, घर जवळपास असेल तर सांजवेळी उशिरा घरी परतावे, नसेल तर रात्री चांदण्या माथ्यावर घेऊन तिथेच झोपावे अशा वार्षिक स्वातंत्र्याचे मस्त व्यसन कुणाला लागणार नाही?

ब्रोंकाइटिस, सोरायसिस, संधिवात यावर समुद्र स्नान हा उपाय आहे असा अनेक गोमंतकीयांचा विश्वास आहे. अर्थात समुद्रस्नानामुळे 'एक्सफोलिएशन' (त्वचेच्या मृतपेशी निघून जाणे) होते हे वैद्यकीयरित्या मान्य झाले आहे.

समुद्राच्या पाण्यात आंघोळ करणे हे त्वचेवरच्या मृतपेशी जाउन, त्वचा मऊ होण्यासाठी पुरेसे असते. पण संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी समुद्राच्या किंवा वाळूच्या संपर्कात जास्त वेळ घालवू नये असा इशाराही वैद्यकशास्त्र देते.

खाऱ्या पाण्याच्या व खाऱ्या हवेच्या या कथेत उपचाराला 'हालोथेरपी' हे नाव आहे. हालोथेरपी किंवा सॉल्ट थेरपी ही श्वासात सुधारणा करण्यासाठी सूक्ष्म मिठयुक्त हवेत श्वास घेण्याचा पुरस्कार करते.

दमा, खोकला, ब्रोंकाइटिस यासारख्या फुफ्फुसांच्या समस्यावर हा पर्यायी उपचार आहे असे मानले जाते. अनेकदा स्पा मधल्या सॉल्ट रूम मध्येही हा उपचार केला जातो.

समुद्र स्नानासारखे अनेक आनंद रिवाज आणि पर्यायी उपचार पद्धती आजच्या काळात हळूहळू अस्तंगत होत चालले आहेत आणि यावर कळस म्हणून शहरी हस्तक्षेपामुळे वाढलेले प्रदूषण समुद्राला येऊन मिळत गेल्यामुळे समुद्री पाण्यामधल्या प्रदूषणाचे प्रमाणही प्रचंड वाढलेले आहे.

जिथे प्रदूषण महामंडळच समुद्रात स्नान करण्यासंबंधी इशारे देत असते तिथे समुद्र स्नानाच्या रिबाजाचे भविष्य तरी काय असेल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT