एकनाथ खेडेकर
Goa Agriculture News : सध्या बंद असलेला संजीवनी साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता कमी असली तरी तेथील पडिक जागेवर कृषी क्षेत्राच्या माध्यमातून निश्चित क्रांती होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे निश्चितच संजीवनीचे भवितव्य उज्ज्वल ठरू शकते. त्यातच सरकारचे सहकार्य लाभल्यास कामत हे निश्चितच कामगारांच्या सहकार्यामुळे संजीवनीला स्वावलंबी बनविण्यात यश मिळवेल.
संजीवनी साखर कारखान्याचे प्रशासक चिंतामणी पेरणी निवृत्त झाल्यानंतर कामत यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात ताबा देण्यात आला. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार व अधिकारी वर्गाने कृषी क्षेत्रासाठी झोकून देऊन केलेले विविध प्रयोग यशस्वी होत आहेत. ताबा घेतल्यानंतर त्यांनी आधी पडिक जागेची माहिती करून घेतली.
यावेळी कंत्राटी पद्धतीवरील कामगारांच्या साहाय्याने भाज्यांची लागवड केली. तांबडी भाजी, मुळा, कारले, दोडकी, कलिंगड, ज्वारी, स्वीट कॉर्न व अन्य भाज्यांची लागवड केली. कारखान्याच्या जागेतील माडाची योग्य पद्धतीने काळजी घेतली. नारळापासून खोबरेल तेलही ग्राहकांना उपलब्ध करून दिले.
हातोहात खपतात भाज्या
येथे पिकवलेल्या भाज्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला विक्री करण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून ताज्या भाज्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळत आहे. त्यामुळे निश्चित भविष्यात संजीवनीच्या पडिक जागेत सोने पिकवण्याचा प्रशासक कामत यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो.
रेस्टॉरंट सुरू करण्याचा बेत
येथे ‘नेदरलॅण्ड मॅडम जेनेट’ नामक मिरचीची लागवड केली आहे. ही मिरची बरीच तिखट असल्याने नेदरलॅण्डमध्ये तिला मोठी मागणी आहे. या मिरचीची सध्या लागवड केली आहे. तसेच येथे काही वर्षांपूर्वी खोदलेल्या खंदकाचा वापर मत्स्योद्योगासाठी करण्यात येत सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार सतेज कामत यांच्या मनात आहे.
‘पे पार्किंग’ : मजबूत आर्थिक स्रोत
कारखान्याच्या समोरील जागेत पे-पार्किंग तळ सुरू करून महसूल वाढविण्यात यशस्वी झाले आहेत. येथे दरमहा सुमारे ३० हजार रुपये महसूल मिळतो. तसेच फळ-भाज्यांच्या विक्रीतून प्रतिमहा सुमारे दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे भविष्यात संजीवनीची आर्थिक स्थिती बळकट व्हायला वेळ लागणार नाही.
झेंडूलाही मागणी
संजीवनीच्या पडिक जागेत भाज्या व फळांसह झेंडूच्या फुलांचीही लागवड केली आहे. सुमारे १०० रुपये किलो दराने झेंडूची फुले विकण्यात येतात. सकाळी विक्रीला ठेवलेली फुले काही वेळातच विकली जातात, हे विशेष.
मत्स्यव्यवसाय
कामगारांच्या सहकार्यामुळे भाज्या लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. इतर अधिकाऱ्यांचेही योगदान लाभत आहे. गांडूळ खत, मत्स्य व्यवसाय, रेस्टॉरंटची संकल्पना यशस्वी झाल्यास निश्चित कारखाना स्वतःच्या पायावर उभी राहू शकतो.
सतेज कामत, प्रशासक, संजीवनी साखर कारखाना.
कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पडिक जागेत विविध प्रकारचे पीक घेण्यात सुरुवात केली आहे. संस्थेच्या महसुलात वाढ होत असून निश्चितच कारखान्याचे भवितव्य उज्ज्वल आहे.
स्वाती पालकर, अधिकारी, संजीवनी साखर कारखाना
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.