Drama
Drama Dainik Gomantak
ब्लॉग

कला अकादमी कोकणी नाट्यस्पर्धा: वाद-प्रतिवाद

दैनिक गोमन्तक

गोवा: कला अकादमीच्या 46 व्या कोकणी नाट्यस्पर्धेत यंदा सर्वोत्कृष्ट नाटकासाठीची पाचही पारितोषिके गोव्याबाहेरील प्रदेशांत लिहिल्या गेलेल्या नाटकांच्या कोकणी अनुवादांना मिळावीत ही घटनाच नाट्यमय आहे. गोमंतकीय अस्मितेच्या राजकारणाला अधिकाधिक धार चढत असताना ती घडल्यामुळे तर ती थरारक वाटू शकते. (त्याचा राग बाहेरून गोव्यात आलेल्या प्रवासी कामगारांवर निघणार नाही, अशी अपेक्षा.) इतर भाषांतील अनुवादित नाटके सादर करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे, हा अशा परिस्थितीत सगळ्यात सोपा पर्याय ठरू शकतो. (मात्र त्यातून मूळ प्रश्न सुटणार नाही.)

यंदाच्या स्पर्धेतील पाच बक्षिसपात्र नाटकांपैकी, दोन युरोपियन नाटकांची, दोन अन्य भारतीय भाषिक (बंगाली व मराठी) नाटकांची व एक दक्षिण आफ्रिकन नाटकाचे- अशी कोकणी रूपे आहेत. त्यापैकी प्रथम तीन नाटके (एक युरोपियन व दोन भारतीय) ‘असंगता’च्या बाजूने झुकलेली आहेत तर खालची दोन ती वाट टाळणारी आहेत- हेसुद्धा उल्लेखनीय आहे. स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेनुसार स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या एकूण एकोणीस संस्थांपैकी दहा नाटके अनुवादित/रूपांतरित होती. पाच बक्षिसपात्र नाटके वगळता, त्यापैकी एक मूळ बंगाली तर तीन मूळ मराठी नाटके आहेत. (त्यापैकी एक गोमंतकीय नाटककाराचे मराठी नाटक आहे, तर एक गोमंतकीय नाटककाराचे कन्नड कादंबरीवर लिहिलेले मराठी नाटक आहे.) बंगाली आणि कोकणी संबंध तसा जुनाच आहे आणि मराठी आणि कोकणीचे नातेही विख्यात आहे.

यातून काही प्रश्न उपस्थित केल्यास चुकीचे होणार नाही. ‘चांगल्या’ दिग्दर्शकांना आकर्षून घेतील अशी कोकणी नाटके गोव्यात लिहिली जात नाहीत का? ‘चांगल्या’ दिग्दर्शकांना आपल्या काळाविषयी जे सांगावेसे वाटते त्याचा नव्या कोकणी नाटकात अभाव आहे का? की ‘चांगले’ दिग्दर्शक अगोदरच ‘चांगली’ ठरलेल्या नाटकांवर सट्टा खेळतात? की चांगले काय आणि वाईट काय याचा स्वतंत्र निर्णय घेण्याऐवजी जे अगोदरच ‘चांगले’ मानले गेले आहे ते हमखास चांगले ठरते? की ‘चांगले’ दिग्दर्शक मुळात चांगले नाहीतच? की चांगले दिग्दर्शक नसल्यामुळे ‘चांगले’ नाटक लिहू शकणाऱ्यांना लिहावेसे वाटत नाही? गोव्यात दरवर्षी अनेक कोकणी नाटके लिहिली आणि सादर केली जातात. मग स्पर्धात्मक नाटकाचा म्हणून काही विशिष्ट साचा ठरलाय का? मग यात अंतर्भूत असलेल्या वगळण्याच्या प्रक्रियेचा सामाजिक अंगाने अभ्यास करायला वाव आहे. स्पर्धेची काही गणिते ठरून गेली आहेत आणि नाटक बक्षिसाच्या फॉर्मुल्यात अडकले आहे असे मानले तर तो फॉर्मुला काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. तसे करूनच आपण – नाटकाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ‘टेक्स्ट’पासून ‘सब-टेक्स्ट’पर्यंत पोचू शकतो.

