goa Dainik Gomantak
ब्लॉग

चिकोलकार

कधी नव्हे ते शिमग्याचे नमन पहिल्यांदाच चुकणार असल्याची चुटपूट त्यांच्या मनाला लागली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रा. पौर्णिमा केरकर

तेदिवस फाल्गुन महिन्याचे.शिमगोत्सवाची धामधूम सर्वत्रच होती.ढोलावर बडी पडली की अंगांगातून वीज संचारायची.आगापूर दुर्भाटच्या लोकमानसाच्या जगण्याची सारी भिस्त शेती आणि मासेमारी यावरच होती.

दैनंदिन जीवनात जीवतोड मेहनतीशिवाय काही पर्यायच नव्हता.खाजन शेतीत कोरगुट भाताची पैदासी तर त्याला लागूनच असलेल्या मानशीशी मच्छिमारीचा व्यवहार जोडलेला.

कुटुंबाच्या जगण्याचे तारू भटकता कामा नये म्हणून जीवन मरणाशी त्यांचा रोजचा संघर्ष अव्याहतपणे चालूच होता. त्यांचे जीवन कायमच तरंगते. पाण्यावर हेलकावणारे,चिखलात बुडलेले,खारफुटीच्या जाळीत गुरफटलेले.

चिखल,पाणी,नदी,खारफुटी,होडी,बांध,शेती,हा त्यांचा श्वास! डोंगर चढायचा उतरायचा ही तर नित्याचीच बाब होती. एवढे सारे करूनही सण उत्सवात सहभागी होण्यासाठीची त्यांची हौस दांडगी.लोकदैवतावर असीम विश्वास.आणि या विश्वासावरच त्यांनी जीवनातील उत्साह कायम टिकवला.

त्यातल्या त्यात शिमगोत्सवाला हाच उत्साह शिगेला पोहोचत असे.याच शिगम्याच्या दिवसात उपजीविकेसाठी कारवारला जाणे भाग होते. होडी घेऊन हा प्रवास होता. खरं तर त्या सर्वांना वेध लागले होते ते शिगम्यातील नमनाचे. कारवारचे काम आटोपून कधी एकदा रामाच्या मंदिरात नमनासाठी पोहोचतो असे त्यांना झाले होते. परंतु कामच एवढे लांबले की कारवार ते आगापूर हा प्रवास संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण करणे अशक्यप्राय होते.

नमनासाठी काही आम्ही वेळेत पोहोचणार नाही”ही त्यांची धारणा झाली होती.ते हतबल होते.कधी नव्हे ते शिमग्याचे नमन पहिल्यांदाच चुकणार असल्याची चुटपूट त्यांच्या मनाला लागली होती.

त्याही परिस्थितीत त्यांनी ‘चिकोलकारा पाव रे बाबा,’अशी श्रद्धेने तळमळीची हाक दिली. होडी पाण्यात घातली. ती शिडाची होडी होती. उन्हं उतरतीला लागली होती.सभोवताल तसा शांतच होता.पाण्यातही कोणतीच खळबळ नव्हती. मात्र अचानकच शिडात वारा भरला.आणि सो सो सो करीत होडीने वेग घेतला एरव्ही इतक्या वर्षांच्या जीवन प्रवासात असा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला होता.

अरे?असे काय होत आहे. कोणत्याही हेलकाव्या शिवाय होडीने वेग घेतलेला आहे.मनात हलकीशी भीती दाटून आली.गाव कुटुंब, शिगमोत्सवाची सुरुवात,सभोवताली जमलेले लोक,ते अंगावर रोमांच उठविणारे वादन…सारे सारे काही त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना स्पष्ट दिसत होते.जीव मुठीत मात्र तो गुंतला होता राम मंदिरात सुरू होणाऱ्या शिगम्याच्या नमनात.

मनातल्या मनात चिकोलकाराचा जप चालूच होता.शरीराने नाही तर मनाने ते गावात कधीचेच पोहोचले होते.अचानकच त्यांच्या कानात ढोलांचा आवाज घुमू लागला.असे काय होते आहे? हे वादन तर परिचयाचे आहे.

नमनाची सुरुवात.परंतु ते इतके जवळ कसे ऐकू येते.एवढ्यातच कोणीतरी म्हटले. बघा आपण पोहोचलो. एक क्षण कोणाचाच या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. पण ते वास्तव होते.चिकोलकाराने त्यांची हाक ऐकली, तोच त्यांच्या आसपास. होडीतून त्यांना संरक्षण पुरवित इथपर्यंत घेऊन आला होता.त्यांच्या मनातील त्याच्यावरील श्रद्धा अधिकच घट्ट होत गेली.नमनात सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह वाढला…

हे आणि असेच कितीतरी प्रसंग आजही या गावातील जुन्या जाणत्या लोकांना आठवत आहेत.ते आपल्या नव्या पिढीला सांगतात.तेरशेकर त्याचा सोबती.तो तेथेच डोंगरावर रहातो.त्याच्या सीमेत अडलेल्या नडलेल्याना मदत करतो,हाकेला ओ देतो.अनवाळ्या तव्यावर भाजलेली तांदळाची दाट ‘भाकरी रॉट’ आणि गोडश्याचा नैवेद्य चिकोलकारा बरोबर तेरशेकारालाही दाखवला जातो.

संकवाळचा ‘साखळयो’हा ही त्यांचा सोबती.जुवारीच्या काठांवर त्याची वस्ती,भात शेती,मासेमारी,कष्टकरी लोकांच्या जीवन जाणिवांत तो भरून राहिलेला,कोणे एकेकाळी म्हणे दूधसागर या दोघांनाही आपल्या अखत्यारीत घेऊन जायला बघत होता.स्वतःच्या सीमेत त्याना बंदिस्त करून ठेवण्याची त्याची मनीषा होती.

परंतु आपला आवाठ सोडून जाणे साखळयो आणि चिकोलकार या दोघांनाही पसंत नव्हते. साखळयोने अंगाला बारा मणांची साखळी लपेटून घेतली,तर चिकोलकार चिखलात जाऊन रुतून बसला..दोघांनाही तिथून हलवणे दूधसागराला शक्य झाले नाही असे जाणकार सांगतात.

अंत्रुज महालातील आगापूर सारखा गाव जुवारीच्या काठावर वसलेला नितांत रमणीय गाव.कुळागरांची दाटी,नदीचा खळाळ, खाजन शेती,यांनी परिपुष्ट झालेला.

भस्माचा डोंगर या गावचे वैभव.अगस्ती ऋषींचा निवास या डोंगरावर होता असे सांगितले जाते.म्हणूनही या परिसराची आध्यात्मिक उंची वाढलेली आहे.असे असूनही जागेकाराची,सीमेवरील देवाचाराची आत्मीयतेची जागा इथल्या कष्टकरी सर्वसामान्य लोकमनात अढळ आहे.

एकेकाळी येथील सभोवताल हा…माती चिखल,पाणी आणि खारफुटीच्या झुडुपानी भरलेला होता.मासेमारी आणि खाजन शेती यावरच इथल्या लोकमानसाची श्रद्धा. त्यावरच त्यांचा व्यवहार अवलंबून होता.खारपुटीच्या झुडुपांवर मधाची पैदाशी व्हायची.मानशीच्या माध्यमातून मासे आणि खास करून सुंगटांची मोठी आवक व्हायची.

मासेमारी करताना बऱ्याच कुटूंबाना रात्री जागरणे करावी लागत.अशावेळी त्यांच्या मनातील भीती चिकोलकारावरील श्रद्धेच्या विश्वासावर नाहीशी व्हायची.कोरगुट भाताची लागवड करताना शेतात मोठ्या प्रमाणात खारे पाणी भरण्याची भीती सतत सतावत असे,त्यामुळे दगडी भिंती मध्ये चिखल ओतून बांध घातला जायचा.

याच बांधावरून राखणकाराची रात्री अपरात्री फेरी असायची.त्याच्या या फेरीच्या मारण्याच्या वेळेत जर कोणी आडवा आला तर तो त्याला बाजूला करतो अशी लोकांची धारणा आहे.

मानशी ची राखण करताना असे अनेक प्रसंग आपल्या जीवनात घडले…आपल्याला राखणदाराची प्रचिती आल्याचे सांगतात.गावातील मानशीत रात्रीच्या वेळी

बाहेरून येऊन चोरून मासे पकडले जायचे, अशावेळी चिकोलकाराने आपल्याला जागे करून सत्य परिस्थिती दाखविली,असं एकजण सांगतो तर एकदा मी गावातील मंदिरात भजन आटोपून रात्री बाराच्या नंतर घरी येत होतो ,अंगणात पोहोचलो खरे मागाहून आवाज आला…

‘‘पावलो मरे तू”असं दुसरा म्हणतो….मी तर कामावरून निवृत्त होईपर्यंत एकटाच फेरीबोटीमधून उतरून घरी चालत यायचो ‘‘चिकोलकारा पाव रे बाबा तू” हे शब्द कायमच अंतःकरणात होते.त्याच्या बळावर धीराने वाटचाल केली.

गावच्या श्रद्धेला चिकोलकाराचा धार्मिक भावनिक आधार आहे. जुवारी नदीच्या पात्रात कोठून कोठून कसली कसली प्रेते येऊन काठाला लागतात…परंतु आजपर्यंत आमच्या चिकोलकाराच्या परिघात आम्हाला असा अनुभव कधी आलाच नाही…ही त्याचीच कृपा..असे भाविक सांगतात.

निसर्ग मानवी जगण्याचा मूलाधार.त्यालाच लोकमनानीविविध माध्यमातून पुजले भजले. ‘चिखल‘ शब्द ऐकून,चिखल बघून आपण तोंड वेंगाडतो. तो आपल्या हातापायाला लागता कामा नये म्हणून दक्षता घेतो.आगापूर च्या लोकमानसानी तर चिखलालाच देवत्व प्रदान केलेले आहे.

हे अनाकलनीय नव्हे का? कधी नव्हे ते शिमग्याचे नमन पहिल्यांदाच चुकणार असल्याची चुटपूट त्यांच्या मनाला लागली होती. त्याही परिस्थितीत त्यांनी ‘चिकोलकारा पाव रे बाबा, ’ अशी श्रद्धेने तळमळीची हाक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पाकच्या 'बाबर'ने तोडला 'अभिषेक शर्मा'चा विक्रम, केली तुफान फटकेबाजी; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Goa Petrol Diesel Price Today: जानेवारीअखेर गोव्यात 'पेट्रोल - डिझेल'चे काय आहेत दर? जाणून घ्या

Tragic Death: दुर्दैवी घटना! विजेचा खांब उभारताना कोसळला, बिहारच्या कामगाराचा कुडतरीत मृत्यू; निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Rashi Bhavishya: स्वप्न होणार पूर्ण! नवीन व्यवसायाची तयारी करा; 'या' राशींना मिळणार मोठी बातमी

सागरी सफारी ठरली जीवघेणी! 350 हून अधिक प्रवाशांची फेरी समुद्रात बुडाली; 15 जणांचा मृत्यू, शेकडो जणांचे जीव वाचवण्यात यश VIDEO

SCROLL FOR NEXT