हे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अनुवाद-रूपांतराला विरोध नव्हे. योगायोग म्हणजे यंदाच्या स्पर्धेतही अनुवादासाठीचे प्रथम पारितोषक ज्यांना मिळालेले आहे त्या वसंत भगवंत सावंत यांनी गेल्या काही वर्षांत जागतिक दर्जाच्या काही नाटकांचे उत्कृष्ट अनुवाद केलेले आहेत. त्यामुळे कोकणी नाट्यसाहित्य नक्कीच समृद्ध झाले आहे. तशीच त्यांनी नवीन नाटकेही लिहिलेली आहेत. यंदाच्या स्पर्धेतही त्यांचे एक नवीन नाटक सादर झाले आहे.

साहित्याचा अनुवाद-रूपांतर हे संस्कृतीच्या अभिसरणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. तसेच या सांस्कृतिक अभिसरणाखालच्या सत्तासंबंधांबाबत जागरूक राहणेसुद्धा गरजेचे असते. कला आणि विचारांच्या जगात वावरताना फॅशन स्ट्रीटवर असल्यासारखे वागून चालणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. या बाबतीत, गोवा विद्यापीठात सेवा बजावलेल्या डॉ. आनंद पाटील यांनी, वासाहातिक काळात मराठी भाषेत लिहिल्या गेलेल्या आणि अनुवादित झालेल्या नाटकांवरील पाश्चात्य नाटकांच्या प्रभावाचा अत्यंत वाचनीय अभ्यास सादर केला आहे. त्याचा कोकणी अनुवाद झाल्यास गोमंतकीय रंगभूमीचा निश्चितच फायदा होईल. (ज्येष्ठ कोकणी नाटककार पुंडलिक नायक यांना लेखनासाठी डॉ. आनंद पाटील यांनी दिलेल्या डोळस प्रोत्साहनाचा त्यांनी एकदा आवर्जून उल्लेख केल्याचे स्मरते.)

यंदाच्या निकालाचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र लेखनासाठीचे प्रथम व द्वितीय पारितोषिक न देता यंदा त्यांच्या जागी तीन प्रशस्तिपत्रके देण्यात आली. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास पारितोषिकांतून रोख रक्कम वजा झाली. (ती अधिक समाजोपयोगी कामासाठी वापरली जाईल याविषयी शंका घेण्याचे कारण नाही.) मात्र अनुवाद किंवा रूपांतरासाठी प्रथम आणि द्वितीय पारितोषिके देण्यात आली. (म्हणजे ती रक्कम अधिक समाजोपयोगी कामासाठी वापरली जाण्यास आता जागा नाही. असो.) याचे वाईट परिणाम कला अकादमीला भोगावे लागू शकतात. ‘प्रायोगिक’ नाटककार लिहिण्याच्या बाबतीत किती आळशी असतात ते नाटकवाल्यांना नव्याने सांगायची गरज नाही. त्यात स्वतंत्र लेखनाला कला अकादमीच्या दृष्टीने ‘किंमत’ नाही, मग कशाला लिहायचे? असे नवे कारण त्यांना मिळू शकते. त्यातून होणाऱ्या रंगभूमीच्या अतोनात हानीचे खापर कला अकादमीवर फुटेल.

नाटकाने प्रेक्षकांना विचारप्रवृत्त, अंतर्मुख करावे (आणि त्यांचे मनोरंजनही करावे) अशी अपेक्षा असते. ती अपेक्षा निकालाने पूर्ण केली तर काय बिघडले? कोंबडा कुठलाही असो, सकाळ झाल्याशी मतलब.

- नारायण आशा आनंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT